राजकारणात ‘शहरं’ ठरताहेत प्रभावशाली!
वाढत्या शहरीकरणामुळे सामाजिक-राजकीय क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर बदल घडत जातात. त्यातीलच एक महत्त्वाचा बदल म्हणजे दिवसेंदिवस शहरी मतदारसंघांची वाढत जाणारी संख्या.
गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्राचा एकूण उत्पादनामधील घटलेला वाटा, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचं उत्पादनातील वाढलेला वाटा त्यातूनच या क्षेत्रांना मिळालेलं महत्त्व याचा होत गेलेला परिपाक म्हणजे मागील काही वर्षांमध्ये वाढलेलं शहरीकरण. शहरांच्या वाढीबरोबर ठळकपणे दिसून येणारी गोष्ट म्हणजे शहरी-ग्रामीण असमतोल. हा असमतोल साक्षरता, मानव विकास निर्देशांक, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा, रोजगाराची उपलब्धता अशा अनेक बाबींमध्ये पाहायला मिळतो. या सर्वांबरोबरच वाढत्या शहरीकरणामुळे सामाजिक-राजकीय क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर बदल घडत जातात. त्यातीलच एक महत्त्वाचा बदल म्हणजे दिवसेंदिवस शहरी मतदारसंघांची वाढत जाणारी संख्या. त्यातूनच शहरांचं, शहरांतील मतदारांचं आणि तेथील मतदारसंघांचं वाढत जाणारं महत्त्वं!