माहितीयुगाच्या या काळात संपर्क-संवाद क्षेत्र गजबजून गेले आहे. तंत्रज्ञानाने आख्खं जग जणू आपल्या मुठीत आणून ठेवलं आहे; पण त्यात विहरताना आपलं "आतलं जग' मात्र कुठेतरी हरवून जात आहे, हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. माहितीचा माध्यमांतून वाहणारा महापूर हे आजचे वास्तव. तंत्रज्ञानाने पुढ्यात आणून ठेवलेली "दुसरी दुनिया' काहींच्या सक्षमीकरणास, प्रबोधनास, ज्ञानसंपादनास कारणीभूत ठरत असली, तरी अनेकांच्या गोंधळास, दिशाभुलीसही कारण ठरते आहे.
समाजमाध्यमांतून माहिती पडताळल्याविना फैलावत असल्याने तिच्या खरेखोटेपणाविषयी हमी देता येत नाही. नवमाध्यमांच्या बाबतीत विश्वासार्हतेची तूट निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रचार, जाहिरात, अफवा, अभिनिवेश, विचारापेक्षा विकारांना वाट करून देण्यासाठी माध्यमांचा वापर करण्याची वृत्ती असे चित्र निर्माण झाले आहे. मतमतांचा गल्बला, कोणी पुसेना कोणाला अशी ही स्थिती. जातीय, प्रांतिक, भाषिक, धार्मिक भेदांना खतपाणी घालणारी माहिती, संदेश, चित्रे, चित्रफिती वाऱ्यासारख्या पसरतात. त्यातून वाहणारे ताणतणाव आणि उद्रेक वारंवार अनुभवावे लागताहेत. "फेक-न्यूज' नावाचा नवाच प्रकार धुमाकूळ घालतो आहे. राजकीय फायद्यासाठी समाजात ध्रुवीकरण घडवण्यासाठी समाज माध्यमे वापरण्यात येत आहेत. पडताळणी न करता, चाळणी न लावता पुढे ढकलली जाणारी माहिती काय अनर्थ घडवू शकते, हे पाहायला मिळते आहे. मुले पळविणाऱ्या टोळ्यांविषयीच्या अफवा आणि त्यातून जमावाने केलेल्या हत्या हे तर अनर्थाचे अगदी टोकाचे रूप. त्यामुळेच काही नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. मुळात हे तंत्रज्ञानाचे जग म्हणजे एकविसाव्या शतकातील आव्हान आहे. त्यावर मात करण्याची साधने, विचार, स्रोत हेही याच शतकातले असायला हवेत, हे खरेच आहे. तरीही काहीवेळा आजच्या प्रश्नांसाठी कालच्या धुरिणांकडूनही घेण्यासारखे, शिकण्यासारखे काही असते. यासंदर्भात गांधीजींच्या माध्यमविषयक अर्थात पत्रकारितेतील कामगिरीवर एक दृष्टिक्षेप टाकला आणि असे वाटले, की त्यांची याबाबतीतील मर्मदृष्टी आजही प्रस्तुत आहे. त्यांची "माध्यमयात्रा' नीट अभ्यासली तर हे जाणवते.
गांधीजींच्यावेळी माध्यमांचे जग हे आजच्यासारखे नव्हते. त्यावेळी जनसंज्ञापनाचे मुख्य माध्यम म्हणजे वृत्तपत्रे. तरीही त्याविषयी त्यांनी काय म्हटले आहे पाहा.
""वृत्तपत्र ही एक महान शक्ती आहे; परंतु पाण्याचा अनिर्बंध लोट ज्याप्रमाणे गावेच्या गावे बुडवून विनाश घडवतो, त्याप्रमाणे निरंकुश लेखणी हानिकारकच ठरते. पण हा अंकुश बाहेरून लादला तर तो निरंकुशतेपेक्षा अधिक हानिकारक ठरतो. लाभदायी, कल्याणकारी ठरतो तो आंतरिक अंकुश.''