खरचं रामायणातली 'संजिवनी बुटी' सापडली?
रामायणातील संजीवनी वनस्पतीचा शोध अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर काही शोधनिबंधनही प्रकाशित झाले आहेत. उत्तराखंडमधील आयुष विभागाने 'संजिवनी बुटी'च्या शोधासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. यापूर्वीही या संदर्भात संशोधन झालेले आहे. याच संशोधनाच्या आधारावर 'सिलाजीनेला ब्रायोपटेरीस' ही वनस्पती रामायणातील 'संजिवनी बुटी' असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. या वनस्पतीची वैशिष्ट्ये आणि त्याचे उपयोग आणि आढळ विचारात घेता ही वनस्पती रामायणातील 'संजिवनी बुटी' असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. डॉ. संदीप पांडे, आरती शुक्ला, सुप्रिया पांडे, अंकिता पांडे या संशोधकांच्या गटाने सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती उष्माघात, उष्णतेमुळे झालेले विकार, खोलवर झालेल्या जखमा, सूर्यप्रकाशामुळे त्वचेवरील मृत झालेल्या पेशी, स्त्रियांचे प्रजननासंबंधीचे आजार आदीवर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. के. एम. गणेशाय, आर. वासुदेवा आणि आर. उमाशंकर या संशोधकांनी लक्ष्मणास मृच्छित अवस्थेतून बाहेर काढणारी संजीवनी वनस्पती सिलाजीनेला असल्याचे काही उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. उष्णतेच्या झटक्यामुळे किंवा तडाख्यामुळे, तसेच बाणातील विषामुळे लक्ष्मण मृच्छित पडला होता. सिलाजीनेला ही वनस्पती उष्माघात आणि विषामुळे आलेली कोमावस्था यांवरील औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते. यामुळे ही वनस्पती 'संजिवनी बुटी' असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
संजीवनी वनस्पतीची वैशिष्ट्ये
सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती फर्न नेचे वर्गीय वनस्पतीमध्ये मोडते. वाढीसाठी पाणी मिळाले नाही, तर ही वनस्पती सुकते. पण, तिच्यातील जिवंतपणा कायम असतो. पुन्हा तिला पाणी मिळाल्यास ती फुलते, टवटवीत होते. ही वनस्पती मातीत व दगडावरही वाढते. हिमाचल प्रदेशातील कैलास आणि वृषभ पर्वतरांगांमध्ये ही वनस्पती मुख्यतः आढळते. उत्तरांचल भागातील डोंगर रांगांमधील जोशीमठ, कुमिन, गढवाल येथेही ती आढळते. अरवली पर्वत रांगा, तसेच मध्य प्रदेशातील सातपुडा, बिलासपूर, होशांगबाद, जबलपूर, अमरकंटक चिंदवाडा, बेतुल, सेहोरे या भागामध्येही वनस्पती आढळते.
रामायणातील उल्लेखावरून वनस्पतीचे चार प्रमुख गुणधर्म
- मीथ्रा संजीवनी - पुनर्जन्म करणारी किंवा पूर्णजिवीत करणारी
- विशल्या करिणी - बाण काढण्यासाठी उपयुक्त
- सवर्णकरिणी - हाड मोडल्यावर ते जोडण्यासाठी उपयुक्त
- संघानकर्णी - त्वचेचा रंग उजळणारी.
संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पती
- शास्त्रीय नाव - क्रेसा क्रिटीका ः स्थानिक संस्कृत नाव - संजिवनी, रुदंती, अमृतअश्रावा, मधुश्रावा, रोमांचिका
- शास्त्रीय नाव - सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस ः स्थानिक संस्कृत नाव - संजिवनी, संजिवनी बुटी
- शास्त्रीय नाव - डेसमोट्रीकम फिमब्राटम ः स्थानिक संस्कृत नाव - जीवाका, जीवा, जीवाभद्रा, जीवावनी, जीवंथी, जीवपाथ्रा, जीवापुष्पा, जीववर्धीनी, जीवधात्री, जीवया, रक्थंती, यशस्या, सुखंकारी, प्रांधा
- मालाकसी ऍक्युमिनॅटा - जीवाका
- मालाक्सी वालिची
- मायक्रोस्टायलीस वाल्लीची - जीवाका, रिश्वन
- ट्रीचोपुस झिलानिक्युस - जीवा
- टर्मिनालिया चेबुला - जीवंथी, जीवंतिका, चेथ्रा
संशोधकांनी शोधलेल्या संजीवनी
स्थानिक भाषेत संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. त्यातील सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस, क्रेसा क्रिटीका, डेसमोट्रायकम् फिम्ब्रियाटम या तीन वनस्पतीवर संशोधकांनी सखोल अभ्यास केला. त्यामध्ये सिलाजीनेला ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याची संशोधकांनी शक्यता व्यक्त केली.
पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संजीवनी वनस्पतीच्या मुलस्थानावरून शोध
भगवान हनुमानाने संजिवनी वनस्पती ही पर्वतरांगामध्ये शोधल्याचा उल्लेख रामायणात आढळतो यावरून ही वनस्पती निश्चितच पर्वतरांगामध्ये असणार हे निश्चित. संजिवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस, क्रेसा क्रिटीका, डेसमोट्रायकम् फिम्ब्रियाटम या वनस्पती पैकी क्रेसा क्रिटीका या वनस्पतीचा आधिवास हा कोरड्या असणाऱ्या दख्खनच्या पठारावर आढळते. ही वनस्पती पर्वतरांगामध्ये आढळत नाही. यावरून संजिवनी म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती रामायणातील संजिवनी नसल्याचा तर्क संशोधकांनी मांडला आहे. सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती उष्णकटीबंधीय पर्वतरांगातील जंगलात आढळते तर डेसमोट्रायकम् फिम्ब्रियाटम ही वनस्पती पर्वतरांगामध्ये आढळते. यावरून या दोन्ही वनस्पतींवर संशोधकांनी भर दिला.
लक्ष्मणाच्या मुर्छीतावस्थेवर संशोधन
मज्जासंस्थेतील बिघाडामुळे अनेकजण कित्येकवर्षे कोमात असतात आणि अचानक त्यांना जागृती येते. अशाप्रकारे मृत्यूच्या दाढेतून पुन्हा जीवंत झालेल्या व्यक्तींची अनेक उदाहरण घडली आहेत. विषामुळे किंवा उष्णतेच्या तडाख्यामुळे अनेकजण कोमात जातात. लक्ष्मणाच्या बाबतही असाच प्रकार घडला असावा, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. बाणातील विषातून किंवा उष्णतेच्या तडाख्याने लक्ष्मण बेशुद्धावस्थेत गेला असावा आणि संजिवनी बुटीमुळे त्याला पुन्हा जीवंत होता आले. कोमातून तो बाहेर आला. याचाच अर्थ संजिवनी ही वनस्पती कोमातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी वापरता येऊ शकते. याचाच अर्थ या वनस्पतीमध्ये ते औषधी गुणधर्म असायला हवेत. अशी ती वनस्पती आहे. हे विचारात घेऊन संशोधकांनी अशा पद्धतीच्या वनस्पतींचा अभ्यास केला.
मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अशा लागला वनस्पतीचा शोध
काट्याने काटा काढणे ही आपल्याकडे म्हण आहे. पण प्रत्यक्षात शास्त्रावर हे आधारित आहे. गोकर्णचे फुल कानाच्या आकाराचे असते. या फुलाच्या आकारावरून गोकर्ण हे कानाच्या विकारावरील औषधी तयार करण्यासाठी वापरले जाते. एखादे पान हृद्ययाच्या आकाराचे असेल तर ते हृद्य रोगावर गुणकारी समजले जाते. उदाहरणार्थ गुळवेलचे किंवा खाऊचे पान. गुंजाच्या बिया डोळ्याच्या आकाराच्या असतात. तर त्या डोळ्याच्या विकारवरील औषधी तयार करण्यासाठी वापरल्या जातात. आक्रोड या फळावर मेंदुवर जशा रेषा असतात तशा रेषा आहेत यावरून मेंदूतील विकारावर यापासून औषधी तयार करण्यासाठी वापर केला जातो. संशोधकांनी अशाच गुणधर्मावरून संजिवनी या वनस्पतीचा शोध घेतला आहे. सिलाजीनेला ब्रायोपटेरीस या वनस्पतीचे वैशिष्ट्य असे की पाणी मिळाले नाही तर ही वनस्पती सुकते. पण मृत होत नाही. त्यातील जीवंतपणा टिकूण राहतो. जेव्हा या वनस्पतीला पुन्हा पाणी मिळाले तर, ती पुन्हा टवटवीत होते. याच गुणधर्मावरून ही वनस्पती कोम्यामध्ये किंवा बेशुद्धावस्थेत असलेल्या व्यक्तीवर गुणकारी ठरू शकते, असे अनुमान मांडण्यात आले. सिलाजीनेला ब्रायोपटेरीस, डेसमोट्रायकम् फिम्ब्रियाटम या नेचे वर्गीय वनस्पती आहेत. यातील सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती ऋषीकेश, हरिद्वार, वाराणसी आदी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी संजीवनी म्हणून विक्री केली जाते. ही वनस्पती पाणी मिळाले नाही तरी, जीवंत राहू शकते व पुन्हा पाणी मिळाल्यानंतर ती पुन्हा टवटवीत होते. असे गुणधर्म तिच्यात आढळतात. पण कोमामधील व्यक्तीवर तिचा औषधी म्हणून उपयोग होऊ शकतो का याची नोंद मात्र नाही. पण यावर अधिक संशोधनाची गरज आहे, असे संशोधकांना वाटते.
संशोधनाची संधी
संजीवनी ही वनस्पती पाण्याशिवाय बरेच दिवस जगू शकते, परंतु, त्याकाळात या वनस्पतींची पाने सुकतात व रंग फिका पडतो. ज्यावेळी वनस्पतीस पाणी उपलब्ध होते, त्यावेळेस परत रंग हिरवा होतो. या वनस्पतीत साखरेचे प्रमाण जास्त आहे. तसेच गलेक्टिनॉल व रफीनोस ही रसायने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने या वनस्पतींच्या पेशी लवकर मरत नाहीत, कारण ही रसायने पेशीचे निर्जलीकरण थांबवतात. या वनस्पतींमध्ये असणारा हा पुनर्जीवित होण्याचा गुण व त्यासाठी कारणीभूत असणारा जनुक (जीन) जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे वेगळा करून तो दुष्काळी भागातील वनस्पतीमध्ये स्थलांतरित करून दुष्काळी भागातील वनस्पतींचे संवर्धन करता येऊ शकेल. या दृष्टीने संशोधनाची संधी आहे, असे संशोधकांना वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.