AI 2023 : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगाने २०२३ हे वर्ष माणसाच्या इतिहासात अधोरेखित झाले..

२०२३ संपत आलं तसं जागतिक माध्यमांमध्ये २०२३ च्या लाभ-हानीचे हिशोब मांडले जायला लागले. वेगवेगळ्या पद्धतींनी या साऱ्या आनंदाचे, दुःखाचे, भयाचे विश्लेषण झाले.
AI 2023
AI 2023esakal
Updated on

संपादकीय

आपला निरोप घेऊन इतिहासजमा झालेले २०२३ तुमच्या लक्षात राहील का? या प्रश्नाला ‘नक्कीच’ असे उत्तर मिळणे अगदी स्वाभाविकच. २०२३ असंख्य गोष्टींसाठी आपल्यापैकी असंख्यजणांच्या स्मृतीत राहील.

खरंतर इतिहासजमा होणारं प्रत्येक वर्ष असं विविधांगांनी, कधी वैयक्तिक तर कधी सामुदायिक, स्मृतींवर कोरलं गेलेलं असतं. पण काही वर्षं अशी असतात जी कधीच फक्त इतिहासजमा होत नाहीत, कारण त्या वर्षांमधल्या घटितांनी माणसाचं जगणं बदलेलं असतं.

त्यावेळच्या वर्तमानावर ती वर्षं जशी अमिट ठसा उमटवून गेलेली असतात तसेच त्या वर्षांमधल्या त्या त्या घटितांचे पडसाद भविष्यावरही उमटत राहातात.

माणसाच्या जगण्याला कलाटणी देणारे शोध -संशोधनं, आक्रमणं, महायुद्धं, राजवटींचे, सत्ताधिशांचे उदयास्त, मंदीच्या लाटा, कोरोनासारख्या महासाथी अशी अनेक घटिते सांगता येतील.

जीवनपद्धतींच्या अनेक दिशा बदलायला कारणीभूत ठरलेल्या काही घटितांचा कालक्रम, तारीख-वार, महिने-वर्षांच्या भाषेत नेमका नाही सांगता येत.

उदाहरणार्थ बहुतेक सर्व मानवी परंपरांनी राक्षस, पिशाचनिवारक आणि तमनाशक अशा रूपात पाहिलेल्या अग्नीची निर्मिती माणसाच्या इच्छेच्या कक्षेत नेमकी कधी आली किंवा पहिलं चाक नेमकं कोणत्या वर्षी फिरलं वगैरे...

पाण्याच्या वाफेवर चालणाऱ्या यंत्राची कल्पना इसवी सन पूर्व १२०पासून असली तरी अठराव्या शतकाचं शेवटचं दीड दशक जसं जेम्स वॅटच्या वाफेच्या इंजिनांनी माणसाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून नोंदवलं गेलं, तशीच माणसाचं जगणं बदलणारी वेगवेगळी घटितं एकेका वर्षाला अधोरेखित करीत गेली.

असे माणसाच्या एकूण इतिहासावरच आपले ठसे ठेवणारे कालखंड कालगणनेला सुरुवात झाल्यापासूनच्या प्रत्येक शतकातल्या प्रत्येक दशकात सापडतील.

AI 2023
2023 मधील टॉप 10 चिकन डिशेस, टिक्का कितव्या नंबरवर?

२०२३ बद्दलही असंच म्हणता येईल का? या वर्षात जगानं खूप काही पाहिलं, सोसलं. त्यात आनंदाचे क्षण होते, दुःखाचे उसासे होते.

प्रकाशाने उजळून निघालेले कोपरे होते आणि काही कोपरे भीतीने काळवंडलेलेही होते. २०२३ संपत आलं तसं जागतिक माध्यमांमध्ये २०२३च्या लाभ-हानीचे हिशोब मांडले जायला लागले.

वेगवेगळ्या पद्धतींनी या साऱ्या आनंदाचे, दुःखाचे, भयाचे विश्लेषण झाले. या सगळ्या चर्चांमध्ये एक धागा समान होता -२०२३ माणसाच्या इतिहासात नोंदलं जाईल, कारण याच वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जगण्यात प्रवेश करती झाली.

तसं म्हणायचं तर कृत्रिम बुद्धिमत्तेची वेगवेगळी रूपं आपल्या आजूबाजूला वावरत होती त्यालाही आता खूप काळ लोटला.

पण गेल्या वर्षभराचा हिशोब मांडायचा तर कृत्रिम बुद्धिमत्तेने नेहमीच्या अनेक गोष्टी करण्याचे मार्ग बदलले, चॅटबॉट नावाचं प्रकरण रोजच्या वापरात आलं, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही व्यावसायिक स्पर्धांना सुरुवात झाली, आजवर कुतूहलाचा आणि माणसाचं जगणं अधिक सुलभ करणारा माणसाच्या निसर्गदत्त बुद्धिमत्तेचा एक कौतुकास्पद आविष्कार मानल्या जाणाऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्तेनं माणसाच्या मनात भीतीही पेरली ती याच २०२३मध्ये.

AI 2023
Microsoft AI Training : भारतातील एक लाख डेव्हलपर्सना मायक्रोसॉफ्ट देणार एआय प्रशिक्षण! 'ऑडेसी इनिशिएटिव्ह'ची घोषणा

याविषयी वाचताना एआयचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स –कृत्रिम बुद्धिमत्ता) २०२३मधला प्रवास उलगडत गेला. वर्ष सुरू झाले तेव्हा जनरेटिव्ह एआयने छायाचित्रण आणि विद्यादानाच्या क्षेत्रात पावले रोवली होती.

फेब्रुवारीमध्ये जनरेटिव्ह एआयच्या चॅटजीपीटी या अवताराच्या वापरकर्त्यांची जगभरातील संख्या दहा कोटींवर गेली होती. मार्चमध्ये चॅटजीपीटीचे चौथे व्हर्जन लॉन्च झाले, शीतपेयांची निर्मिती करणाऱ्या काही बड्या कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातींसाठी एआयची मदत घ्यायला सुरुवात केली आणि याच सुमारास एआय वापरून तयार केलेल्या काही चित्रांबद्दल चर्चा सुरू झाल्या.

जनरेटिव्ह एआयच्या शिक्षणासाठी जपानमध्ये कॉपीराइट कायद्याचा अडथळा नसेल असे तिथल्या सरकारने एप्रिलमध्ये जाहीर केले आणि मे महिन्यात एआयचा उपयोग करून लिहिल्या जाणाऱ्या कथा-पटकथांच्या विरोधात हॉलिवूडसाठी काम करणारे लेखक संपावर गेले.

काही बेस्टसेलर लेखकांनीही एआयच्या दुरूपयोगाच्या शक्यतेबद्दल बोलायला सुरुवात केली. पुढच्या काळात एआयशी संबंधित काही सुविधा मोफत राहिल्या नाहीत, अनेक नोकऱ्या गिळंकृत झाल्या, डीपफेकसारखी आव्हाने पुढे आली, डॉ. जेफ्री हिंटन यांनी एआयवरील पुढचे संशोधन किमान सहा महिने थांबवण्याचे आवाहन केले, वेगवेगळ्या क्षेत्रांमधला एआयचा वाढता वापर; त्यामध्ये अनुस्यूत असणारे नैतिक मुद्दे; एआयच्या घोडदौडीवरील निर्बंधांची आवश्यकता यावर साधकबाधक चर्चा होतच होत्या.

ऑक्टोबरच्या सुमारास हॉलिवूडमधल्या चित्रनिर्मात्या कंपन्यांनी एआयच्या वापराला काही एक कुंपण पडावे हे मान्य केले आणि २०२३च्या अखेरच्या चरणात युरोपियन युनियनने जगातला पहिला एआय कायदा संमत केला.

जगभरातल्या अनेकांना विचार करायला भाग पाडणाऱ्या या कृष्णमेघाला काही चंदेरी किनारही आहे. एका बाजूला विदा-संरक्षणाच्या विचाराला या गेल्या वर्षात मोठी चालना मिळाली.

विदेवर आधारित असणाऱ्या तंत्रज्ञानाने आणि विदा-व्यवस्थापन तंत्रानेही कात टाकली. उपलब्ध होणाऱ्या प्रचंड माहितीचे त्वरेने विश्लेषण करून समस्यापूर्तीच्या अनेक वाटा खुल्या झाल्या. व्यवसायांच्या संधी निर्माण झाल्या.

२०२३ संपले पण मानवी बुद्धिमत्तेच्या आधारानेच माणसाला वेढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा झंझावात आपल्या जगण्यात आणखी किती आणि कोणते बदल घडवेल हे येणारी वर्षं सांगतीलच, मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भोवंडून टाकणाऱ्या वेगाने २०२३ माणसाच्या इतिहासात अधोरेखित झाले, हे निश्चित!

--------------------

AI 2023
Sam Altman : चॅट जीपीटी तयार करणाऱ्या 'ओपन एआय'चे सीईओ सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये का गेले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.