वाचणारा माणूस हजार आयुष्यं जगत असतो; न वाचणारा एकच, अशा अर्थाचं अमेरिकी कादंबरीकार जॉर्ज आर.आर. मार्टिन यांचं एक उद्धृत आहे. हजार आयुष्य जगण्याची संधी देणारी ही पुस्तकं करतात तरी काय आपलं? पुस्तकं आपल्याला एकटं राहू देत नाहीत. पुस्तकं आपल्या जाणिवा विस्तारत नेतात.
पुस्तकांचं म्हणणं पटो न पटो, पुस्तकं आपल्याला विचारात पाडतात. मग पुस्तकविक्रेत्यांच्या दालनांत, ग्रंथालयांत, पुस्तकांच्या प्रदर्शनांमध्ये डोकावताना, रस्त्याकडेच्या जुन्या पुस्तकांच्या ढिगांशी रेंगाळताना अजून खूप वाचायचंय हे उमगत राहातं; आपण काहीच वाचलं नाहीये ही भावना जागी होते आणि मग वाचणारे वाचत राहातात; ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ हे समर्थवचन शिरी धरून.