डॉ. केशव साठये
‘युनेस्को’ने १९९६ पासून २१ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक टेलिव्हिजन दिन’ म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. यानिमित्ताने भारतातील या माध्यमाच्या स्थिती-गतीवर दृष्टिक्षेप; तसेच टीव्हीच्या वाटचालीतील व्यावसायिक आणि सांस्कृतिक पैलूंची चर्चा.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा असतात, या सार्वत्रिक सत्यात कालानुरुप बदल होऊन त्यात टेलिव्हिजन या साधनाची भर पडलेली आपण अनुभवली. आता तर मोबाईल या सर्वव्यापी भ्रमणध्वनी यंत्राशिवाय आपण श्वासही घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
या सर्व घडामोडींमागे दृकश्राव्य माध्यमाविषयीचे आपले कमालीचे आकर्षण केंद्रस्थानी आहे. ते निर्माण करण्यात चित्रपटांबरोबर टेलिव्हिजन नावाच्या डोळ्याने चघळण्याच्या ‘छोट्या पडद्या’ची प्रमुख भूमिका आहे.
जगभर या माध्यमाने आपले अढळ स्थान पक्के केले आहे. ‘युनेस्को’ला या माध्यमाची ताकद आणि व्याप्ती नेमकी ठाऊक असल्यामुळे ‘जागतिक टेलिव्हिजन दिवस’ सर्वत्र साजरा करण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला.
१९९६ पासून २१ नोव्हेंबर हा दिवस आपण यासाठी राखून ठेवला आहे. जगाला परस्परांशी जोडणारे, माहितीचा प्रसार करणारे माध्यम म्हणून आणि विश्वभरातल्या कथांचे आदानप्रदान करणारे साधन म्हणून ते वापरण्याचा संकल्प यंदाचा टेलिव्हिजन दिवस साजरा करताना ‘युनेस्को’ने निश्चित केला आहे.