योगींनी पारंपरिक राजकारणाला छेद दिला.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची सेकंड इनिंग शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. गेल्या ३५ वर्षांत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा संधी कोणालाही मिळाली नव्हती. योगी आदित्यनाथ ऊर्फ अजयकुमार बिश्त यांनी उत्तर प्रदेशातील पारंपरिक राजकारणाला छेद दिला. मुळात योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी निवड होणे हाच पाच वर्षांपूर्वी अनेकांना धक्का होता. योगी आदित्यनाथ तेव्हा मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत होते; पण त्यांना मुख्यमंत्री करतील असे कोणाला वाटले नव्हते. त्यांची निवड ही पक्षातील आमदारांना आणि उत्तर प्रदेशातील एकूणच राजकीय वर्तुळाला मोठा धक्का होता. त्यांना दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले. त्या वेळी अनेकांना असे वाटले होते, की ही दोन माणसे त्यांच्या पायातील बेडी ठरतील; पण पाच वर्षांत असे काही घडले नाही. काही जणांची नाराजी सहन करीत, तसेच पक्षातील छोट्या-मोठ्या कुरबुरींना तोंड देत योगी आदित्यानाथांनी पाच वर्षे उत्तर प्रदेशसारख्या जटिल राज्याचा कारभार तुलनेने चांगल्या पद्धतीने हाताळला.