चारशे वर्षानंतरही तुकोबांचे अभंग दिशादर्शक
मंगेश पांडे
श्री संत तुकाराम महाराज म्हटले की, त्यांचे अभंग डोळ्यासमोर उभे राहतात. आपल्या अभंगातून त्यांनी समाजाला दिशा दिली. समाजातील वाईट प्रवृत्ती दूर करून प्रबोधन केले. विठ्ठल भक्त असलेल्या तुकोबारायांचे विचार प्रेरणादायी आहेत. या महान संतांचा जन्म महाराष्ट्रातीलच एका गावात झाला. जाणून घेऊ त्यांच्या गावाविषयी....
पुणे जिल्ह्यातील पुणे शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र देहू येथे सोळाव्या शतकात तुकोबारायांचा जन्म झाला (माघ शुद्ध पंचमी). पंढरपूरचा पांडुरंग हे त्यांचे दैवत. तुकोबारायांनी अनेक अभंग लिहिले, त्यातून विविध गोष्टींवर परखड भाष्य केले. चारशे वर्षानंतरही त्यांचे अभंग दिशादर्शक ठरत आहेत. देहूतील इंद्रायणी नदीलगत असलेल्या मुख्य देऊळवाड्याच्या उजव्या बाजूलाच तुकोबारायांचे राहते घर आहे. येथे तुकोबारायांची मूर्ती असून दररोज पूजा होते. दर्शनासाठी हे घर खुले असते. अनेक भाविक याठिकाणी येत असतात. घरापासूनच जवळ असलेल्या देऊळवाड्यात विठ्ठल रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती आहे. तुकोबारायांनी याच मूर्तीची भक्ती केली. येथे भजन, कीर्तन करायचे. या मूर्तीसमोरच भव्य भजनी मंडप असून आजही येथे राम कृष्ण हरीचा गजर सुरु असतो. या मंडपावर देवदेवतांच्या मुर्ती कोरल्या आहेत. संपूर्ण देऊळवाडा दगडात बांधलेला आहे. या देऊळवाड्यात तुकोबारायांच्या शिळा मंदिरासह गणपती, हनुमान, श्रीराम व महादेवाचेही मंदिर आहे. शिळा मंदिरातील शिळा म्हणजे म्हणजेच तुकोबारांयांची गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्यानंतर तुकोबाराय ज्या शिळेवर (पाषाण) अनुष्ठानाला बसले होते ती शिळा होय. ही शिळा आजही या मंदिरात आहे. सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. लाखो भाविक या शिळेवर नतमस्तक होतात.