डॉ. मंगला मिरासदारमेघदूतम्, अभिज्ञान शाकुन्तलम्, रघुवंशम् यांसारख्या अभिजात कलाकृती निर्माण करणाऱ्या कविकुलगुरू कालिदासाच्या आणखी एका अनोख्या पैलूविषयी आज ‘आषाढस्य प्रथम दिवसें’ अर्थात महाकवी कालिदास दिनाच्या निमित्ताने....कविता कामिनीचा ‘विलास’ असे ज्याचे वर्णन केले जाते तो महाकवी कालिदास उत्तम राजनीतिज्ञ होता यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही; कारण उपजत प्रतिभा, शास्त्राभ्यास आणि लोकव्यवहाराची जाण या तीन गोष्टींच्या संयोगातूनच उत्तम काव्याची निर्मिती होत असते.कालिदासाचा राजनीतीचा अभ्यास त्याच्या रघुवंशम् या महाकाव्यातून स्पष्टरूपाने दिसतो. रघुवंशातील आदर्श राजांचे वर्णन वाचताना राजनीतीचे प्रतिबिंबित झालेले ज्ञान रसहीन तर मुळीच वाटत नाही, उलट कालिदासाच्या भाषासौंदर्यात त्यामुळे जास्तच भर पडली आहे.प्राचीन राजनीतिशास्त्राचे अनेक ग्रंथ असले, तरी राजनैतिक संकल्पना योजताना कौटिलीय अर्थशास्त्राचा प्रभाव स्पष्ट जाणवतो आणि त्या मूळ संकल्पना माहीत नसतील तर त्याच्या काही उपमासौंदर्याचा व वर्णनाचा आस्वादही घेता येत नाही. रघुवंशम्मध्ये अगदी सुरुवातीलाच दिलीप राजाचे वर्णन आहे. दिलीप व त्याची पत्नी सुदक्षिणा वसिष्ठमुनींच्या आश्रमात जातात तेव्हा दिलीप त्यांना म्हणतो, ‘आपल्या आशीर्वादानेच माझ्या सप्तांगक राज्याचे कल्याण होत आहे.’ प्राचीन राजनीतीतील ‘सप्तांगक’ राज्याची (स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दण्ड, मित्र/ शत्रू) संकल्पना अशी सुरुवातीसच येते. राजा दिलीपाच्या प्रजापालनाचे वर्णन कालिदासाने ‘ दिलीप-सिंह’ संवादातून केले आहे. वसिष्ठाश्रमात दिलीप नंदिनी गायीची सेवा करीत असताना एक सिंह नंदिनीवर झडप घेतो त्यावेळी सिंह मनुष्यवाणीने म्हणतो, “राजा, ही गाय माझे खाद्य आहे; तू राजा असल्याने दुसऱ्या अनेक गाई गुरूंना देऊ शकशील.” त्यावर दिलीप म्हणतो, “ही गाय माझ्या रक्षणाखाली आहे त्यामुळे प्रसंगी माझे प्राण देऊनही मी माझे क्षत्रिय कर्तव्य करीन.” त्यावेळी सिंह म्हणतो, “तू प्रजानाथ आहेस, प्रजेचे रक्षण पित्याप्रमाणे करीत आहेस. एका क्षुल्लक गाईसाठी आपले प्राण का देतोस?” पित्याप्रमाणे प्रजेचे रक्षण व पालन करावे हा आदर्श ‘पितेव अनुगृह्यीयात्’ या वाक्यातून अर्थशास्त्रात अनेक वेळा प्रकट झाला आहे. त्यामुळे दिलीप हाच प्रजेचा खरा पिता होता; बाकी केवळ ‘जन्मदाते!’राजा हा सुशिक्षित, सुसंस्कारित असला पाहिजे यावर प्राचीन राजनीतीचा कटाक्ष होता. ‘विनय’ म्हणजे ज्ञान किंवा शिक्षण. ते दोन प्रकारचे असते. स्वाभाविक आणि कृत्रिम! दिलीपपुत्र रघु हा ‘निसर्गसंस्कारविनीत’ होता. चार सागर सहजपणे ओलांडावे अशा चार विद्या त्याने सहज आत्मसात केल्या होत्या. या चार विद्यांचा (आन्वीक्षिकी म्हणजे सारासारविवेक, त्रयी, वार्ता (कृषि-पशुपालन-व्यापार), दण्डनीति या विद्यांचा आग्रह कौटिल्याने धरला आहे. (चतरत्र एव विद्या इति कौटिल्यः।) .योग्य शिक्षणाच्या अभावी दुर्गुणी राजपुत्रसुद्धा वाईट मार्गांनी राज्य बळकावतात; रघुपुत्र अज याला मात्र सहजपणे वंशपरंपरेने चालत आलेल्या राज्याचा लोभ नव्हता; त्याने केवळ ‘पित्याची आज्ञा’ मानून त्याचा स्वीकार केला. राजे हे अनेक पत्निक असल्याने अंतःपुरात सर्व वर्णाच्या स्त्रिया असत, त्यामुळे क्रम न लागणारे महत्त्वाकांक्षी राजपुत्र बळजबरीने राज्याचा ताबा मिळवत. कौटिल्याने याचा निर्देश केला आहे. ‘कर्कटक सधर्माणः (खेकड्याच्या जातीचे) जनक भक्ष्याः राजपुत्राः।’आत्मसंयमनाची किंवा इंद्रिय निग्रहाची आवश्यकता तत्त्वज्ञानाच्या प्रांतातली असे आपल्याला वाटते, पण प्राचीन राजनीतिज्ञ ही आवश्यकता राजासाठीही अत्यंत महत्त्वाची मानतात. कौटिल्याने तर हे सर्व शास्त्रच इंद्रियजयाचे मानले आहे. (कृत्स्नं हि शास्त्रामिदमिन्द्रिय जयः।) रघुवंशातले सर्वच राजे षड्रिपूंना जिंकणारे होते. राजासाठी आखून दिलेल्या दिनक्रमाप्रमाणे या राजांचा आदर्श दिनक्रम होता. विशेषतः अतिथी या राजाच्या बाबतीत हे वर्णन आहे. प्रजेचा क्रोध होईल अशी कारणेच तो उत्पन्न होऊ देत नव्हता! दिलीपाच्या राज्यात तर प्रजा इतकी निर्भय होती, की विहारासाठी गेलेल्या स्त्रियांची वस्त्रेसुद्धा उडवायला कोणी धजत नव्हता! दण्डशक्तींच्या बाबतीत हे राजे अतितीक्ष्ण किंवा अतिमृदु नव्हते तर दण्डशक्तीचा यथायोग्य उपयोग करणारे होते.एखाद्या ठिकाणची आत्यंतिक दाट लोकवस्ती सोयीसाठी दुसरीकडे हलविण्याची आणि नवीन वसाहत स्थापण्याची अर्थशास्त्रीय संकल्पना कालिदासाने विशेष शब्दासह घेतली आहे. लवणासुराचा वध केल्यावर शत्रुघ्नाने मथुरेला नवीन राजधानीची स्थापना केली. राजाच्या उत्तम प्रशासनामुळे प्रजेचे वैभव वाढलेले पाहून असे वाटत होते, की स्वर्गातील उत्तमोत्तम गोष्टी आणून ही राजधानी वसवली आहे. या संदर्भात ‘अभिष्यन्दवमन’ हा राजनीतीतील वेगळाच शब्द कालिदासाने उपमेसाठी सहजपणे गुंफला आहे.‘विजिगीषा’ किंवा चक्रवर्तिपद ही रघुवंशीय राजांची महत्त्वाकांक्षा होती. समुद्र वलयांकित पृथ्वीच्या सम्राटपदावर आपल्या पराक्रमाने मुद्रा उमटवणे ही प्रत्येक राजाची मनीषा होती. हे सम्राटपद मिळवण्यासाठी रघूने केलेल्या विजययात्रेचे वर्णन कालिदासाने विस्ताराने केले आहे. प्रथम पूर्वेकडे जाऊन वंग, उत्कल, कलिंग यांच्यावर त्याने ‘धर्मविजय’ मिळवला म्हणजे यशस्वी होऊन केवळ पराक्रम प्रस्थापित केला. दक्षिणेकडे कावेरी, मलय ओलांडून पांड्य राजाकडून केरळ जिंकला. पश्चिमेकडे पारसिकांवर जय मिळवून उत्तरेकडे हूण, कम्बोज, कोसल व तेथून प्राग्ज्योतिष, कामरूप पादाक्रांत केला. .रघूने ‘विश्वजित्’ यज्ञ करून मिळवलेल्या सर्व संपत्तीचे प्रजेमध्ये दान करून टाकले. कौत्स नावाच्या शिष्याला गुरूंना देण्यासाठी गुरुदक्षिणा हवी होती. ती मागण्यासाठी तो जेव्हा रघूकडे आला तेव्हा त्याचे आतिथ्य करण्यासाठी रघू मातीचे पात्र घेऊन आला. ते पाहिल्यावर रघूचे ‘निष्कांचनत्व’ जाणून कौत्स परत जाऊ लागला तेव्हा रघूने त्याला थांबण्यास सांगितले व कुबेरावर स्वारी करण्याचा निश्चय केला. रघूच्या पराक्रमाच्या धास्तीने कुबेराने रातोरात रघूच्या खजिन्यामध्ये सुवर्ण नाण्यांचा वर्षाव केला!कथा-काव्यांमध्ये वर्णिलेले राजेलोकांचे अश्वमेध, राजसूय, विश्वजित इत्यादी यज्ञ केवळ त्यांच्या व्यक्तिगत कल्याणापुरते नसत, तर त्या निमित्ताने सर्व प्रजेला त्यात सहभागी करता येऊन मिळालेली संपत्ती प्रजेमध्येच वितरित होत असे. प्रजेकडून कर रूपाने घेतलेले धनही प्रजेला अनेक पटींनी पुन्हा परत मिळत असे. म्हणूनच कालिदासाने म्हटले आहे. ‘आदानं हि विसर्गाय।’सूर्य वाफेच्या रूपाने पाणी घेतो ते सहस्त्रधारांनी परत करण्यासाठीच!अंतर्गत राजनीतीबरोबरच परराष्ट्रसंबंधात मित्रशक्ती वाढवणे, आपले स्थान मजबूत करणे महत्त्वाचे मानले आहे. एका कथेनुसार, कुश राजा एकदा जलविहारासाठी सपरिवार गेला असताना त्याचा ‘जैत्र’ नावाचा अलंकार पाण्यात पडला. तो त्याला वंशपरंपरेने मिळालेला असल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. डोहात राहणाऱ्या कुमुद नागाकडे तो आहे हे कळल्यावर त्याच्यावर कुशाने बाण रोखला. पण त्यापूर्वीच कुमुद नाग आपल्या कुमुदवती नावाच्या सुंदर बहिणीसह वर आला व त्याने आपली बहिण कुशाला अर्पण केली. कुशाने तिच्याशी विवाह करून नागलोकांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. .परराष्ट्रसंबंधाबाबत कौटिल्यप्रणित ‘राजमंडल’ सिद्धांताचे उपयोजनही कालिदासाने काव्यसौंदर्याला बाधा येऊ न देताही अत्यंत सहजपणे केल्याचे दिसते. रावणवधानंतर राम सीतेसह पुष्पक विमानाने अयोध्येकडे येत असताना सीतेला समुद्राची शोभा वर्णन करून सांगत होता, असे वर्णन आहे. समुद्राची विशालता सांगताना राम म्हणाला, पूर्वी पर्वतांना पंख होते. ते उडत जाऊन यज्ञयागादिकात विघ्न आणत. त्यामुळे इंद्राने आपल्या वज्राने त्यांचे पंख कापायला सुरुवात केली. तेव्हा अनेक पर्वत समुद्रात येऊन लपून बसले. जसे दुर्बल राजे ‘मध्यम’ राजाचा आश्रय घेतात! यातील ‘मध्यम’ म्हणजे अत्यंत बलाढ्य राजा! (नृपाश्रयं मध्यममाश्रयन्ते।)‘परातिसंधान’ ही राजनीतिशास्त्रातली विशेष संकल्पना! रघुवंशात, तसेच अभिज्ञान शाकुन्तलम्च्या नाट्यपूर्ण प्रसंगात कालिदासाने ती चपखल बसवली आहे. त्याची प्रतिभा आणि शास्त्रज्ञान एकमेकात पूर्णपणे मिसळून गेले आहे!शकुंतलेशी गांधर्व विवाह करून राजा दुष्यंत राजधानीत परत गेला. कण्वमुनी तीर्थयात्रेहून आल्यावर त्यांना ही विवाहवार्ता समजली व त्यांनी शकुंतलेच्या पाठवणीची तयारी केली. तिच्याबरोबर गौतमी ही तापसी आणि शार्ङ्गरव व शारडत हे दोन ऋषिकुमार पाठवले. तिथे गेल्यावर ‘तू तिच्याशी विवाह केल्याने तिचा पत्नी म्हणून स्वीकार कर असे शार्ङ्गरव म्हणाला, त्यावर राजाने शकुंतलेला ओळखले तर नाहीच पण तिच्याशी विवाह केल्याचेही नाकारले! दुर्वासांच्या शापाचा तो परिणाम होता. राजाचा नकार कायम होता. शकुंतलेने त्यांच्या एकांतातला हरिणपाडसाचा प्रसंग सांगितला, पण राजाने तिलाच दुराचारी ठरवले. त्यावर शार्ङ्गरव आत्यंतिक संतापाने म्हणाला, “जे लोक शत्रूला फसवण्याची नीती ही ‘विद्या’ म्हणून शिकतात ते विश्वासपात्र! आणि हरिणांच्या सहवासात वाढलेली ही निष्पाप आश्रमकन्या मात्र खोटे बोलणारी, हे कोणाला पटेल?” (परातिसंधानं विद्येति अधीयते यैः)राजनीतीतील अनेक संकल्पनांना आपल्या काव्यसौंदर्याच्या कोंदणात सहजपणे बसवणाऱ्या कालिदासाला म्हणूनच ‘राजनीतिज्ञ’ही म्हणावे लागते.(डॉ. मंगला मिरासदार लेखिका व फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या माजी प्रमुख आहेत.)-------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.