किरण शिवहर डोंगरदिवे
कार्तिक महिन्यात सूर्य अस्ताला जात असतानाच आकाशात रंगांची उधळण सुरू होते. दिवाळीच्या आकाशकंदिलांची आणि फटाक्यांच्या आतिशबाजीची आकाशातल्या चांदण्याशी स्पर्धा लागते. दिवाळीच्या चार दिवसांच्या कोलाहलानंतर आकाशातलं चांदणं निवांतपणे ‘कशी जिरवली कृत्रिम चांदण्याची!’ अशा आविर्भावात गालातल्या गालात हसत असेल, असं मला नेहमी वाटतं.
काळ्याभोर आकाशाच्या विस्तीर्ण पटावर टिपूर चांदणं हसायला लागलं, की शरद ऋतू आपल्या दारात उभा राहिल्याची जाणीव होते. आषाढ, श्रावण, भाद्रपद या महिन्यांमध्ये मेघाच्छादित आकाश निरभ्र होऊन आकाशातल्या चांदण्या, नक्षत्रं संपूर्ण तेजानं पेटून आपलं अस्तित्व या सृष्टीला दाखवू लागतात ते शरद ऋतूमध्येच.
मधेच एखादा ढग पुन्हा मस्तीत येऊन आकाशात डोकावला, तरी नभोमंडलातल्या चांदण्यांना आता त्याचा त्रास होत नाही. उलट लपाछपी खेळणाऱ्या निरागस बालिकांप्रमाणे क्षणात त्या ढगाआड लपतात आणि क्षणात दिसतात.