Songi Bhajan Kirtan
Songi Bhajan KirtanEsakal

Songi Bhajan: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Songi Bhajan Kirtan: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील विचार केला तर दत्तपंथी, विठ्ठलपंथी भजनांची संख्या मोठी आहे. त्यातही दत्तपंथी भजन विशेष लोकप्रिय आहे. या भजनांचे वैशिष्ट्य म्हणजे काही अभंगांना किंवा भजनांना चित्रपट गीतांच्या चालीही लावता येतात
Published on

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर शहरातल्या बहुतांश तालमींत कैक वर्षांची भजनाची परंपरा आहे. त्यातही सोंगी भजन असणाऱ्या मंडळांची संख्याही वेगळी. भजनी मंडळांच्या सकस स्पर्धेतूनच सोंगामध्ये थेट हत्ती, घोडे आणून भजनाला भव्यता देण्याचा प्रयत्नही काही मंडळांनी केला..घेऊयात जाणून या अस्सल कोल्हापूरी लोककलेबाबत

‘ दत्त दर्शनाला जायाचं जायाचं,
आनंद पोटात माझ्या मावेना-मावेना ’

चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ या मराठी चित्रपटातील हे तुफान गाजलेलं गाणं. उत्तरेश्‍वर पेठेतील शिवप्रसाद सोंगी भजनी मंडळानं मराठी माणसाला आजअखेर या भजनात दंग केले आहे.

सत्तरच्या दशकात या गाण्यानं मराठी मनाला घातलेली भुरळ आजही कायम आहे. हे भजन अध्यात्माची गोडी लावतं....हे एक प्रातिनिधिक उदाहरण. (Maharashtra Culture Songi Bhajan a unique tradition of Kolhapur)

सोंगी भजनातील अनेक कलाकार, वादकांना चित्रपती व्ही. शांताराम, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, दादा कोंडके अशा दिग्गजांनी आपल्या चित्रपटांत हमखास स्थान दिलं. भजनसम्राट एस. विठ्ठल, पी. माजगावकर अशी नावांची ही यादी मोठी आहे. अस्सल कोल्हापुरी लोककला म्हणून कोल्हापूरने आजही तितक्याच ताकदीने ही परंपरा जपली आहे.

कोल्हापूर शहरातल्या बहुतांश तालमींत कैक वर्षांची भजनाची परंपरा आहे. त्यातही सोंगी भजन असणाऱ्या मंडळांची संख्याही वेगळी. भजनी मंडळांच्या सकस स्पर्धेतूनच सोंगामध्ये थेट हत्ती, घोडे आणून भजनाला भव्यता देण्याचा प्रयत्नही काही मंडळांनी केला.

त्याच्या आठवणी आजही सांगितल्या जातात. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ही परंपरा कायम आहे. सर्वसाधारणपणे पावसाळा संपला की श्रावण महिन्यात या भजनातल्या दिमड्या, टाळ, चिपळ्या बाहेर पडतात आणि श्रावण सोमवारच्या निमित्तानं भजनं रंगू लागतात.

Songi Bhajan Kirtan
असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

यानिमित्तानं ‘हे भोळ्या शंकरा ऽऽऽ आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची...’ असे शिवमहिमा सांगणारे अभंग आणि सोंगे सादर होतात. मोहरमच्या निमित्तानेही मानाच्या पंजांपुढं ही भजने रंगतात तेंव्हा मग ‘ ये दावलमलिका, आवड तुला धुपाची...’ असे सूर उमटतात. एकूणच कोल्हापूरनं सांस्कृतिक वारसा जपताना नेहमीच त्याला सामाजिक एकात्मतेची झालर दिली आणि ऐक्‍याचा वारसाही तितक्‍याच आत्मियतेने जपला आहे.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील विचार केला तर दत्तपंथी, विठ्ठलपंथी भजनांची संख्या मोठी आहे. त्यातही दत्तपंथी भजन विशेष लोकप्रिय आहे. या भजनांचे वैशिष्ट्य म्हणजे काही अभंगांना किंवा भजनांना चित्रपट गीतांच्या चालीही लावता येतात.

अगदी ‘पुंडलिकाने काय केले, मायबाप राबवले’ या अभंगाला ‘डफलीवाले डफली बजा’, ‘धन्य देवा तुझी करणी’ अभंगाला ‘ बिलनशी नागीण निघाली' तर ‘ती तीन शिरे सहा हात' या श्री दत्तात्रयांच्या महात्म्य सांगणाऱ्या अभंगाला "ये नीले गगन के तलें' अशा गीतांच्या चालीही लावल्या गेल्या आहेत आणि त्यामुळेच त्या लोकप्रियही झाल्या आहेत.

बदलत्या काळानुसार या चालीही बदलत असल्या तरी त्यातील आध्यात्मिक आनंदोत्सव, देव-देवतांची स्तुती हा मुख्य उद्देश कायम आहे आणि लोकरंजनातून प्रबोधनाची परंपराही त्यातून जपली गेली आहे.

कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठ हा जुन्या शहराचा भाग. याच परिसरात १९७२ साली शिवप्रसाद सोंगी भजन मंडळाची स्थापना झाली आणि या मंडळाच्या भजनांचे कार्यक्रम सर्वत्र होऊ लागले.

पुढे दोन वर्षांनी चित्रपती व्ही. शांताराम यांच्या "झुंज' चित्रपटाचे चित्रीकरण शांतकिरण स्टुडिओत सुरू होते. मात्र, शांतारामबापूंचा मुक्काम पन्हाळ्यावर असायचा.

चित्रीकरण आटोपून रात्रीच्या सुमारास गंगावेसच्या पंपावर पेट्रोल भरण्यासाठी त्यांची गाडी थांबली आणि शांतारामबापूंच्या कानी टिपेला पोचलेले भजनाचे सूर आले, " दत्त दर्शनाला जायाचं नि जायाचं, जायाचं...!'' "आता लगीच काय?'' "लगीच, लगीच!...'' शांतारामबापू हे भजन ऐकून भारावून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच अभंग म्हणणाऱ्या रघुनाथ साळोखे यांच्या उत्तरेश्‍वरातील घराच्या दारात त्यांचे मॅनेजर हजर झाले.

त्याच दिवशी दुपारी स्टुडिओत भजन रंगले. एखाद्या चेंडूलाही लाजवेल अशा पद्धतीनं उड्या मारत चिपळ्या नाचवण्याचे रघुनाथ साळोखे यांचे कसब पाहून शांतारामबापूंसह किरण शांताराम, अभिनेत्री संध्या ही मंडळी आणखी भारावून गेले.

पुढं हे ‘झुंज' फेम भजन म्हणून नावारूपाला आले आणि यानिमित्ताने जगभरातील मराठी माणसांना अनोखे दत्तदर्शन घडले.

खाली पहा हेच ते सोंगीभजन-

कोल्हापूरची सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आणि त्यातून साधल्या गेलेल्या एकोप्यावर आधारित अमान मोमीन यांच्या ‘मी कोल्हापुरी’ या कार्यक्रमाने जगभरातील मराठी माणसांना भुरळ घातली होती. मोमीन मुळचे कोल्हापूरचे. पण, पुढं अमेरिकेत स्थायिक झालेले.

त्यांच्या कार्यक्रमाच्या कॅसेटही बेस्टसेलर ठरल्या होत्या. तत्कालीन परिस्थितीतील ‘‘आज नमाज जरा जल्दी पढना है, शाम को भजना को जाने का है ना’’ असे गल्लीगल्लीतले संवाद असोत किंवा मुस्लीम कलाकारांनी साकारलेल्या रामायणातील विविध भूमिका, सोंगी भजनातील विविध गमतीजमती ते अगदी खुमासदारपणे वर्णन करायचे. आजही त्यांच्या या कार्यक्रमाच्या ऑडिओ क्‍लिप "यू ट्यूब'वर उपलब्ध आहेत.

शिवाजी चौक आणि भजनांची स्पर्धा
कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती परिसर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक. याच परिसरातील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने गेली ३९ वर्षे सोंगी भजनी स्पर्धांची परंपरा जपली आहे. नवरात्रोत्सव काळात नऊ दिवस ही स्पर्धा चालते.

कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच सांगली, बेळगाव परिसरातूनही स्पर्धेत भजनी मंडळे सहभागी होतात. पण, कोल्हापुरातील मंडळांच्या सोंगांची वैशिष्ट्ये वेगळीच राहिली आहेत. त्याला अस्सल कोल्हापुरी संवाद आणि सर्जनशीलतेची झालर हमखास असते. सोंगी भजनाची लोककला जपली जावी, याच उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

सोंगी भजनांचा खर्चही बदलत्या काळानुसार वाढू लागला. त्यामुळे मग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांसाठी प्रवास भत्त्याची सोयही आता प्रत्येक वर्षी केली जाते. त्याशिवाय बक्षिसांच्या रक्कमेतही वाढ करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात आणि त्यांना स्पर्धेच्या निमित्ताने सोंगी भजन अनुभवता येते. नवी पिढीही आता सोंगी भजनात रमली आहे. जिल्ह्यात चाळीसहून अधिक भजनी मंडळे असून येथून पुढेही स्पर्धेची परंपरा कायम ठेवली जाणार असल्याचे स्पर्धा समितीचे अध्यक्ष पोपट मुसळे सांगतात.

खास परीक्षणासाठी कोल्हापुरात
छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाची स्पर्धा ही सोंगी भजन क्षेत्रात प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेचे पूर्वी बाळ जमेनीस परीक्षण करायचे. त्यांच्यानंतर प्रा. संजीवनी तोरो गेली दीड दशक या स्पर्धेचे परीक्षण करतात.

सध्यस्थिती पहाता तोरो दांपत्य कधी पुण्यात, कधी मुंबईत; तर कधी अमेरिकेत मुलांकडे असते. मात्र, खास नवरात्रोत्सव आणि स्पर्धेसाठी हे दांपत्य हमखास कोल्हापुरात येते.

प्रा. तोरो सांगतात, ‘‘कोल्हापूरची सोंगी भजनी परंपरा देशाच्या पाठीवर कुठेही पहाता येणार नाही, इतकी ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्पर्धेत आम्ही प्रत्येक वर्षी मंडळांना एखादा सामाजिक विषय देतो आणि त्यावर प्रत्येक सहभागी मंडळाने एक सोंग सादर करायचे असते.

राजर्षी शाहूंच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त यंदा राजर्षी शाहूंचे सामाजिक कार्य हा विषय देण्यात आला होता. सध्या पुण्यात आहे आणि पुण्यातही या मंडळांना निमंत्रित करून स्पर्धा घेण्याचा विचार आहे.‘‘

Songi Bhajan Kirtan
Dnyaneshwari: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

व्यसनमुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत

सोंगी भजनांची परंपरा नेटाने पुढे नेण्यामध्ये स्वामीसमर्थ भक्तांचेही मोठे योगदान आहे. मगरमठी (संभाजीनगर) येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, ओम श्री चैतन्य भजनी मंडळ, स्वामी दरबार, शनिवार पेठेतील बाल स्वामी समर्थ भजन आदी भजनी मंडळांनी वीस वर्षापूर्वी आणखी एक नवी परंपरा सुरू केली.

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत अर्थात एकतीस डिसेंबरला सर्वत्र स्नेहभोजन, पार्ट्या सुरू असताना ही सारी मंडळी अक्कलकोटला जातात.

३१ डिसेंबरच्या रात्री अक्कलकोट येथे रात्रभर भजन सादर करतात. रात्री बारानंतर भजन आणि दीपोत्सवातच नव्या वर्षाचे स्वागत होते. एक जानेवारीला सकाळी ही सारी मंडळी व्यसनमुक्तीचा संकल्प करतात.

या उपक्रमामुळे गेल्या वीस वर्षात अनेक जण व्यसनमुक्त झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यंदाही ही मंडळी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अक्कलकोटला रवाना होणार आहेत.

असेही पुढचे पाऊल
शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून आता कोल्हापूरसह विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अशा लोककलांचा नव्याने अभ्यास सुरू झाला आहे. त्याशिवाय सोंगी भजनातील नवी पिढीही भजनाबरोबरच गायन, वादनाबरोबरच अभिनयातील करिअर म्हणूनही सोंगी भजनाकडे पहाते आहे.

सोंगी भजनातील बहुतांश तरूण मंडळी विविध वाद्यवृंदाच्या माध्यमातूनही कलेची सेवा करतात. अशाच नऊ कलाकार व वादकांनी नुकताच अमेरिकेचा दौरा पूर्ण केला आहे.

अडीच महिने ही मंडळी अमेरिकेत होती आणि तेथील विविध वीस ठिकाणी त्यांनी देशभक्तिपर, भाव-भक्तीगीत आणि चित्रपट गीतांच्याही मैफली सादर करत तेथील रसिकांची मने जिंकली.

स्त्री पात्र करतात पुरूषच...
बदलत्या काळाबरोबर विविध लोककला बदलत गेल्या. सोंगी भजनाचा विचार केला तर पूर्वी जिलेटिन पेपर लावून प्रकाशयोजना असायची. पण, आता अत्याधुनिक प्रकाशयोजना भजनात आली. अत्याधुनिक वाद्यांचाही समावेश होऊ लागला.

पण, कोल्हापुरातील भजनी मंडळांनी आजही सोंगामध्ये पुरुष कलाकारांनीच स्त्री पात्र साकारण्याची परंपरा कायम ठेवली आहे. अलीकडच्या काळात काही महिला मंडळांनीही सोंगी भजने सुरू केली आहेत आणि त्यातील सर्व सोंगं महिलाच साकारतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.