गोव्यात राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळणार का?
पणजीत टॅक्सीतून प्रवास करताना ड्रायव्हरला विचारले, यंदा गोव्यात कोणाची सत्ता येणार? त्याचे उत्तर होतो, यंदा आप, तृणमूल कॉंग्रेससारखे पक्ष पहिल्यांदाच रिंगणात आहेत. त्यामुळे खूप रस्सीखेच होणार. पण कोणाचे कितीही आमदार निवडून येवोत सत्ता मात्र भाजपच स्थापन करणार. गोव्यातील आयाराम - गयारामांच्या अस्थिर राजकीय परिस्थितीचे त्याने एका वाक्यात वर्णन केले होते. याचे कारण म्हणजे गेल्या वेळी तेरा आमदार निवडून आलेला भाजप पाच वर्षे सत्तेत होता तर १७ आमदारांच्या कॉंग्रेसला विरोधी बाकांवर बसावे लागले होते.मधल्या काळात मांडवीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. कॉंग्रेसच्या १७ पैकी १६ आमदारांनी पक्षाला रामराम ठेवला होता. त्यातील बारा जणांना तर यंदा भाजपनेच उमेदवारी दिली होती. यावरून गोव्यात काहीही घडू शकते हे कोणालाही पटेल.
भाजपसाठी यावेळची निवडणूक पार महत्त्वाची अशी होती. कारण गेली तीन दशके गोवा म्हणजे मनोहर पर्रीकर असेच जणू समीकरण झालेले. गोव्यात पर्रीकर यांनी भाजपचे रोपटे रुजवले, ते वाढवले आणि त्याचे वटवृक्षात रूपांतरही केले. त्यांच्यामुळेच गोव्यात भाजप सलग दोनदा सत्तेत विराजमान झालेला होता. गेल्या वेळी तर पर्रीकर मुख्यमंत्री होणार असतील तर पाठिंबा देण्याचे धोरण मगो पक्षाने घेतले होते. त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास परवानगी घेत त्यांच्या मंत्रिमंडळातून संरक्षणपदाचा राजीनामा देत गोव्यात परतावे लागले होते. यावरून पर्रीकर यांचे पक्षातील स्थान अधोरेखित होते. त्यांच्या निधनामुळे भाजपमध्ये कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली होती. असा स्थितीत भाजप निवडणुकांना सामोरे गेल्याने पक्षाची यावेळी मोठी कसोटी लागलेली होती.