मायावतींचा प्रवास ‘दलित की बेटी’ ते ‘दौलत की बेटी' ...
स्वरुप जानकर
देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर हिंदुत्ववादी राजकारणाची जबरदस्त लाट असतानाही उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळवता आली नव्हती. त्याचे प्रमुख कारण होते ‘मुलायम- कांशीराम’ फॉर्म्युला. १९९३ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मुलायमसिंह यांनी नव्याने स्थापन केलेल्या समाजवादी पक्षाशी कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाने युती केली होती. भाजपला रोखण्यासाठी त्यावेळी ‘मिले मुलायम- कांशीराम, हवा हो गये जय श्रीराम’ अशी घोषणा देण्यात आली होती. त्याप्रमाणे घडलेदेखील. भाजप सत्तेपासून दूर राहिला आणि सप- बसप युतीला सत्ता मिळाली. त्यानंतर आता २९ वर्षांनी भाजपला अपेक्षित असलेल्या हिंदुत्ववादी राजकारणाने उत्तर प्रदेशवर पुन्हा पोलादी पकड घेतली असून गेली ३०-३२ वर्षे निर्णायक ठरलेल्या बहुजन समाज पक्षावरच ‘हवा होण्याची’ वेळ आली आहे.