बांगडा कटलेट, चिकन काफ्रेल, फ्राइड ग्रीन प्रॉन्स, बांगडा फ्राय, सोलकढी..! उन्हाळ्याच्या सुरुवातीचा मस्त बेत

हटके नॉन व्हेज पदार्थ बनवून पहा
fish
fishesakal
Updated on

कोकोनट प्रॉन्स कढी

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य

एक नारळ, अर्धा किलो प्रॉन्स, ४ कांदे, ४ टोमॅटो, १ चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, अर्धी वाटी कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, गोडे तेल.

कृती

प्रथम प्रॉन्स स्वच्छ करून धुऊन घ्यावेत. त्यांना मीठ, हळद, आले-लसूण पेस्ट लावून बाजूला ठेवून द्यावे. दरम्यान, ओला नारळ मिक्सरवर फिरवून घ्यावा. मिक्सरमध्ये फिरवलेले खोबरे पातळ कपड्याने गाळून सर काढावा. कढईमध्ये तेलात चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा. ब्राऊन होईपर्यंत परतावा. नंतर चिरलेले टोमॅटो घालून तेही परतावेत. प्रॉन्स घालून झाकण ठेवावे व वाफ येऊ द्यावी. प्रॉन्स शिजले की मग हळद, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला घालून परतावे. ओल्या नारळाचा रस घालून दोन उकळ्या आणाव्यात. चवीनुसार मीठ घालावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

टीप : आवडत असल्यास आमसूल घालू शकता.

बांगडा कटलेट

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य

चार मोठे बांगडे, १ वाटी कोथिंबीर, १ बटाटा, १ टोमॅटो, ५ हिरव्या मिरच्या, बारीक रवा, चवीनुसार मीठ, गोडे तेल, हळद, आले-लसूण पेस्ट.

कृती

बांगडे साफ करून घ्यावेत. वाफवून काटे काढून स्वच्छ करावेत. तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, हळद, चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा व कोथिंबीर हे सर्व जिन्नस परतून घ्यावेत. या मिश्रणात साफ केलेले बांगडे घालावेत आणि सर्व मिश्रण स्मॅश करावे. चवीनुसार मीठ घालावे. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्यांना चपटा आकार द्यावा. रव्यात घोळवून डीप फ्राय करावेत.

chicken
chickenEsakal

चिकन काफ्रेल

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य

अर्धा किलो चिकन, ४ कांदे, ४ टोमॅटो, १ लिंबू, अर्धी वाटी काजूगर, कोथिंबीर, ८-१० हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, ५ लवंग, अर्धा इंच दालचिनी तुकडा.

कृती

प्रथम कोथिंबीर, आले, लसूण, हिरवी मिरची, लवंग, दालचिनी यांची पेस्ट करून घ्यावी. या पेस्टमधील अर्धी वाटी पेस्ट चिकनला लावून चिकन फ्राय करून घेणे. कढईमध्ये तेलात फोडणी करून कांदा, टोमॅटो आणि राहिलेली पेस्ट घालून परतावे. मग चिकन घालून छान एक वाफ येऊ द्यावी. चिकन काफ्रेल तयार!

फ्राइड ग्रीन प्रॉन्स

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य

अर्धा किलो मोठे प्रॉन्स, १ जुडी कोथिंबीर, ८ हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, ४ लवंग, १ दालचिनी तुकडा, छोटा अर्धा चमचा मिरपूड, चवीनुसार मीठ, हळद, रवा.

कृती

सर्वप्रथम प्रॉन्स स्वच्छ करून घ्यावेत. त्यांना मीठ, आले-लसूण पेस्ट, हळद लावून वीस मिनिटे ठेवावे. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले-लसूण, लवंग, दालचिनी आणि मिरपूड एकत्र करून त्याची मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी. नंतर ही पेस्ट प्रॉन्सला लावून थोडा वेळ ठेवून द्यावे. मग बारीक रव्यामध्ये प्रॉन्स व्यवस्थित घोळवावेत व तेलात फ्राय करावेत. तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करावे.

ग्रीन प्रॉन्स

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य

अर्धा किलो प्रॉन्स, १ जुडी कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, २ कांदे, लवंग, दालचिनी, १ चमचा हळद, ५-६ हिरव्या मिरच्या, ४ टोमॅटो, चवीनुसार मीठ, तेल.

कृती

प्रथम प्रॉन्स साफ करून घ्यावेत. त्याला मीठ, हळद, आले-लसूण पेस्ट लावून अर्धा तास ठेवावे. हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, लवंग, दालचिनी यांची मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी. नंतर तेलात फोडणी करून चिरलेले कांदे व टोमॅटो परतून घ्यावेत. त्यात तयार पेस्ट व प्रॉन्स घालावेत. चवीनुसार मीठ घालून एक वाफ आणावी. ग्रीन प्रॉन्स तयार!

बांगडा फ्राय

वाढप : २ व्यक्तींसाठी

साहित्य

चार बांगडे, ५ हिरव्या मिरच्या, १ जुडी कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, बारीक रवा, मिरची पूड, हळद, मीठ, चिंच.

कृती

बांगडे स्वच्छ धुऊन घ्यावेत. आडवे चिरावेत. त्याला मीठ,

हळद लावून ठेवावी. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले-लसूण यांची पेस्ट करून घ्यावी. थोडे पाणी घालावे. या पेस्टमध्ये

चिंचही घालावी. चवीनुसार मीठ घालावे. नंतर ही तयार पेस्ट बांगड्यांत व्यवस्थित भरावी. मग एकेक बांगडा रव्यात घोळवून फ्राय करावा.

bangda
bangdaesakal

मटार पुलाव

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य

अर्धा किलो मटार, ४ कांदे, ४ टोमॅटो, २ बटाटे, अर्धी वाटी फ्लॉवर, १ किलो बासमती तांदूळ, चवीनुसार मीठ, गोडे तेल, हळद.

कृती

प्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन ठेवावा. तेल गरम करून त्यात चिरलेले कांदा, टोमॅटो, बटाटे, फ्लॉवर आणि मटार चांगले परतावेत. हवे असल्यास भाज्या मॅश करून घ्याव्यात. भाज्या शिजत आल्यावर हळद घालावी. लगेच तांदूळ घालून चांगले ढवळावे. त्यात उकळलेले पाणी घालावे. भात चांगला शिजू द्यावा. एक-दोन वाफ आल्यावर व पाणी आटल्यावर गॅस बंद करावा.

सोलकढी

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य

एक नारळ, ७-८ आमसुले, ५ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, ४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, १ चमचा जिरे, चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ.

कृती

आमसुले भिजत घालावीत. ओल्या खोबऱ्यात जिरे, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, मीठ व साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. नंतर हे चाळणीने गाळून नारळाचे दूध पिळून काढावे. आमसुले पिळून रस काढावा. त्या रसामध्ये खोबऱ्याचे दूध घालावे. हवे असल्यास चवीनुसार मीठ व साखर घालावी.

----------------------

solkadhi
solkadhiesakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.