पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र, तेथील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीमुळे एका उड्डाणपुलावर त्यांना वीस मिनिटे अडकून पडावे लागले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था कशी असते? त्याचबरोबरच इतर महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्था कशी पुरवली जाते, त्याचे काय निकष आहेत. सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते, यावर टाकलेला प्रकाशझोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष संरक्षण गटाचं (एसपीजी) संरक्षण देण्यात आलं आहे. पंतप्रधानांभोवतीचे पहिले सुरक्षा वर्तुळ एसपीजी जवानांचे असते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात जवानांना अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडे ‘एमएनएफ 2000 असॉल्ट रायफल, ऑटोमॅटिक गन आणि सतरा एम रिव्हॉल्व्हर सारखी आधुनिक शस्त्रे असतात. एसपीजीचे कमांडो इतके वेगवान आणि चपळ आहेत की पंतप्रधान जिथे जातात तिथे प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवून असतात. एसपीजी कमांडोंचा पंतप्रधानांभोवती नेहमीच गराडा असतो. हल्ला झाल्यास, त्यांचे काम पंतप्रधानांना घेरणे आणि त्यांना सुरक्षित ठेवणे तसेच हल्लेखोराला पकडणे हे आहे.एसपीजी कमांडोंना मीडियाशी बोलण्यास मनाई आहे. त्यांच्या कानामध्ये संदेशवहनासाठी वायरलेस उपकरण असते.
पंतप्रधानांच्या एखाद्या राज्याच्या भेटीदरम्यान चार एजन्सी सुरक्षा व्यवस्था पाहतात -
१) एसपीजी
२) एएसएल,
३) राज्य पोलिस
४) स्थानिक प्रशासन.