स्वप्ना साने
हल्ली बऱ्याच कॉस्मेटिक कंपन्या आयुर्वेदिक घटक असलेले प्रॉडक्ट तयार करतात. त्यातले महत्त्वाचे घटक आयुर्वेदिक असतात. पण त्वचा आणि केस सुदृढ करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीही प्रयत्न करू शकता.
आयुर्वेदाचा आणि सौंदर्यशास्त्राचा संबंध हजारो वर्षांपासून आहे. आयुर्वेदानुसार, सुंदर त्वचा म्हणजे फक्त बाह्य स्वरूप नसून, त्वचा किती सुदृढ आणि तजेलदार आहे यावरून त्वचेच्या सौदर्यांचे मोजमाप होते. तुम्ही किती निरोगी आहात, तुमची जीवनशैली किती निरोगी आहे, ह्यावर तुमची त्वचा आणि केस किती सुंदर आहेत, हे अवलंबून आहे.
गोरा रंग हे सौदर्याचे मोजमाप नसून; त्वचा किती नितळ, निर्जंतुक, नॅचरल ग्लो असलेली, स्ट्रेस फ्री, कुठल्याही प्रकारचे दोष नसलेली (पिंपल्स किंवा पिगमेन्टेशन नसलेली) आहे यावर त्वचा सुंदर आहे असे समजले जाते. जेव्हा तुम्ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर संतुलित असता, त्यावेळेस खरे सौंदर्य उजळते.