यंदाच्या पद्मश्री वितरण सोहळ्यात एक नाव पुकारलं गेलं ते म्हणजे ‘लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) काझी सज्जाद अली जहीर’. बऱ्याच जणांना ही व्यक्ती कोण हा प्रश्न पडला असेल. १९७१च्या युद्धात ते पाकिस्तानी सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर होते. आता तुम्ही आणखी गोंधळात पडला असाल. पाकिस्तानी सैन्यातील लेफ्टनंट कर्नलला मोदी सरकारने ‘पद्मश्री’ का दिलं? हे काय प्रकरण आहे? पाकिस्तानी सैन्यात राहून काझी सज्जाद अली जहीर यांनी भारतासाठी केलेल्या कामाचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ बहाल केले. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९५१रोजी झाला. त्यांनी भारतासाठी नेमकं काय केलं, हे आपण जाणून घेऊ या...
१९७१ च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर असलेला २० वर्षांच्या काझी सज्जाद अली जहीर यांनी आपल्या बुटांमध्ये पाकिस्तान लष्कराचे महत्त्वाचे गुप्त कागदपत्र आणि नकाशे लपवून पंजाबमधून भारताच्या हद्दीत प्रवेश केला. त्यांनी सोबत आणलेली सगळी माहिती भारतीय लष्कराला त्या युद्धात खूप मोलाची ठरली. बांगलादेश मुक्तिसंग्रामात त्यांनी ‘मुक्ती वाहिनी’च्या तरुणांना सशस्त्र युद्धाचे प्रशिक्षण दिले आणि हेच लेफ्टनंट कर्नल बांगलादेश मुक्ती युद्धावरील स्वतंत्र संशोधक आणि लेखक झाले. बांगलादेश सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री हा नागरी सन्मान दिला आहे. सज्जाद अली भारताच्या हद्दीत शिरले तेव्हापासून पाकिस्तान सरकारने जारी केलेले वॉरंट त्यांच्या डोक्यावर आहे. हा काळ आता सुमारे ५० वर्षांचा झाला आहे.