नेहा लिमये
मधल्या काळात व्होडाफोनच्या ‘यू आर माय समथिंग समथिंग, हॅलो हनी बनी’मुळे प्रेम, रुसवे-फुगवे, ब्रेकअपची पद्धतच बदलून गेली. त्यातल्या झू-झूच्या क्लिप्सचं कलेक्शन तुमच्या फोनवर नसेल, तर तुम्ही आऊटडेटेड, पाषाणहृदयी! जिंगलचा असाही परिणाम!
संध्याकाळची वेळ. शाळा-कॉलेज-क्लास वगैरे संपवून घरी यायचं. खाऊनपिऊन मित्रमंडळींबरोबर खाली खेळायला हजर. आईच्या हाकांचा चढता स्वर टिपेला पोहोचला, की मगच घरी जायचं. अभ्यास, गृहपाठ वगैरे ‘किरकोळ’ गोष्टी उरकायच्या. मग रात्रीच्या जेवणाची तयारी कर, आईला मदत (की लुडबूड?) कर... असं सगळं होईतोवर घरातली बाकी मंडळी टीव्हीवर समाचार, सिरियल वगैरे बोअर प्रकार बघत असायची.
तेव्हा रिमोट प्रकरण आमच्या हातात येण्याचे चान्सेसही रिमोटच होते. मग आमचा बोअरडम कमी व्हायचा एकच मार्ग... मधून-मधून येणारा कमर्शिअल ब्रेक आणि त्यातल्या जाहिराती! पंधरा, वीस, तीस सेकंदांच्या त्या छोट्या-छोट्या क्लिप्सनं आमचं बालपण, तारुण्य व्यापून टाकलं होतं. प्रत्येक जाहिरात एक छोटीशी गोष्ट सांगायची. आणि गोष्ट कुणाला आवडत नाही?