भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीची उलाढाल दोन हजार कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपटांत आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात भोजपुरी चित्रपट यशस्वी होत आहेत. मात्र, या चित्रपटांनी सध्या अश्लीलतेचा कळस गाठला आहे.
काही काळ बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांपुरते मर्यादित असलेल्या भोजपुरी चित्रपटांना आता देशाच्या विविध भागांतून पसंत मिळू लागली आहे. या चित्रपटांतील गाण्यांचाही प्रेक्षक वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीची उलाढाल दोन हजार कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपटांत आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात भोजपुरी चित्रपट यशस्वी होत आहेत. मात्र, या चित्रपटांनी सध्या अश्लीलतेचा कळस गाठला आहे.
उत्तर प्रदेश व बिहारच्या सीमावर्ती भागात असलेल्या गाजीपूर येथील नजीर हुसैन यांनी बिमल रॉय यांच्या ‘दोन बीघा जमीन’ या हिंदी सिनेमाची पटकथा लिहिली होती. या चित्रपटाने बॉलीवुडमध्ये चांगले यश मिळवले. त्यानंतर भोजपुरी भाषेत सिनेमा बनविण्याचे स्वप्न नजीर यांनी पाहिले. यातून त्यांनी ‘गंगा मईया तोहे पियरी चढइबो’ या भोजपुरी सिनेमाची पटकथा लिहिली. या सिनेमाच्या निर्मितीसाठी नजीर हे रॉय यांच्याकडे गेले. रॉय यांना ही कथा खूप आवडली. परंतु, त्यांनी तो सिनेमा हिंदीमध्ये बनविण्याचा प्रस्ताव नजीर यांच्यासमोर मांडला. मात्र, भोजपुरी भाषेच्या अस्मिता असलेल्या नजीर यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर नजीर यांनी मुंबईतील निर्मात्यांना या सिनेमाच्या निर्मितीसाठी साद घातली. मात्र, मुंबईतील निर्मात्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कोयला व्यासायी आणि सिनेमा थियटरचे मालक विश्वनाथ प्रसाद शाहाबादी हे या या सिनेमासाठी पैसे लावण्यास तयार झाले. त्यानंतर बनारस येथील कुंदन शाह यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. या सिनेमाचे बजट सुरुवातीला दीड लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. मात्र, तो पूर्ण होईपर्यंत त्याचा खर्च पाच लाखांच्या घरात गेला. बनारस येथील कुमकूम आणि असीम यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या. त्यानंतर सन १९६३ मध्ये भोजपुरीत पहिला सिनेमा ‘गंगा मईया तोहे पियरी चढइबो’ हा प्रदर्शित झाला आणि नजीर यांचे स्वप्न प्रत्येक्षात उतरले. या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाने ८० लाख रुपयांची कमाई केली.