जगात शांतता कायम राखण्यासाठी भारत करू शकेल नेतृत्व!
भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचे विविध देशांसोबत संयुक्त अभ्यास आणि सराव वाढले आहेत. यामुळे दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञान, युद्धनीती यांना आत्मसात करत भारत सुध्दा शक्तिशाली देशांमध्ये स्थान प्राप्त करेल. ते कसे? युद्ध सरावाचे महत्त्व काय? नव्या तंत्रज्ञानाचा आत्मसात करण्यासाठी देशाचे प्रयत्न? सद्य स्थितीत सशस्त्र दलांकडे असलेले आधुनिक तंत्रज्ञान. अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा हा लेख....
जागतिक स्तरावर युद्धनिती बदलत आहे. आता पारंपरिक युद्धाच्या पलीकडे जग वळत आहे. त्यात तंत्रज्ञानाला महत्व अधिक असून कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, क्वांटम कम्प्युटिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला महत्व आले आहे. त्यावर आधारित प्रणाली, उपकरणे तयार करण्यावर देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. परंतु हे कार्य केवळ एकच देशाने करणे हे तितकं सोप नाही. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाचे आदान प्रदान यामुळे दर्जेदार तंत्रज्ञान आत्मसात केली जाऊ शकते. यासाठी भारताचे इतर देशांसोबतचे संयुक्त साराव मोलाचे ठरते. देशाची ताकद ही त्याच्या लष्करी सामर्थ्यातून सिद्ध होत असते. मात्र अलीकडच्या काळात अनेक देशांचे लष्कर एकमेकांसमोर उभे राहते. पण ते लढण्यासाठी युद्ध भूमीवर नाही तर एकमेकांच्या दर्जेदार रणनीती, तंत्रज्ञानाची देवान घेवाण अन् मैत्रिपूर्ण संबंधासाठी.