'महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही', या वाक्याला राज्यात आता कोणी गांभीर्याने घेत नाही. कारण गेली दोन वर्षे हे सरकार खंबीरपणे उभे असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा पॅटर्न विकसित होऊ पाहत आहे. आघाडी असेल तरच भाजपला रोखता येईल हेही वेगवेगळ्या निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले. नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष राहिला त्यामुळे आघाडी शिवाय पर्याय नाही हे अधोरेखित झाले. तसेच भाजपला राज्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणावर विस्तार करावा लागणार हेही स्पष्ट झाले. नगरपंचायतींच्या निमशहरी भागात आघाडीचे वर्चस्व असणार हे सहाजिकच आहे, पण आघाडीचा कस आगामी महापालिका निवडणुकीत लागणार आहे. भाजपचे वर्चस्व असणाऱ्या शहरी भागात महाविकास आघाडी भाजपला रोखणार का, यावरच राज्यातील आगामी सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.