उच्च शिक्षणाला व्हावा संत साहित्याचा स्पर्श
राहुल विश्वनाथ कराड
संत साहित्य जगण्याबाबत सम्यक दृष्टी देते. सध्याच्या भौतिक युगात त्याचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास सर्वांगीण उन्नतीला ते उपयुक्त ठरेल, अशी भूमिका याबाबतच्या परिषदेत मांडली गेली. परिषदेच्या कामकाजाचा गोषवारा...
उच्च शिक्षणात संत साहित्य असावे, अशा मूलभूत विचारावर मंथन घडवणारी पहिली परिषद नुकतीच दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडली. परिषदेचे आयोजन पुण्याच्या एमआयटी, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने केले होते. आजच्या भौतिकवादी, आधुनिक जगात संत साहित्याचा उच्च शिक्षणात अंतर्भाव व्हावा, असे म्हणण्याचे धाडस कोणीही करत नाही. त्या पार्श्वभूमीवर या परिषदेची सैद्धान्तिक भूमिका समजून घेतली पाहिजे. ज्या संतांनी आपल्या तपसाधनेतून समाजाच्या जीवनमूल्यांच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित केले, त्यांच्या या साहित्यात खऱ्या अर्थाने शिक्षणाचे सत्त्व आहे. म्हणून अशा एकूणच जीवनसिद्धान्तांचे मूल्य सांगणारे संत साहित्य उच्च शिक्षणात असावे, ही भूमिका लक्षात घ्यावी लागेल.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा प्रमुख म्हणून परिषदेमागील भूमिका मांडणे मला आवश्यक वाटते. आजच्या विज्ञान, तंत्रज्ञान युगात शिक्षणाला परिपूर्णता यायची असेल तर संत साहित्याचा उच्च शिक्षणात समावेश अनिवार्य ठरतो. संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड गेली चाळीस वर्षे हाच विचार मांडताहेत. चार दिवसांच्या ऑनलाईन परिषदेत ज्येष्ठ अभ्यासकांनी मते मांडली. प्रत्येक वक्त्याने संत साहित्याच्या उच्चशिक्षणात अंतर्भावावर भर दिला. त्याच्या उपयुक्ततेवर मूलगामी चिंतन मांडले. उदाहरणच द्यायचे तर, डॉ. सदानंद मोरे यांनी, ‘‘मानव कल्याणाचे आणि रक्षणाचे तत्त्वज्ञान संतांनी मांडले. अशा तत्त्वज्ञानाची शिकवण काळाची गरज ठरते. पाश्चात्त्य देशांमध्ये वेगवेगळ्या धर्मांत तत्त्वज्ञानाचाच प्रभाव आहे,’’ हे स्पष्ट केले. एकूण जीवनाविषयीचे औचित्य सिद्ध करण्याकरिता संत साहित्य उच्च शिक्षणात असावे, हा परिषदेच्या मंथनातून नवनिताच्या स्वरूपात बाहेर आलेला निष्कर्ष सर्वांत मोठी जमेची बाजू आहे.
आत्मविश्वास जागवला
जसजसे विज्ञान, तंत्रज्ञान बदलते... तसतसा काळ बदलतो. परंतु सर्व काळाला पुरून उरणारे संत साहित्य हे एखाद्या अचल मेरूपर्वताप्रमाणे आहे. त्याला मध्यवर्ती ठेवून काळानुरूप येणाऱ्या विचारांचे मंथन जर वेळोवेळी झाले तर त्यातून अमृतच हाती लागेल, इतका आत्मविश्वास संतसाहित्य आपल्याला देते. तो आत्मविश्वास जागवण्याचे काम या पहिल्या संत साहित्य उच्च शिक्षण परिषदेने केले. संत साहित्य प्रामुख्याने समग्र सृष्टीचे आणि जीवनव्यवहाराचे चिंतन करणारे साहित्य मानले जाते. याला भावनात्मक बाजू आहे, नाही असे नाही. परंतु विज्ञानयुगाच्या प्रभावामध्ये आपली भूमिका नेमकी काय, हे ठरवले पाहिजे. म्हणजे जो काही प्रवाह सध्या आहे, त्यात सहभागी व्हायचे. त्यातल्या गलबताचे नियंत्रण आपल्याकडे घ्यायचे की प्रवाहपतीत व्हायचे, याचा निर्णय करता आला पाहिजे. या सगळ्या प्रवाहामध्ये संत साहित्य कुशल खलाशाची भूमिका पार पाडू शकते.
केंब्रिज, ऑक्सफर्ड यांसारख्या विद्यापीठांमधून जगातल्या संत साहित्यांचा अभ्यास होतो. संत साहित्य केवळ अध्यात्माचे आणि भक्तीचे आहे, असा परंपरागत समज दूर केला पाहिजे. संत साहित्य संपूर्ण सृष्टीचे चिंतन करून जीवनविषयक श्रद्धेचे शिक्षण देते. हाच भक्तीचा किंवा धर्माचा शिक्का कायम ठेवला, तर इंग्रजी साहित्यातला प्रसिद्ध कवी जॉन मिल्टन याचे ‘पॅराडाईज लॉस्ट’ किंवा इटालियन कवी डान्टेने लिहिलेले ‘डिव्हाईन कॉमेडी’, एवढे कशाला जोहान गटेसारख्या तत्त्वचिंतकाने लिहिलेली ‘फाउस्ट’ ही शोकांतिकासुद्धा धर्मपर मानावी लागेल. किंवा त्यांच्या साहित्य-वाङ्मयाचे वेगळे वर्गीकरण करावे लागेल. भारतीय संस्कृती ज्या स्वरूपात विकसित झाली, त्याला सर्वंकष जीवनतत्त्वाची मोठी जोड होती.