ज्ञानेश विजय पांढरे
पहिल्या महायुद्धानंतर माघारी आलेल्या सैन्याला एक नवीनच ध्येय देण्यात आले होते. ते म्हणजे समुद्राला लागून एक दीर्घ लांबीचा दळणवळण मार्ग तयार करण्याचे. हाच तो ग्रेट ओशन रोड.
मेलबर्ननंतर गिलाँग-बेलारट-बेन्डीगोच्या खाणी व तेथील उद्योगाला लागणारी जी यंत्रसामग्री पोर्ट ओटवे किंवा पोर्ट फिलीपमध्ये येत असे, त्या सामग्रीची वाहतूक सोपी व्हावी व पुढे पोर्ट कॅम्पबेलपर्यंत शेती –दुग्ध व्यवसाय व राष्ट्रीय उद्यानांसाठी संपर्कसाधने विकसित करावी, हा ह्या रस्त्यामागचा मुख्य उद्देश. हा रस्ता पहिल्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मृतीला समर्पित केलेला आहे.
गेल्या काही वर्षांत लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली, प्रवासाच्या सुविधाही वाढल्या तसा प्रवासही वाढला. मात्र शिक्षणासाठी मुख्यतः युरोप अमेरिका तर पर्यटनासाठी दक्षिण-आशिया मध्यपूर्वेत प्रवास होताना दिसतो. परंतु दक्षिण अमेरिका किंवा ज्याला डाऊन अंडर संबोधले जाते अशा ओशोनिया खंडाचा मुख्य भाग असलेल्या ऑस्ट्रेलियासारख्या देशाला अजूनही पर्यटकांकडून प्राधान्य मिळताना दिसत नाही.