रामलीला मैदान! अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार!
अनेक ऐतिहासिक वास्तूंनी दिल्ली नटलेली आहे. त्या प्रत्येक वास्तूला, चौकाला, मैदानाला स्वतःचा म्हणून असा खास इतिहास आहे. पण स्वतंत्र भारताचा विचार केल्यास रामलीला मैदानाइतकं महत्व कोणत्याच जागेला नसेल. स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या काळात अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असलेलं हे विस्तीर्ण मैदान म्हणजे राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीची जणू पंढरीच. स्वातंत्र्य चळवळीवेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांनी येथे अनेकदा सभा घेतल्या. तर स्वातंत्र्यानंतर शामाप्रसाद मुखर्जी, इंदिरा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, जयप्रकाश नारायण अशा दिग्गज नेत्यांपासूनपासून ते अलीकडच्या काळात अण्णा हजारे, बाबा रामदेव, अरविंद केजरीवालांपर्यंत सर्वांनीच आपल्या आंदोलनासाठी रामलीला मैदानच गाठले.
त्यामुळं दिल्लीत पाउल टाकताच मी सर्वांत आधी रामलीला मैदानच गाठलं. देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या अशा एक ना अनेक घटनांचं रामलीला मैदान मूक साक्षीदार आहे. त्यासाठीच ही भूमी याची देहा याची डोळा पाहण्यासाठी मी इथं आलेलो... अचानक माझ्या कानावर धीरगंभीर आवाज पडला...मित्रा, आंदोलनातूनच क्रांतीचा जन्म होतो..., क्रांतीतून इतिहास बदलला जातो....नवा इतिहास रचला जातो... अशा अनेक आंदोलनांतून इतिहासानं कूस बदलल्याचं मी अनुभवलंय.. भानावर येवून डोळे उघडून पाहतो तर लांबवर कोणी चिटपाखरूही नव्हते.. मग कोणाचा आवाज होता तो... तो पोक्त, भारदस्त आवाज होता मैदानाचाच...होय... रामलीला मैदानच माझ्याशी बोलत होते... त्याच्या अंगाखांद्यावर लाखोंच्या साक्षीने घडलेला सारा इतिहास मला सांगू पहात होते. या सोनेरी इतिहासाची सफर करण्यासाठी मी पुन्हा डोळे शांतपणे मिटले आणि कान टवकारले....आता आमच्या दोघांत तिसरं कोणी नव्हते... मैदान बोलू लागलं फक्त माझ्याशी आणि माझ्याशीच......