गणेशोत्सवाच्या निमित्ताने उपनिषदांमध्ये आलेल्या गणेशविषयक तत्त्वज्ञानाचा आपल्याला येथे थोडक्यात परिचय करून घ्यावयाचा आहे.
प्रणव प्रदीप गोखले, सहाय्यक संचालक, वैदिक संशोधक मंडळ, पुणे
भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेमध्ये वेदान्ताचे अर्थात (वेदांचा अंतिम भाग) उपनिषदांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीला जर भरजरी वस्त्राची उपमा द्यायची झाली तर त्याचा ‘सोनेरी जरीकाठ’ म्हणजे दार्शनिक तत्त्वज्ञान आहे आणि अध्यात्मविचार हा या जरीकाठांतला ‘सुवर्णतंतू’ आहे. मात्र त्या सोन्याची मूळ खाण उपनिषदेच म्हणावी लागतील.
उपनिषदांचा मुख्य विषय हा अध्यात्मविद्या असला तरी त्यांत उपासना, योग, मंत्र, धर्मशास्त्र अशा आनुषंगिक विषयांचेही विवरण येते. परमात्मा निर्गुण निराकार आहे की सगुण साकार याविषयीची निर्णायक चर्चा सर्वप्रथम उपनिषदांतच आढळते. उपनिषदांतून कालानुरूप सगुण परमात्म्याविषयीच्या संकल्पना विष्णू, शिव, शक्ती, सूर्य, गणेश अशा नानाविध रूपांतून अधिकाधिक स्पष्ट होत गेल्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उपनिषदांमध्ये आलेल्या गणेशविषयक तत्त्वज्ञानाचा आपल्याला येथे थोडक्यात परिचय करून घ्यावयाचा आहे. खरंतर ईशावास्य, बृहदारण्यक, छांदोग्य, काठक इ. प्राचीन उपनिषदांमध्ये गणेश दैवताचा प्रत्यक्ष उल्लेख आढळत नसला तरी काही ‘नव्य’ उपनिषदांमध्ये तो ठळकपणे आला आहे. ही नव्य उपनिषदे सांप्रदायिक तसेच प्राचीन उपनिषदांच्या तुलनेने अलीकडच्या काळातील मानली जात असली तरी यांत आलेले तत्त्वज्ञान हे निश्चितच वादातीत व कालातीत आहे.
गणेशोपासनेला प्राधान्य देणारा संप्रदाय हा ‘गाणपत्य’ या नावाने ओळखला जातो. त्या संप्रदायाचे सर्वाधिक प्रचलित आणि लोकप्रिय झालेले उपनिषद म्हणजे गणेशाथर्वशीर्ष आहे. त्या व्यतिरिक्त गणेशपूर्वतापिनीयोपनिषद, गणेशोत्तरतापिनीयोपनिषद आणि हेरंबोपनिषद ही उपनिषदे देखील गाणपत्य संप्रदायाचे तत्त्वज्ञान समजून घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत.