Akshaya Tritiya 2023: उत्सव अक्षयदानाचा

वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपेकी एक शुभदिवस.
Akshaya tritiya news
Akshaya tritiya newssakal
Updated on

Akshaya Tritiya 2023: वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपेकी एक शुभदिवस. ज्याचा क्षय होत नाही ते अक्षय, जे शाश्र्वत आहे ते अक्षय, जे कधीही नष्ट होत नाही ते अक्षय. त्यामुळेच अक्षय्य तृतीयेला केल्या जाणाऱ्या शुभ गोष्टींचे फळ अक्षय असते, असे समजले जाते.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे

श्री विष्णूंचा सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला, असे पंचांगात दिलेले आढळते. पांडव १२ वर्षांसाठी वनवानास गेले तेव्हा त्यांना भेटायला अनेक ऋषिमुनी येत असत. वनवासी जीवन जगत असताना द्रौपदीला ऋषिमुनींना भोजन देणे अवघड होत असलेले पाहून युधिष्ठिराने सूर्यदेवाची तपस्या केली.

सर्व धनधान्याचा व अन्नाचा स्रोत असणारे सूर्यदेव प्रसन्न झाले व त्यांनी द्रौपदीला अक्षयपात्र दिले आणि वर दिला की या पात्रातील अन्न कधीही संपणार नाही. द्रौपदीला हवे तितके अन्न या पात्रातून मिळेल. सूर्यदेवांनी द्रौपदीला सुवर्णाचे अक्षयपात्र ज्या दिवशी दिले तो हा आजचा अक्षय्य तृतीयेचा दिवस.

द्रौपदीचा ऋषिमुनींना अन्नदान करण्याचा हेतू या सुवर्ण अक्षयपात्राने पूर्ण झालेला असल्याने अक्षयतृतीयेला यथाशक्ती दान करण्याची, शक्यतो सुवर्णदान करण्याची, नवीन सोने घरात आणण्याची व सोन्याची पूजा करण्याची पद्धत आहे. तसेच या दिवशी पूर्वजांप्रती कृतज्ञभाव ठेवून सत्पात्री दान करण्याचेही अक्षय फळ मिळते, अशी धारणा आहे.

‘अक्षय’ हा शब्द सुवर्ण धातूला चपखल बसणारा आहे. सोने जळत नाही, उष्णतेमुळे वितळले तरी नष्ट होत नाही. आयुर्वेदात सुवर्णभस्म करण्यासाठी मूळ धातूवर अनेक क्लिष्ट प्रक्रिया कराव्या लागतात.

एरवी अग्नीच्या उष्णतेमुळे उलट तावून सुलाखवलेले सुवर्ण अधिकाधिक शुद्ध, अधिकाधिक तेजस्वी आणि आकर्षक होत जाते. ‘आयुष्याचे सोने’ असा वाक्प्रचार आपण वापरतो; पण जीवन जगताना ज्याला अग्नी, काळ यांच्या संगतीत राहून स्वतःला शुद्ध करता येते, तावून सुलाखून निघालेल्या अनुभवांवर जो चालू शकतो त्याच्याच आयुष्याचे सोने होते.

भारतीय पुराणात अशी एक गोष्ट आहे की, कलीला ज्यावेळी राहायला जागा मिळत नव्हती तेव्हा त्याने खूप गयावया केल्यावर त्याला राहण्यासाठी काही गोष्टी दिल्या गेल्या. त्यात एक होते सोने. कली म्हणजे काळेपणा. सोन्यात खरे तर काळेपणा मुळीच नसतो.

परंतु सोने कुठल्याही मार्गाने प्राप्त करून घेण्यासाठी असलेली जी वासना तोच सोन्यातील कली-काळेपणा होय. आणि मनाला मोहून टाकणाऱ्या सोन्याचे दान करायला शिकवणारी अक्षयतृतीया ही खऱ्या अर्थाने भौतिकापेक्षा प्रेम, सेवा, समर्पणात अधिक ताकद असल्याचे दर्शविणारी तिथी होय.

दूरदृष्टीची योजना

सर्व जगात पूर्वीपासून मिठाई, केक अशा गोष्टींवर सोन्या-चांदीचे वर्ख लावण्याची पद्धत आहे. विदेशातील राजघराण्यात वापरल्या जाणाऱ्या कपाच्या कडेलाही सोन्याचे पॉलिश केलेले आजही आढळते.

आमचे वडील सांगत असत, त्याकाळी सांगलीच्या राजघराण्यात सुवर्णाची मोहोर फोडणीसाठी वापरली जात असे. आज जग लहान झालेले आहे. सर्व मनुष्यमात्र एकमेकांच्या जवळ आल्याने, जातिभेद व वंशभेद संपल्याने, आपल्याला सर्व ठिकाणी काय चाललेले आहे याची माहिती सहजपणे मिळते.

परंतु ज्या वेळी अशी माहिती मिळण्याचे साधन नव्हते, त्या वेळीसुद्धा सर्व देशांतील मंदिरांना किंवा प्रार्थनास्थळांना लावलेले कळस सुवर्णाचे किंवा सुवर्णाचे पॉलिश केलेले असत, भिंतीवर सुवर्णाने रंगवलेली चित्रे असत.

अशी योजना सर्वत्र केली जाण्यामागे काही तरी उद्देश असणारच. आपल्याकडे वास्तुशांत करताना जमिनीत सोने पुरण्यास सांगितले जाते. राजे, महाराजे यांचे हार व मुकुट सोन्याचेच असत. यात बडेजाव किंवा श्रीमंती दाखविण्याचा उद्देश नसे तर ते शक्ती आकर्षित करण्याचे एक माध्यम असे.

भारतात अनेक शक्तिसंपन्न मंदिरांच्या तळघरात मोठ्या प्रमाणात सोने साठवलेले दिसते हा सुद्धा केवळ योगायोग नव्हे, तर ती आपल्या पूर्वजांची दूरदृष्टीतून साकारलेली योजना होय.

असे म्हणतात की ज्या जरासंधाने अनेक अत्याचार केले आणि त्याचा पुढे वध झाला, त्याचा मुकुट ज्या वेळी परीक्षित राजाने डोक्यावर ठेवला व तो ठेवण्याचा मोह ज्या वेळी त्याला झाला त्या वेळी कलिप्रवेश झाला आणि कलियुगाचा प्रारंभ झाला.

यावरून सोन्याच्या, भौतिकाच्या, पार्थिवाच्या आकर्षणानेच भ्रष्टाचारास म्हणजेच अनैसर्गिक आचरणास सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही.

Akshaya tritiya news
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

भारतीय संस्कृतीत सर्वंकष आरोग्याला (होलिस्टिक हेल्थ) महत्त्व दिलेले दिसते. सर्वसामान्यांचे आरोग्य कळत नकळत सांभाळले जावे,

या हेतूने समाजाचा कळवळा असणाऱ्या ऋषी-मुनींनी काही सण, उत्सव, परंपरा वगैरेंचा संस्कृतीत समावेश केलेला दिसतो.

त्यामुळे सुवर्ण नुसते विकत घेऊन माया जमवण्याऐवजी त्यातील शक्तीचा अनुभव घेता यावा आणि त्याहीपलीकडे जाऊन सुवर्णदान करून हृदयात सर्वांप्रती प्रेमभावना जागावी या उद्देशाने अक्षयतृतीयेची योजना भारतीय संस्कृतीत केलेली असावी.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून ‘संतुलन आयुर्वेद’द्वारा संकलित.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.