स्वातंत्र्यलढ्याचे नेते, सत्याग्रहाचे प्रणेते, देशभरातील अनेक चळवळींचे प्रवर्तक अशा अनेक भूमिका गांधीजींनी निभावल्या. त्यांची पत्रकार -संपादक म्हणून कामगिरीही महत्त्वाची होती. त्या कामगिरीची ओळख करून देणारा लेख
भारतातील वृत्तपत्रकारितेच्या इतिहासातही महात्मा गांधींचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. संपादकांच्या परंपरेतील हे लखलखते झुंबर अगदी आजही डोळे दिपवून टाकते. त्यांच्या कामगिरीचे काही पैलू पूर्वार्धात आपण पाहिले. या लेखात आणखी काही पैलूंची चर्चा येथे केली आहे.
भारतीय भाषाभगिनींविषयी गांधीजांना आस्था होती. "इंडियन ओपिनियन'मध्ये त्यांनी इंग्रजीप्रमाणेच गुजरातीतूनही विपुल लिखाण केले. भारतात "नवजीवन' हे गुजरातीतून निघत होते. याशिवाय हरिजन (इंग्रजी), हरिजनबंधू (गुजराती), हरिजनसेवक (हिंदी) अशी विविध भाषांतील नियतकालीके त्यांनी चालविली. एक भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यास त्यांचा विरोध नव्हता. मात्र शिक्षणाचे विशेषतः प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असणे हे घातक आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. ५ जुलै १९२८ च्या "यंग इंडिया'तील "द कर्स ऑफ फॉरेन मीडियम' या शीर्षकाच्या लेखात त्यांनी ते मांडले आहे. नबाब मसूद जंग बहादूर यांचे कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत व्याख्यान झाले. त्यात शिक्षणाचे माध्यम भारतीय भाषाच असल्या पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. "टाइम्स'ने त्यावर टीका करताना म्हटले, की ""राजा राममोहन रॉय यांच्यापासून महात्मा गांधी यांच्यापर्यंत जे अनेक थोर नेते भारतीयांना मिळाले आहेत, तो पाश्चात्त्य शिक्षणाचाच परिपाक आहे.''