आनंदी जीवन जगण्यात जर कुठल्या गोष्टीचा अडथळा येत असेल, तर तो आपल्या मनातील विध्वंसक आणि हिंसक प्रवृत्तीचा. ही वृत्ती प्रत्येकात असते; परंतु आपल्या जाणिवांच्या प्रवासात येणाऱ्या चढ-उतारांवर तिचा आपल्याशी होणारा सामना अवलंबून असतो.
आपण माणूस आहोत. आपल्या जाणिवा ज्या मार्गाने वृद्धिंगत होत गेल्या त्यानुसार आपल्यात माणुसकी नावाचा विशेष गुण विकसित होत गेला. या गुणाने आपले इतर सर्व प्राण्यांसोबतचे संबंध आणि आपसांतील दृढ नाते विकसित झाले.
या नात्याने आपल्याला एका धाग्यात विणले. आपल्या जाणिवा विकसित झाल्या, तशी ही वीण अधिकाधिक घट्ट होत गेली. त्यातूनच आपलेपण, जाणीव, प्रेमाबरोबर मत्सर, क्रोध या भावनाही विकसित झाल्या.
विरुद्धलिंगी आकर्षणाला जसे इतर प्राणी अपवाद नाहीत तसाच माणूसही नाही; मात्र त्याला जोडून येणाऱ्या वागणुकीच्या बाबतीत माणूस आणि प्राणी असा भेद करण्यासाठी बरीच परिमाणे आहेत.