प्रसाद नामजोशीआजवर अनेक बॉन्ड गर्ल्स आल्या आणि गेल्या. पण दोनदा बॉन्ड गर्ल होण्याचा मान मिळवलेली मॉड ही एकमेव. आज मागं वळून बघताना बॉन्डपटात काम करणं, आणि त्यातूनही बॉन्ड गर्लची भूमिका मिळणं, ही आनंदाचीच गोष्ट आहे, असंच मॉडला वाटतं. .‘...आणि तू आहेस तो जेम्स बॉन्ड. झीरो झीरो सेव्हन. लायसन्स टू किल. तुझा आज रात्रीचा निशाणा माझ्यावर तर नाही ना?’या थेट प्रश्नानं प्रत्यक्ष बॉन्डशी टक्कर घेणारी ही बॉन्ड गर्ल होती ऑक्टोपसी! आणि चित्रपट बॉन्डचा असूनही शीर्षक भूमिका कपाळावर लिहिली होती ती स्वीडिश अभिनेत्री मॉड अॅडम्सच्या. मॉडचं वैशिष्ट्य हे, की दोन बॉन्डपट पदरात पडलेली ही एकमेव बॉन्ड गर्ल आहे! द मॅन विथ द गोल्डन गन या बॉन्डपटात तिनं खलनायकाच्या खास मैत्रिणीची भूमिका केली होती. १९७४मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर तिनं काही चित्रपटांमधून लक्षवेधी भूमिका केल्या. जेम्स बॉन्ड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट ब्रोकोली यांनी तिला पुन्हा एकदा ऑक्टोपसीमध्ये आंतरराष्ट्रीय तस्करटोळीची प्रमुख अशी बॉन्ड गर्ल साकारायला पाचारण केलं. भारतात चित्रित झालेला हा एकमेव बॉन्डपट!मुळात मॉडला अजिबातच अभिनयबिभिनय करायचा नव्हता. तिला व्हायचं होतं दुभाषी! कारण तिला बालपणापासूनच वेगवेगळ्या भाषा शिकायची आवड होती. ती पाच भाषा अस्खलित बोलू शकते. १२ फेब्रुवारी १९४५ला मॉड सॉल्वेग क्रिस्टिना विकस्ट्रम या नावानं जन्माला आलेली ही स्वीडिश मुलगी अपघातानंच अभिनेत्री झाली. तिचे वडील सरकारदरबारी टॅक्स इन्स्पेक्टर होते आणि आई अकाउंट्स विभागात अधिकारी होती. वयाच्या अठराव्या वर्षी तारुण्यानं मुसमुसलेली मॉड एका दुकानात गेली असताना एका फोटोग्राफरला दिसली. त्यानं तिच्या परवानगीनं तिचा एक फोटो काढला आणि अॅलर्स मॅगझीननं आयोजित केलेल्या ‘मिस स्वीडन’ स्पर्धेसाठी पाठवला. मॉड त्या वर्षी मिस स्वीडन झाली नाही, तरी तिच्या मॉडेलिंग क्षेत्रातल्या करिअरनं सुसाट वेग घेतला. वयाच्या एकविसाव्या वर्षी तिनं रॉय अॅडम्स या फोटोग्राफरशी लग्नही केलं.स्वीडनमध्ये लुलो इथं जन्मलेली मॉड मॉडेलिंगसाठी पॅरिसला; आणि पुढे एलिन फोर्ड या प्रसिद्ध अमेरिकी मॉडेलिंग कंपनीशी तिचा करार करून न्यू यॉर्कला आली. मॉडेलिंग सुरू असतानाच तिला द बॉईज इन द बँड या चित्रपटात काम मिळालं. अर्थात तिथंही तिची भूमिका होती ती फोटोशूट करणाऱ्या मॉडेलचीच! चित्रपटात ओपनिंग क्रेडिट्ससाठी हे चित्रीकरण झालं. याच वर्षी हवाई फाईव्ह-ओ आणि कोजाक या दोन अमेरिकी टीव्ही मालिकांमध्ये ती पाहुणी कलाकार म्हणून दिसली. अभिनयाची इच्छा नसलेल्या आणि योगायोगाने मॉडेल झालेल्या मॉडच्या नशिबात लिहिला मात्र होता बॉन्ड!त्याचं झालं असं, की १९७४ साली आलेला द मॅन विथ द गोल्डन गन हा मॉडच्या आयुष्याला कलाटणी देणारा बॉन्डपट ठरला. या चित्रपटानं तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. कारण एकतर चित्रपट जेम्स बॉन्डचा होता. दुसरं म्हणजे यात ती झळकली ख्रिस्तोफर ली या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याबरोबर. छोट्या लांबीची भूमिका का असेना, पण मॉड बॉन्ड गर्ल झालीच. या पुण्याईवर तिला आणखी पाच-सात चित्रपट मिळाले. त्यात नॉर्मन जुईसन दिग्दर्शित रोलरबॉल आणि ब्रूस डर्न या अभिनेत्याबरोबरचा टॅटू या दोन गाजलेल्या चित्रपटांचा समावेश होता. याच दरम्यान फावल्या वेळात अमेरिकी नट-नट्या जे करतात तेही तिनं केलं. ते म्हणजे १९७५मध्ये घटस्फोट घेतला.सन १९८३मध्ये तिला इऑन फिल्म्सतर्फे नव्या बॉन्डपटासाठी विचारण्यात आलं. मात्र यावेळी ऑक्टोपसी या गूढ तस्कर स्त्रीच्या शीर्षक भूमिकेसाठी! जेम्स बॉन्ड रॉजर मूरसमोर एक परकीय गूढ तस्करसुंदरी! या चित्रपटात बॉन्ड होण्याची मुळात रॉजर मूरला इच्छाच नव्हती. त्याचा इऑन फिल्म्सशी सुरुवातीचा करार होता तीन बॉन्डपटांचा. लिव्ह ॲण्ड लेट डाय, द मॅन विथ द गोल्डन गन आणि द स्पाय हू लव्ह्ड मी असे तीन बॉन्डपट त्यानं त्याप्रमाणे केले. हा करार संपल्यावर पुढच्या प्रत्येक बॉन्डपटासाठी त्यानं स्वतंत्र करार केले. त्याप्रमाणे आधी मूनरेकर आणि त्यानंतर फॉर युवर आईज ओन्ली अशा आणखी दोन बॉन्डपटांत तो बागडला. प्रेक्षकांना (आणखी) कंटाळा यायच्या आत थांबावं असा विचार करून तो ऑक्टोपसीला नाही म्हणाला असावा.मग इऑन फिल्म्सनं कोण बरं असावा पुढचा बॉन्ड? असा एक सर्व्हे लोकांमध्ये जाऊन केला म्हणे. त्यात टिमोथी डाल्टन आणि लुईस कॉलीन्स या दोघांचा पर्याय दिला होता. (पैकी टिमोथीनं पुढे दोन बॉन्डपट केलेत, मात्र जेवताना जिलबीचा आग्रह आवडणाऱ्या बाबूरावांसारखा बॉन्डपटाचा आग्रह आवडणाऱ्या रॉजर मूरनं ऑक्टोपसीनंतर अ व्ह्यू टू अ किल हा सातवा बॉन्डपट केल्यावरच!) तेवढ्यात इऑन फिल्म्सच्या स्पर्धक निर्मात्यांनी (हेही होतेच, आणि त्यांनीही अनेक बॉन्डपट केलेत पण त्यांना अधिकृत बॉन्डपट म्हणत नाहीत!) नेव्हर से नेव्हर अगेन या बॉन्डपटाची घोषणा केली तीही शॉन कॉनरीला घेऊन. आता शॉन कॉनरी म्हणजे बॉन्ड असं समीकरण डॉक्टर नो या पहिल्या बॉन्डपटापासून इऑन फिल्म्सनंच तयार केलेलं आणि प्रेक्षकांनी स्वीकारलेलं. डायमंड्स आर फॉरएव्हर हा सहावा अधिकृत बॉन्डपट केल्यावर तर रॉजर मूरनं बॉन्डच्या भूमिकेसाठी त्यांना खो दिला होता. पण निवडणुकीच्या ऐन तोंडावर एका पक्षातल्या उमेदवाराने दुसऱ्या पक्षात जाऊन आमदारकीचं तिकीट मिळवावं, तसं अचानक शॉन कॉनरी प्रतिपक्षाच्या नेव्हर से नेव्हर अगेनला हो म्हणाला. डायमंड्स आर फॉरएव्हरनंतर अजिबात बॉन्ड साकारणार नाही, असा निश्चय केलेल्या कॉनरीला त्याच्या बायकोनं पटवलं म्हणे. यापुढे बॉन्ड करणार नाही हा तुझा निश्चय नेव्हर से नेव्हर अगेन या शीर्षकात दिसतो, त्यामुळे एवढा एक सिनेमा तू करच, असं तिचं म्हणणं होतं म्हणे. कॉनरीनं ऐकलं. (जेम्स बॉन्ड झाला म्हणून काय झालं, बायकोचं ऐकावं लागतंच!)निर्मात्यांनीही या चित्रपटाच्या शेवटी ‘टायटल नेव्हर से नेव्हर अगेन बाय मिशेलिन कॉनरी’ असा उल्लेख केलेला आहे. या काळात मूळ बॉन्डचे हक्क कुणाकडे वगैरे अनेक खटलेबिटले झाल्यानंतर शेवटी हा चित्रपट निर्मितीकडे गेला. आता प्रतिस्पर्धी निर्माते साक्षात कॉनरीचा बॉन्ड पडद्यावर आणताहेत म्हटल्यावर इऑन फिल्म्सनं रॉजर मूरला आग्रहाची जिलबी खाऊ घातलीच!.ऑक्टोपसीचं चित्रीकरण भारतात करायचं ठरलेलं होतं. त्यासाठी भारतीय तोंडावळ्याची बॉन्ड गर्ल शोधायचा प्रयत्नही झाला. पर्सिस खंबाटा आणि सूझी कोहेलो यांची चाचणीही घेतली गेली. पण अनेक नावांमधून निवड झाली ती मॉड अॅडम्सची. भारतीय वर्णाची दिसावी म्हणून तिचे केस काळे केले गेले आणि भारतीय कुटुंबात ती कशी वाढली हे सांगणारे चार संवाद चित्रपटात वाढवले गेले. गंमत म्हणजे बॉन्ड आणि बॉन्ड गर्ल ठरल्यानंतर तिसरा अभिनेता ठरला तो विजय अमृतराज! हा बिचारा विम्बल्डनला टेनिस खेळायला गेला होता. निर्माते ब्रोकोली यांनी त्याला मॅच खेळताना बघितलं आणि बॉन्डच्या मित्राची भूमिका पक्की झाली. तोही पठ्ठ्या ‘हो’ म्हणाला. चित्रपटात त्याचं नावही विजयच आहे आणि तो बॉन्डबरोबर टेनिसच्या रॅकेटनंच मारामारी करताना दिसतो.ऑक्टोपसीचा बराच भाग राजस्थानात चित्रित झालाय. जगप्रसिद्ध लेक पॅलेस आणि जगमंदिर ही जागा ऑक्टोपसीची राहण्याची जागा दाखवलेली आहे. सज्जनगढ पॅलेसला खलनायकाचा बंगला केलाय आणि बॉन्डचं हॉटेल म्हणून शिवनिवास पॅलेसची योजना केली आहे. मॉड अॅडम्सचं बहुतांश चित्रीकरण भारतातच झालं. चित्रपट नेहमीप्रमाणे चालला आणि बॉन्ड गर्ल नेहमीप्रमाणे चर्चिली गेली आणि नेहमीप्रमाणेच पुढे तिला अभिनयात काही विशेष कर्तबगारी दाखवता आली नाही.गंमत म्हणजे मॉड अॅडम्स १९८५मध्ये प्रदर्शित झालेल्या अ व्ह्यू टू किल या बॉन्डपटातही होती म्हणे. म्हणजे दोन नाही तर तीनदा ती ‘बॉन्ड गर्ल’ झाल्याची चर्चा असते. पण त्याला फारसा अर्थ नाही. कारण सॅनफ्रॅन्सिस्कोमधल्या मासळीबाजारात या बॉन्डपटाचं चित्रीकरण सुरू असताना मॉड तिथं सहज फिरायला आली होती आणि दिग्दर्शकानं विनंती केली म्हणून ती बॉन्डच्या मागच्या बाजूच्या गर्दीत सामील झाली होती. अर्थात तिला या दृश्यात शोधावं लागतं आणि मॉडचे चाहते जिला मॉड म्हणून दाखवतात ती अजिबातच मॉडसारखी दिसत नाही!बॉन्ड गर्ल झाल्यानंतर मॉडचं करिअर फारसं बहरलं नाही. ऑक्टोपसी आणि द मॅन विथ गोल्डन गन या दोन बॉन्डपटांनंतरच्या तिच्या चित्रपटांची नावं घ्यायचीच झाली तर हेल हंटर, लॉरा, द वूमेन्स क्लब, डेडली इन्टेन्ट, द सिकर्स, द किल रिफ्लेक्स अशी यादी करता येईल.लव्ह अमेरिकन स्टाइल, बिग बॉब जॉन्सन ॲण्ड हिज फँटॅस्टिक स्पीड सर्कस, द होस्टेज टॉवर, प्लेईंग फॉर टाईम, हॉटेल, मिशन ः इम्पॉसिबल यांसारख्या कार्यक्रमांतून ती टीव्हीवर दिसली आहे. कॅफे लूलो या स्वीडिश टॉक शोची ती दिग्दर्शक आहे. आपल्या जन्मगावाच्या नावाचा शो करणं तिला आवडलं असणार.बॉन्ड गर्ल म्हणून काम करणं किंवा अशी एक ओळख असणं हे तुम्हाला सातत्यानं यशाच्या दिशेनं नेतं, अशातला भाग नाही. मॉडलाही एकामागून एक सुपरहिट किंवा यशस्वी चित्रपटांचा आस्वाद घेता आला नाही. पण आज मागं वळून बघताना बॉन्डपटात काम करणं, आणि त्यातूनही बॉन्ड गर्लची भूमिका मिळणं, ही आनंदाचीच गोष्ट आहे, असंच मॉडला वाटतं.सन १९९९मध्ये मॉडनं दुसरं लग्न केलं. चार्ल्स रुबीन हा तिचा नवरा निवृत्त न्यायाधीश आहे. २०००साली तिनं द सेव्हंटीज् शो या अमेरिकी टीव्ही मालिकेत तान्या रॉबर्ट्स, क्रिस्टिना वेबॉर्न आणि बार्बरा कॅरेरा या कलाकारांसोबत हजेरी लावली. विशेष म्हणजे या निमित्तानं या चारही बॉण्ड गर्ल्स पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर एकत्र आल्या होत्या.आजवर अनेक बॉन्ड गर्ल्स आल्या आणि गेल्या. पण दोनदा बॉन्ड गर्ल होण्याचा मान मिळवलेली मॉड ही एकमेव. आपण कुठल्यातरी बाबतीत एकमेव आहोत हा आनंद तिला आज सहस्रचंद्रदर्शनाच्या वयात असताना सुखावत असणारच.(प्रसाद नामजोशी चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार व चित्रपटकला अध्यापक आहेत.)--------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.