परमेश्वराचा शोध घेण्यापूर्वी स्वतःतील अवगुण शोधण्याची आणि ते मान्य करण्याची तयारी लागते, असे सांगणारे संतश्रेष्ठ कोण होते?

आपल्या प्रतिभेने आणि शब्दांनी समाजाचा मुखवटा थेट उतरविणारे दोनच संतश्रेष्ठ आपल्याला मध्ययुगीन भक्ती आंदोलनांमध्ये आढळतात
sant kabir and sant tukaram
sant kabir and sant tukaramesakal
Updated on

डॉ. राहुल हांडे

कोणत्याही धर्मातील कर्मकांड, अवडंबर, पाखंड असा कचरा हटवल्याशिवाय धर्माचे मर्म समजू शकणार नाही, असा कबीर साहेबांचा कायम आग्रह राहिला.

म्हणून ते म्हणतात संत-सज्जन म्हणजे समाजरूपी धान्य पाखडून त्यातील काडी-कचरा दूर करणारे सूप आहे, हे सूप समाजातील व धर्मातील सार्थक शाबूत ठेऊन निरर्थक उडवून लावते.

मसजिद भीतर मुल्ला पुकारे, क्या साहब तेरा बहिरा है ?

चींटी के पग नेवर बाजे, सो भी साहब सुनता है ।

पंडित होय के आसन मारै, लंबी माला जपता है ।।

अंतर तेरे कपट-कतापी, सो भी साहब लखता है ।

उंचा-नीचा महल बनाया, गहरी नेंव जमाता है ।।

चलने का मनसूबा नाहीं, रहने को मन करता है।

कौडी कौडी माया जोडी, गाडि जमीं में धरता है।।

जेहि लहना है सो लै जइहै, पापि बहि बहि मरता है।

सतवंती की गजी मिलै नहिं, वेश्या पहिरै खासा है।।

जेहि पर साधू भीख न पावै, भंडुआ खात बतासा है।।

हीरा पाय परख नहिं जाने, कौडी परखन करता है।

कहत कबीर सुनो भाई साधो, हरि जैसे को तैसा है ।।

मशिदीत अल्लाच्या नावाचा पुकारा करणाऱ्या मुल्ला, तुझा साहेब म्हणजेच अल्ला काय बहिरा आहे का? मुंगीच्या पायाला बांधलेल्या घुंगराचा नादही तो ऐकू शकतो.

विशिष्ट आसनात जपमाळ घेऊन बसलेल्या पंडिताला कबीर साहेब म्हणतात, तुझ्या मनातील छल-कपट, दुष्टपणा, द्वेष, लोभही परमेश्वराला समजतो.

धनिकांच्या लोभावर कोरडा ओढताना कबीर साहेब म्हणतात, खोल पाया घेऊन भव्य-दिव्य महाल उभ्या करणाऱ्या धनिकाला आपल्याला एक दिवस हे सर्व सोडून परतयाचे आहे याचे भान राहत नाही, येथेच कायम राहण्याची त्याची इच्छा असते.

जग सोडून जाताना काहीएक सोबत नेता येत नसले, तरी हे लोक कवडी-कवडी गोळा करून जमवलेली माया जमिनीत गाडून ठेवतात. यांच्या मृत्यूनंतर ते धन ज्याला सापडते त्याच्या मालकीचे होऊन जाते. जमविणारे पापी मात्र धन वाहून वाहून मरतात.

पतिव्रता-सत्यवती स्त्रीला अंगभर कपडा मिळत नाही, चारित्र्यहीन वेश्या मात्र उंची कपडे घालते. साधू-सज्जन लोकांना साधं अन्न भीक म्हणून मिळत नाही; परंतु कपटी लोक पक्वान्न खातात.

माणसाला परमात्म्याने दिलेल्या हिऱ्यासारख्या जन्माची पारख करता येत नाही, तो क्षुद्र धनाच्या कवड्यांची पारख करण्यात आयुष्य वाया घालवतो.

त्यामुळे कबीर म्हणतो, की हरी म्हणजे परमेश्वर जो जसा असेल त्याला तसा अनुभव देतो. कबीर साहेब आपल्या या दोह्यात समग्र मानवी समाजाचे मर्म सांगतात.

आपल्या प्रतिभेने आणि शब्दांनी समाजाचा मुखवटा थेट उतरविणारे दोनच संतश्रेष्ठ आपल्याला मध्ययुगीन भक्ती आंदोलनांमध्ये आढळतात. पहिले म्हणजे कबीर साहेब आणि दुसरे तुकोबा. त्यामुळे ते संतत्वासोबत समाजमानसशास्त्रज्ञही असलेले जाणवतात.

महाराष्ट्रात तुकोबांच्या रूपाने कबीर साहेब बोलत आहेत ही अनुभूती सातत्याने येत राहते. कबीर साहेब आणि तुकोबांना केवळ भवसागर पार करण्यात रस नव्हता, तर त्यांना त्या भवसागरातील मळदेखील साफ करायचा होता.

यामुळे त्यांनी समाज आणि त्याचे दोष याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. उलट त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचे विश्लेषण केले.

लोकजीवनातील अनुभव त्यांनी लोकभाषा आणि लोकमानसातील प्रतिमा-प्रतीक-रूपके इत्यादींच्या साहाय्याने मांडले. ते समाजातील दांभिकता व पाखंड यांच्यामागे हात धुऊन लागले.

कबीर साहेब व तुकोबा समाजाच्या विसंगतीवर व दांभिकतेवर केवळ कोरडे ओढत नाहीत, तर त्यापासून दूर जात सुधारण्याचा मार्गदेखील दाखवतात.

ह्या दोघांचा कोणत्याही धर्माला विरोध नसला तरी धर्म म्हणजे स्वतःच्या आत्मिक, नैतिक व मानसिक शुद्धीचा मार्ग याला दोघेही प्राधान्य देतात.

कोणत्याही धर्मातील कर्मकांड, अवडंबर, पाखंड, धंदेवाईकपणा, वर्ण-जात यांच्या नावाखाली माणसांची करण्यात आलेली कृत्रिम विभागणी इत्यादी सर्व थोतांडांना ना कबीर साहेबांनी भीक घातली ना तुकोबांनी.

हा कचरा हटवल्याशिवाय धर्माचे मर्म समजू शकणार नाही, असा त्यांचा आग्रह कायम राहिला. म्हणून कबीर साहेब म्हणतात, संत-सज्जन म्हणजे समाजरूपी धान्य पाखडून त्यातील काडी-कचरा दूर करणारे सूप आहे, हे सूप समाजातील व धर्मातील सार्थक शाबूत ठेवून निरर्थक उडवून लावते.

साधु एैसा चाहिए, जैसा सूप सुभाय ।

सार-सार को गहि रहै, थोथा देई उडाय ।।

समाज प्रबोधन करताना कबीर साहेब अनेकदा भगवान बुद्धांच्या अखेरच्या; परंतु सर्वात महत्त्वाच्या सूत्राकडे जाताना दिसतात. हे सूत्र म्हणजे ‘अत्त दीप भव’. स्वतःतील दीपक प्रज्वलित करण्याचा हा संदेश कबीर साहेबांनीदेखील दिलेला आहे.

ज्याप्रमाणे तेलामध्ये अग्नी प्रज्वलित अंगभूत करण्याचे सामर्थ्य आहे. आणि अग्नीत प्रकाश निर्माण करण्याचे अंगभूत सामर्थ्य आहे.

त्याचप्रमाणे ईश्वर आपल्यामध्ये आहे. त्याचा शोध घेता आला तर घे. जगात प्रत्येक जण बेहोशपणे जगत आहे. त्यामुळे लोक भरकटलेले आहेत.

परमेश्वराचा शोध घेत इथेतिथे फिरत आहेत. स्वतःमधील परमेश्वर शोधण्यासाठी जागृत होणे आवश्यक आहे. हे सांगताना कबीर साहेब म्हणतात -

ज्योंतिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग ।

तेरा साईं तुझ ही में है, जाग सके तो जाग ।।

स्वतःमध्ये परमेश्वराचा शोध घेण्यापूर्वी स्वतःतील अवगुण शोधण्याची आणि ते मान्य करण्याची मनाची तयारी करावी लागते.

याचा बोध कबीर साहेब सर्वप्रथम करून देतात. माणूस कायमच जगात चांगुलपणा शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाचा याबाबत मात्र भ्रमनिरास होतो. चांगल्याच्या शोधात निघालेल्या माणसाला जगात वाईटाचे दर्शन होऊ लागते.

अखेर मी सगळ्यात चांगला आहे आणि सर्व जग वाईट आहे, अशा निष्कर्षापर्यंत तो पोहोचतो. ही माणसाची त्रिकाल अबाधित अवस्था.

अशा सर्व प्रवासात आपण जसे आहोत तसे आपल्याला जग दिसेल, या त्रिकाल अबाधित सत्यावर त्याचे लक्ष गेलेले नसते. त्यावर कबीर साहेब नेमका उपाय सांगतात,

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय ।

जो मन देखा आपना, मुझ से बुरा न कोय ।।

साकल्याने पाहिल्यास कबीर साहेबांची परमेश्वर संकल्पना ही त्यांनी परमेश्वरास कोणत्याही नावाने पुकारले असले तरी निर्गुण-निराकाराच्याही पल्याड जाणारी आहे. ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी आत्मा व परमात्मा दोन्ही संकल्पनांविषयी कधी शब्द उच्चारला नाही.

स्वतःच्या शोधात जे सापडेल ते मान्य करा, असे सांगितले. कबीर साहेब याच्या उलट चालताना दिसत असले, तरी त्यांचा मार्ग गौतम बुद्धांच्या दिशेलाच जाणारा आहे. ते आत्मा सांगतात त्याचबरोबर परमात्म्याच्या हिंदू-मुस्लिम दोन्ही नावांचा उच्चार करतात.

अखेर दोहोंचा शोध व बोध स्वतःतच होईल, असे ठाम मतप्रतिपादन करतात. योगयागाच्या नावाखाली शरीराची व मनाची कवायत यातून दिसणारा प्रकाश जड चित्ताची केवळ कल्पना आहे. अनेक योगी लक्ष्य भ्रष्ट होऊन शरीर विकाराला सिद्धी समजायला लागतात.

स्वतःमधील परमेश्वराचा शोध घेण्यासाठी कोणत्याच बाह्य कसरतीची आवश्यकता नाही. तसेच आकाशाकडे तोंड करून बसण्याचीही गरज नाही.

आपल्या घटात म्हणजे डोक्यात व मनात जन्मापासून साचलेला कचरा हा घट उलटा करून काढून टाकणे आवश्यक आहे. यासाठी स्वतःचा शोध घेण्यास सुरुवात करावी. मनाच्या सर्व वांझोट्या कल्पना येथे व्यर्थ ठरतात. हे अतिशय सरल व सुगम शब्दांमध्ये सांगताना कबीर साहेब म्हणतात -

आसमान का आसरा छोड प्यारे, उलटि देख घट अपना जी ।

तुम आप में आप तहकीक करो, तुम छोडो मन की कल्पना जी ।।

sant kabir and sant tukaram
Kabir Jayanti 2022: जयंतीनिमित्य वाचा कबीरांचे अनमोल दोहे

कबीर साहेबांना संतांच्या ठरावीक रूढ व्याख्येत बसवणे कठीण आहे. प्रत्येकच संताने सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हटले असले तरी कबीर साहेब आणि तुकोबांसारखा बेधडकपणा कोणात दिसत नाही.

कबीर साहेबांच्या या असामान्य गुणाबद्दल हिंदी साहित्य जगतात त्यांच्यासाठी मस्त मौला, फक्कड, मस्ताना इत्यादी शब्दांचा प्रयोग केला जातो.

कबीर साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू कदाचित हिंदी-उर्दूतील ह्या शब्दांनी पकडला जाऊ शकतो. यासाठी चपखल मराठी शब्द सापडणे कठीण वाटते. भूतकाळाचा पश्चात्ताप नाही.

वर्तमानातील कर्मांना सर्वस्व मानणे नाही. भविष्य नावाची गोष्ट गावी नाही, असे मस्त मौला म्हणजे कबीर साहेब. आपला मार्ग शोधण्यासाठी घरादार जाळून त्याच घराचे जळते लाकूड हातात घेऊन बाहेर पडलेला माणूस म्हणजे कबीर साहेब.

आपल्यासोबत ज्याला यायचे आहे, त्यानंदेखील संसाराची आणि सर्व मोह-मायेची होळी करून बाहेर पडावे. हे सांगताना ते म्हणतात-

हम घर जारा आपना, लिया मुराडा हाथ ।

अब घर जारों तासु का, जो चलै हमारे साथ ।।

कबीर साहेबांची ही जाळपोळ जन्मापासून माणसाच्या मनात आणि डोक्यात भरवण्यात आलेल्या जळमटांची जाळपोळ आहे. ह्या जाळपोळीत नव्या माणसाचे सर्जन दडलेले आहे.

सोन्यापासून नवा दागिना घडवायचा असल्यास सोने जाळून त्याचे पाणी करून त्यातील मळ दूर केल्यानंतरच आपल्याला हवा तसा सुंदर दागिना घडवता येतो.

अगदी त्याचप्रमाणे भगवान बुद्ध, महायोगी गोरक्षनाथ, कबीर साहेब आणि तुकोबा यांच्यासारख्या माणसांसोबत चालता येणे शक्य आहे. तुकोबांच्या भाषेत सांगायचे तर हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही.

मनातील व समाजातील जुनाट जळमटे जाळून टाकण्यासाठी याच लोकांचा मार्ग खरा प्रबोधनाचा मार्ग ठरतो.

मध्ययुगीन उत्तर भारतीय भक्ती आंदोलनात कबीर साहेब आणि महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनात तुकोबा समाज प्रबोधनाचे सर्वोच्च शिखर यामुळेच ठरतात. कारण ‘क्या साहब तेरा बहिरा है?’ असे विचारण्याचे अलौकिक धैर्य अशाच लोकांमध्ये असलेले दिसते.

--------------------

sant kabir and sant tukaram
Sant Janabai: स्त्री संत आपली परमेश्वरभक्ती कशा व्यक्त करीत असतील?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.