Opinion: गोव्यात भाजपने विकत घेतलेलं दुखणं

सध्याच्या प्रमोद सावंत सरकारमध्ये महसूलमंत्री असलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती जेवढी निषेधार्थ आहेत, त्यापेक्षा त्यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी ज्या मिळमिळीत प्रतिक्रिया दिल्या, त्याचा जास्त राग सध्या गोमंतकीयांच्या मनात आहे
Goa Politics
Goa PoliticsSakal
Updated on

गोव्यात मागील विधानसभा निवडणुकीत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारून भाजपने काँग्रेसमधून भाजपत आलेल्या बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. पणजीच्या मतदारांनाही मोन्सेरात यांच्या बाजून कौल दिला. त्यांच्या रूपाने भाजपच्या आमदारांची संख्या एकने वाढली. पण तेच मोन्सेरात आज गोवा भाजपसाठी ‘अवजड जागेचं दुखणं’ ठरत आहेत.

राजकीय विचारसरणी काहीही असो; पण प्रत्येक गोमंतकीयांच्या मनात गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना वेगळे स्थान आहे. गोव्यात भाजप वाढवून पक्षाला सत्तेपर्यंत नेण्यासाठी ज्या भाजप नेते व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले, त्यातील पर्रीकर अग्रणी नेते आहेत. आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपमध्ये आलेल्या किंवा आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांना पक्षात घेतलेल्यांना पर्रीकरांच्या त्यागाचे मोल कळणार नाही.

सध्याच्या प्रमोद सावंत सरकारमध्ये महसूलमंत्री असलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती जेवढी निषेधार्थ आहेत, त्यापेक्षा त्यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी ज्या मिळमिळीत प्रतिक्रिया दिल्या, त्याचा जास्त राग सध्या गोमंतकीयांच्या मनात आहे. याचे प्रतिबिंब समाजमाध्यमांतून उमटले आहे. गोवा भाजपने ज्या पद्धतीने हा विषय हाताळला त्यावरून ‘मनोहर पर्रीकर त्यांना माफ करा’...असे म्हणण्याची वेळ गोमंतकीयांवर आली आहे.

‘‘पर्रीकरांसाठी ‘मी’ प्रथम, नंतर ‘पक्ष’ होता. पणजीच्या आमदाराने (मनोहर पर्रीकर) २५ वर्षे शहराची वाट लावली ते आज आम्हाला भोगावे लागत आहे. पणजीचा २५ वर्षे आमदार कोण होता आणि त्याने पणजीचा काय विकास केला, ते शोधा. कोणता प्रकल्प त्यांनी केला ते दाखवावे. पणजीतून ‘भाजप’चा आमदार माझ्या रूपाने प्रथमच जिंकला आहे’’, असे विधान करून मोन्सेरात यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर गोव्यातील भाजप नेते व कार्यकर्ते पेटून उठतील, अशी भावना गोमंतकीयांमध्ये होती. पण ज्या गुळमुळीत प्रतिक्रिया आल्या त्या आणखी चीड आणणाऱ्या आहेत, अशी सर्वसाधारण भावना आहे.

‘‘मनोहर पर्रीकर हे आमचे मोठे नेते आहेत. त्यामुळे मनोहरभाईंचा कोणीच अशाप्रकारे राजकारणासाठी वापर करू नये. ते पक्षापेक्षाही मोठे नेते होते. त्यांनी केलेले कार्य, विकास विसरता येणार नाही. त्यामुळे छोट्या छोट्या राजकारण्यांनी त्यांचे नाव राजकारणासाठी वापरू नये’’, ही प्रतिक्रिया आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची. ‘‘मनोहर पर्रीकर हे एका कुटुंबापुरते मर्यादित नाहीत. त्यामुळे पर्रीकरांसंदर्भात आपल्या वैयक्तिक राजकारणाबाबत अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य करू नये. ते आम्हा सर्वांचे आदर्श आहेत. ज्यांनी कोणी त्यांच्याबाबत असे वक्तव्य केले आहे, ते पक्षाचे विधान नसून त्यांचे वैयक्तिक मत आहे’’, ही प्रतिक्रिया आहे भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची. यापलीकडे भाजप नेते गेलेले नाहीत. यावरून गोव्यातील भाजप नेत्यांची काही तरी राजकीय अडचण झाली असावी.

‘‘मी पणजी स्मार्ट सिटीचा विषय उकरून काढल्यामुळे सर्वांचीच पळापळ झाली असून त्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. मी दिलेले औषध योग्य जागी लागले, हे जळजळीवरून दिसून आले. स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी केव्हापासून खराब झाली, हे जनतेला माहीत आहे. पणजीत भाजपचा आमदार याआधी होता की नव्हता व भाजपच्या आमदाराने पणजीचा विकास केला की नाही याचे उत्तर भाजपने द्यायचे आहे’’, अशी प्रतिक्रिया देऊन उत्पल पर्रीकर यांनी चेंडू गोवा भाजपच्या कोर्टात टाकला आहे.

याआधी पणजीत भाजपचा आमदार नव्हता, हे लहान मुलालादेखील पटणार नाही. स्व. मनोहर पर्रीकर यांनी राज्यभरात भाजपची बांधणी केली, हे सर्वज्ञात आहे. निवडणूक हा धंदा मानून पक्षांतर करत निवडून यायचे. ज्याला कोणताही वैचारिक वारसा नाही, ज्याची विचारांशी बांधिलकी नाही, अशांच्या मतप्रदर्शनावर मी बोलावे, असे नाही. भाजप सरकारमध्ये राहून स्व. पर्रीकर यांच्यावर तोंडसुख घेता येते का, याचा निर्णय भाजपने घ्यावा. पर्रीकर यांनी पणजीत काय केले, हे पणजीवासीयच सांगतील. त्यामुळे अशा आरोपांवर हसावे की रडावे, तेच समजत नाही. पणजीवासीय निवडणुकीवेळी स्व. मनोहर पर्रीकर यांनाही प्रश्न विचारायचे आणि चर्चा करायचे. ती तर खरी पणजीची संस्कृती आहे, असेही उत्पल पर्रीकर यावेळी म्हटले आहे. या प्रतिक्रियेनंतरही गोवा भाजप शांत आहे, यावरून त्यांची ‘राजकीय कोंडी’ झाल्याचे मानले जात आहे. ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ अशी अवस्था झाली आहे.

उत्पल पर्रीकर भाजपकडे?
उत्पल पर्रीकर यांचा भाजपप्रवेश निश्चित असल्याचे गोवा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीआधी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार, अशी राजकीय चर्चा गोव्यात सुरू आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अधिकृतपणे उत्पल यांच्या भाजप प्रवेशाचा आग्रह धरला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही उत्पल हे भाजपमध्ये यायला हवेत, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, या प्रवेशाबाबत महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना कुणकूण लागल्याने तेही अस्वस्थ झाले आहेत. भाजपच्या सत्ताधारी गोटातही मोठी अस्वस्थता असल्याचे मानले जाते. मागील विधानसभा निवडणुकीत पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या उत्पल पर्रीकर यांना अवघ्या ७१६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध लढताना उत्पल यांनी भाजपवर टीका केली नव्हती हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.