श्रुती उटगीकर
गेल्या वर्षी झालेल्या अकराव्या आंतरराष्ट्रीय अर्बन स्केचिंग सिंपोझियमच्या सोहळ्यात अनेक लोकांच्या भेटी झाल्या, कौशल्यं पाहायला, शिकायला मिळाली, शहराशी नातं जुळलं.
२०२४ मध्ये बाराव्या सिम्पोझियमला नक्की भेटू, अशी ग्वाही एकमेकांना देत स्केचर आपापल्या पुढील वाटेला निघाले.
आम्ही मैत्रिणीही पुढच्या वाटेला लागलो. पुढच्या एका आठवड्यात न्यूझीलंडच्या नॉर्थ आणि साउथ आयलँडमधल्या गावांपैकी टोरुआ, वेलिंग्टन, क्वीन्सटाउन आणि ख्राइस्टचर्चला भेट देण्याचं ठरवलं होतं.
रोटोरुआच्या वाटेवर वायटोमो इथल्या ग्लोवर्म गुहेला भेट दिली. जगात अद्भुततेची कमतरता नाही, हे या सूक्ष्मतंतुमय, खडकांवरून धाग्यांप्रमाणे लटकणाऱ्या, दमट अंधाऱ्या वातावरणात युगानुयुगे राहणाऱ्या, जगणाऱ्या, वाढणाऱ्या आणि प्रकाशमान होणाऱ्या लक्षलक्ष बिंदूंप्रमाणे दिसणाऱ्या जीवांमुळे पुन्हा एकदा पटलं.
पाण्याच्या स्रोतांमुळे निर्मित गुहेमध्ये केवळ याच ठिकाणी आढळणारे हे ग्लोवर्म अचंबित करतात.
वास्तविक पाहता भौगोलिकदृष्ट्या न्यूझीलंड एक बेट आहे. डोंगरदऱ्या आणि पर्वतराजींनी व्यापलेल्या या पाचू-बेटावर अत्यल्प मनुष्यवस्ती आहे.
या माणसांना या बेटाचं जतन करण्याची बुद्धीही देवानंच दिली असणार, असा विचार सहजच येऊन गेला. जेव्हा आम्ही रोटोरुआ इथल्या जिओथर्मल साईटला भेट दिली तेव्हा हा विचार अधिक बळावला.
निद्रिस्त ज्वालामुखीच्या तोंडात वसलेल्या या शहरात वर्षानुवर्षं जमिनीतून गंधकाच्या वाफा बाहेर पडतात. सर्व बाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार डोंगरांकडे पाहून, लाखो वर्षांपूर्वी जागा होऊन गेलेल्या ज्वालामुखीच्या तोंडात आपण उभे आहोत, हे लक्षात येऊन कुतूहलमिश्रित शहारा अंगावर उभा राहिला.
सर्वदूर उकळत्या पाण्याचे झरे, त्यातून सतत येणाऱ्या वाफा, ठरावीक वेळानंतर उडणारे पाण्याचे उंच फवारे, ठिकठिकाणी खदखदणारी चिखलाची तळी... एक आगळीच अनुभूती!
सिम्पोझिअमच्या आदल्या दिवशी पाहिलेली ऑलिव्हने लगडलेली झाडं, न्यूझीलंडचा किवी हा राष्ट्रीय पक्षी हे जसं पहिल्यांदाच अनुभवलं, तसा रोटोरुआचा अनुभव अनोखा होता.
नामशेष होण्याच्या वाटेवर असलेला, परंतु स्थानिकांच्या अपरंपार मेहनतीनं तग धरून राहिलेला किवी, साधारण कोंबडीसारखा पण पंख नसलेला पक्षी.
अगदी अंधाऱ्या दमट वातावरणात राहणे पसंत करणाऱ्या या लाजाळू पक्ष्याला इतर मोठे प्राणी सहज भक्ष्य बनवतात. त्यामुळे जंगलातलं त्यांचं वास्तव्य धोक्यात येऊन नामशेष होण्याकडे गेलं.
निसर्गनिर्मित गोष्टी जपणाऱ्या इथल्या लोकांनी मात्र याची दाखल घेऊन त्यांना वाचवण्यासाठी कृत्रिमरित्या त्यांची निवासस्थानं तयार केली आहेत.
त्यात त्यांचा उत्कृष्टपणे सांभाळ करून त्यांची संख्या हळूहळू वाढवत न्यायचा निर्धार केला आहे.
वेलिंग्टनकडे निघालो तेव्हा गाडीनं प्रवास करायचा, असं मुद्दाम ठरवलं होतं. स्वच्छ, गुळगुळीत रस्ते, अत्यल्प रहदारी, दुतर्फा खच्चून भरलेला निसर्ग! अजून काय हवं? जाता जाता, लहानपणी बरेचदा पाहिलेलं एक दृश्य आठवलं.
मोठ्याशा हॉटेलच्या प्रवेश लॉबीच्या एखाद्या भिंतीवर पिवळी जर्द हळदी रंगाची, लालभडक रंगाची आणि अशा अनेक, काल्पनिक वाटाव्यात अशा रंगांची पानं असलेली झाडं ओळीनं उभी.
त्यांच्या बुंध्यांशी विविधरंगी, विविधढंगी फुलांनी भरभरून फुललेले ताटवे, त्यांच्यामधून वाहणारं निर्मळ-नितळ निळं पाणी, दूर दूर दिसणारे बर्फाच्छादित डोंगर आणि निरभ्र आकाश असं सगळंसगळं असलेलं भली मोठी भिंत भरून लावलेला वॉलपेपर.
हे चित्र जेव्हा जेव्हा पाहायला मिळायचं, तेव्हा मनात एकच विचार यायचा, छे! असं कधी असतं का? इतकं निळं आकाश, इतकं निर्मळ पाणी, इतके वैविध्यपूर्ण एकसारखे शिस्तीत उभे वृक्ष, फुलं... छे! छे! हे काल्पनिक चित्र आहे.
असं कधी खरं नसणारच! आणि चुकून जर हे खरं असेल ना, तर आयुष्यात एकदा तरी बघायला मिळावं! सुदैवानं आणि कुठल्यातरी पूर्वपुण्याईमुळे ही इच्छा पूर्ण करणाऱ्या या अविस्मरणीय प्रवासाचा योग आला होता...
नजर ठरेपर्यंत दुतर्फा हिरवाई, त्याच्या संपूर्ण कडेने ती चित्रात लहानपणी पाहिलेली लाल-पिवळ्या पानांची झाडं, त्यांच्या तळाशी तसेच फुलांचे ताटवे, मधून वाहणारं तसंच निळं निळं पाणी, वर क्षितिजापर्यंत निळंशार आकाश, क्वचित मधून क्षितिजापाशी बर्फाच्छादित डोंगर, त्यांना जोडणारं हिरव्या पटलावरचं संपूर्ण धनुष्याकृती इंद्रधनू, या सगळ्या हिरवाईत ठिपक्यांसारखी दिसणारी गाई-गुरं, मेंढ्या, हरणं हे सगळं खरंखरं दिसत होतं!
पृथ्वीतलाच्या निर्मितीमध्ये परमेश्वराने मुक्त हस्ते निसर्गाची उधळण करीत जर कोणत्या प्रदेशावर मनस्वी प्रेम करून सर्वस्व पणाला लावलं असेल, तर तो म्हणजे न्यूझीलंड!
एका गावाहून दुसऱ्या गावाला कोणत्याही वाहनानं जाताना एक क्षणही नजर हटत नाही इतकं अफाट सौंदर्य लाभलेला, जगाच्या पाठीवरचा छोटासा दिसणारा हा देश आपल्या सौंदर्यानं वेड लावतो.
देवानं निर्माण केलेल्या आपल्या या निसर्गसंपन्न भूमीचं आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेलं हे ‘वाण’ ऑस्ट्रेलियाप्रमाणेच इथलाही प्रत्येक जण जिवापाड जपतो.
या निसर्गाला सर्वस्व मानून त्याच्या जोपासणीसाठी तन-मन-धनानं त्याची सेवा आणि सांभाळ करतो. सगळंच अद्भुत!
निसर्गासारखी इथली माणसंही निर्मळ! निखळ हास्याचे फवारे उडवत आयुष्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. मृदू स्वभावाची, गुलाबी गोरी, आपापल्या आयुष्यात मग्न असलेली, हौशी आणि काहीशी निवांत माणसं, अगत्यशील आणि सौहार्दपूर्ण आहेत.
माओरी वंशाच्या आपल्या पूर्वजांकडून मिळालेलं निडर व्यक्तिमत्त्व आणि दिलखुलास हास्य यांचा सुरेख संगम यांच्या चेहऱ्यावर आजही दिसतो. रोटोरुआहून वेलिंग्टनला जाताना लेक टिकापू नावाचा निळाशार तलाव; तलाव कसला, छोटा समुद्रच तो; मन मोहवून गेला.
‘चित्रातलं पाणी’ परत एकदा प्रत्यक्षात समोर अवतरून निखळ आनंद देऊन गेलं. वेलिंग्टनच्या छोट्या मुक्कामात आमचं हॉटेल तलावाच्या किनारी असल्यामुळे अनेक व्यापारी बोटींची चाललेली पाण्यातली उलाढाल बघणं हा एक मजेशीर अनुभव होता.
इथल्या संस्कृतीचं उत्कृष्ट सादरीकरण केलेलं ‘ते पापा’ म्युझियम पाहिलं आणि या देखण्या शहराकडून क्वीन्सटाउनला जायला विमान गाठलं.
छोट्याच अंतराच्या त्या फ्लाईटमध्ये खिडकीला चिकटवलेले डोळे, अगदी मान मोडेपर्यंत बाजूला होऊ शकले नाहीत. उड्डाणापासून उतरेपर्यंत निसर्गाची विविध रूपं, आकार, रंग काय काय मनात साठवू असं होत होतं.
हिरवेकंच डोंगर, त्यातून वाहणाऱ्या सूर्यकिरणांनी झळाणाऱ्या सोनेरी नद्यांच्या नागमोडी रेषा, मधूनच विमानाशी लगट करणारे ढगांचे पुंजके, खाली दिसणारे शुभ्र समुद्रकिनारे, बर्फानं झाकलेले डोंगरमाथे अशी वैविध्यपूर्ण निसर्गदृश्यं डोळ्यात साठवत असताना अचानक विमान हेलकावे घ्यायला लागलं.
ढगांमध्ये बरेचदा पोकळी असते आणि ढगांतून जाताना काही वेळा असं विमान हादरतं, हे माहीत होतं. विमान झटकन खाली आलं आणि पोटात मोठा गोळा आला. क्वीन्सटाउनमध्यल्या विख्यात बंजी जम्पिंगची झलक मिळाली.
आमच्यासारख्या नवख्या प्रवाशांचं ओरडायचंच बाकी होतं; स्थानिक प्रवासी मात्र शांत होते. हे कायमच असं असणार! उड्डाणानंतर दीड तास सरून क्वीन्सटाउन जवळ आल्याची ती ग्वाही होती.
सोसाट्याचे बोचरे वारे, पाऊस आणि कडाक्याची थंडी आमचं स्वागत ‘असं’ करत होती. एकदाचं विमान उतरलं, तेव्हा हुश्श झालं आणि पुढचा प्रवास सुरू झाला.
न्यूझीलंडच्या इतिहासात थोडं डोकावलं, तर लक्षात येतं की युरोपीयनांचा इथे पगडा होता. स्थानिक माओरींनी वसवलेल्या ता-हुना या गावाला स्वतःच्या सुख-सोयींसाठी त्यांनी विकसित केलं.
न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण या दोन बेटांपैकी साऊथ आयलंडवरचं हे वायव्येला असलेलं टुमदार शहर. त्याला ‘रिसॉर्ट टाऊन’ असंही म्हणतात. माओरींना माहीत नसलेल्या सोन्याच्या खाणींचा शोध लावून तिथे सुविधांचा विकास केला, गावं वसवली. तारूनाचं (ते-रेओ) क्वीन्सटाउन केलं.
इथलं आमचं हॉटेल एका छोट्या डोंगरावर होतं. तिथून समोरचा निळाशार तलाव लेक वाकाटिपू देखणा दिसत होता. आजूबाजूला छोटी-मोठी हॉटेल, रेस्टोबार, संगीतमय पब्लिक स्पेसेस, थंड वारा, मावळता सूर्य आणि निरभ्र निळं आकाश चित्रवत भासत होतं.
निसर्गाचा पुरेपूर आस्वाद घेत दुसरा दिवस मिलफर्ड साऊंड या ठिकाणी जाण्याचा होता. चार तासांच्या या रोड ट्रिपमध्ये होते अनेक आरसपानी तलाव, दुतर्फा खच्चून हिरवाई, जंगलसदृश भागांतून जाणारे स्वच्छ गुळगुळीत रस्ते!
ही प्रवासाची मजा निराळीच होती. या निसर्गदृश्यांना स्वतःमध्ये सामावून घेताना आम्ही तिघी गप्पा विसरून तास न् तास निशःब्द निसर्गास्वाद घेत होतो.
संपूर्णतः त्यात बुडून गेलो होतो. प्रवासात फारसे न बोलताही एक क्षणही कंटाळा येत नव्हता. निसर्गाची ध्यानधारणा केल्यासारखंच!
मिल्फर्ड साऊंड हीदेखील एक अद््भुत जागा. सभोवताली डोंगररांगांमध्ये असलेला तलाव, त्यातून दोन तास टास्मान समुद्राला मिळणाऱ्या ठिकाणापर्यंत आपल्याला नेणारी बोट, आवाज फक्त पाण्याचा, धबधब्याचा, क्वचित पक्ष्यांचा आणि बोटीतल्या माणसांचा. मधेच दर्शन देणारे डॉल्फिन सगळ्यांनाच आनंद देऊन गेले.
या बोट मार्गाचा शेवट होणाऱ्या ठिकाणी हे तलावाचं पाणी, टास्मान समुद्राला जिथे मिळतं, तिथलं दृश्यही विलोभनीय आहे. डोंगररांगा संपून अचानकपणे विस्तृत अथांगपणा समोर येतो आणि अचंबित करून जातो. तिथून बोट मागे वळते आणि या उत्कंठावर्धक प्रवासाची सांगता करते.
मनावर कोरल्या गेलेल्या निसर्गसृष्टीचा ठेवा जपून ठेवण्याची आमची धडपड चालू होतीच. भौगोलिक-वैज्ञानिकतेचा उच्चतम बिंदू समजले जाणारे ‘सदर्न लाइट्स’ या सगळ्या भागातून अनुभवायला मिळतात, असा अभ्यास इथे येण्यापूर्वी केला होता.
तेही आपल्याला बघायला मिळावेत म्हणून आम्ही तिघी ओटागो हवामान खात्याच्या वेबसाईट आणि अरोरा ऑस्ट्रालिसच्या वेबसाईट, ग्रुपवर सारखं लक्ष ठेवून होतो. पण आम्ही यायच्या एक दिवस आधी इथे या लाइटचं दर्शन झालं होतं.
संपूर्णतः सौर वादळांवर अवलंबून असलेली ही आश्चर्यकारी घडामोड हुलकावणी देऊन गेली होती. थोड्या निराश झालो, पण सर्वतोपरी सूर्यावर अवलंबून असलेल्या या घटनेचा आस्वाद पुढे कधीतरी घेऊया असं ठरवून दुसऱ्या दिवशी क्वीन्सटाउन सोडलं.
ख्राइस्टचर्चच्या दिशेने, पुन्हा एकदा गाडीनं प्रवास सुरू झाला. पुन्हा एकदा भरभरून निसर्गाच्या मध्यातून मार्गक्रमण करत, लेक टेकापो नावाच्या जागी आलो. आश्चर्यकारक नितळता काय असते, हे इथं पाहायला मिळालं.
निळ्या, नितळ पाण्याच्या काठी उभी असताना, मन त्या पाण्याच्या खोलाईत हरवलं, हरखून गेलं आणि ती निळाई डोळ्यांवाटे झिरपू लागली. परमानंद यालाच म्हणत असावेत! तलावातल्या पाण्याला हलकेच स्पर्श केला. त्याची शीतलता रोमारोमात भिनली.
दगड-गोट्यांच्या तळावर शांत स्थिरावलेल्या त्या निळाईला स्पर्श करताना एखादा दैवी साक्षात्कार झाल्याचा भास झाला. मनोमन नतमस्तक झाले. इथून कधीच जाऊ नये असं वाटण्याजोगं हे ठिकाण होतं.
पुढच्या मुक्कामी पोहोचायची वेळ आड आली आणि नाईलाजानंच निघालो. रमणीय रस्ता, वैविध्याची उधळण करत अतिशय टुमदार अशा ख्राइस्टचर्चमध्ये आम्हाला घेऊन गेला. साउथ आयलंडच्या पूर्व बाजूला असलेल्या या ऐतिहासिक शहराचा ऑकलंडखालोखाल सर्वांत मोठं शहर असा उल्लेख होतो.
टुमदार अशा या शहरात व्हिक्टोरियन ट्रामपासून अत्याधुनिक आर्ट गॅलरीपर्यंत सगळं बघायला मिळतं. अर्थातच ख्राइस्टचर्च हे नामकरण युरोपीयनांनी केलं. तसं पाहिलं तर न्यूझीलंडची दोन्हीही बेटं भूकंपप्रवण आहेत.
सातत्यानं छोटे-मोठे भूकंपाचे धक्के सोसण्याची ‘सवय’ असलेल्या या शहराला, २०११च्या फेब्रुवारीमधला भूकंप मात्र जोराचा धक्का देऊन गेला. ख्राइस्टचर्चचा गाभा असलेलं मुख्य चर्च या धक्क्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढासळलं.
शहराचं जणू हृदयच असलेल्या या चर्चचा पुनरुद्धार करण्यासाठी तिथली जनता कंबर कसून प्रयत्नशील असलेली दिसली. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात फिरणारी व्हिक्टोरियन ट्राम.
मेलबोर्नच्या सिटी सर्कलमध्ये विनाशुल्क प्रवास करता येतो, तसा मात्र इथे नाही. दिवसाचा पास काढून आपण ठरावीक मार्गांवर कितीही वेळा फिरू शकतो. ट्रामच्या आतील संपूर्ण भाग पूर्वीच्या व्हिक्टोरियन पद्धतीनं सजवला होता.
ट्रामचालक महिला, दुतर्फा असलेल्या इमारती, जागांची माहिती जाता जाता पुरवत होती. त्या ट्राममध्ये बसल्यावर आपण उगाचच पुराणकालीन युरोपियन असल्यासारखं वाटून गेलं. मजेदार यात्रा होती.
न्यू रेजंट स्ट्रीट नावाच्या रस्त्यावरून; स्पॅनिश पद्धतीनं बांधलेल्या दुतर्फा दुकानं-रेस्टोबारमधून ही ट्राम आपल्याला नेते. हा स्टेट मॉल फारच विलोभनीय होता. दोन्ही बाजूंना सारख्याच दिसणाऱ्या टुमदार इमारती एकसारख्या रंगसंगतीत रंगवलेल्या होत्या.
तळमजल्यावर असलेली छोटी हॉटेलं-बार, दुकाने माणसांनी; मुख्यतः प्रवाशांनी गजबजलेली होती. इथे थोडं फिरून, स्केचिंग करून अंटार्क्टिक सेंटरला भेट दिली. अंटार्क्टिकाला असलेल्या सर्व तपशिलांचं एक म्युझियमच जणू!
तिथे होणारं बर्फाचं वादळ इथे कृत्रिमरित्या तयार केलेलं होतं. त्या हॉलमध्ये, थंडीचे सर्व उबदार कपडे घातलेले असूनही, दहा मिनिटं थांबण्यात सुद्धा अपयश आलं होतं.
खुद्द अंटार्क्टिकामध्ये प्रयोगशील वैज्ञानिकांना काय परिस्थितीला तोंड द्यावं लागत असेल, याची पुसट कल्पना आली.
संध्याकाळ, श्रुतिका आणि चिन्मयबरोबर समुद्रकिनारी अविस्मरणीय झाली. नेल्सनहून खास मला भेटायला आलेली माझी एकेकाळची विद्यार्थिनी श्रुतिका, आज दहा वर्षांनंतर अशा आगळ्याच ठिकाणी भेटली होती.
दोघींनाही खूप-खूप आनंद झाला. काही नाती कालातीत असतात, याची जाणीव झाली. ती संध्याकाळ न्यूझीलंडमधली शेवटची होती. तीन आठवड्यांच्या या ‘आउट ऑफ द वर्ल्ड’ प्रवासाची सांगता.
मन भरून येत होतं; तीन आठवड्यांत आलेल्या उत्कट अनुभवांनी आणि घरच्या ओढीनीसुद्धा. प्रवास माणसाला खूप काही देतो. त्यातून परदेशी एकट्यानं प्रवास केला तर अजूनच.
वेगवेगळ्या देशोदेशीच्या लोकांना भेटणं, संपूर्णपणे नवख्या शहरांमध्ये, माणसांमध्ये वावरणं, त्यांच्या संस्कृती, खाद्यपदार्थांचं निरीक्षण करणं, स्वतःला सर्व प्रकारे सांभाळणं; अगदी सर्दी-खोकल्यापासून मौल्यवान गोष्टींपर्यंत!
प्रवासाच्या आखणीपासून त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्णपणे एकटीने करण्याची ही तशी पहिलीच वेळ होती. मनात धास्ती नव्हती; परंतु वेगळेपण नक्कीच जाणवलं, भावलंसुद्धा! अनेक अनुभवांची भरगच्च पोतडी हृदयात ओतप्रोत भरून राहिली.
आयुष्यात कधीही विसरता न येणारे अनेक क्षण या प्रवासानं मला दिले. अनुभवसंपन्न केलं. अत्यंत आत्मिक समाधान दिलं. दैवत्वाची जाणीव दिली.
हे विश्वनिर्मात्या तुला मनोमन प्रणाम!
--------------------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.