डॉ. शिरीष चिंधडेराजेंद्र बनहट्टी यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा अष्टप्रकरणात्मक संग्रह म्हणजे रामप्रहर हे पुस्तक. लेखकाला त्याच्या रोजच्या प्रभातफेरीत रस्त्यात भेटणाऱ्या काही व्यक्तींची तपशिलातली रेखाचित्रे या पुस्तकात समाविष्ट आहेत. .कथालेखक राजेंद्र बनहट्टी यांनी लिहिलेल्या रामप्रहर या पुस्तकामध्ये समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती भेटतात. यात कुत्रे फिरवणारे श्वानपाल, भंगारवाले, कामवाल्या स्त्रिया, मंदिरगामी वृद्धा, इतरांच्या बागेतली फुले तोडणारे भक्त यांच्याबरोबरच तीस हजार रुपयांचे श्वान बाळगणारे, दारी मर्सिडीज झुलणारे, चार मजली इमारतींचे मालक, भल्या मोठ्या बंगल्यात एकटे राहणारे बहाद्दरही आहेत. आपल्या विविध आजारांचे रडगाणे गाणारे ‘आजोबा मंडळ’सुद्धा आहे. स्वतः लेखकाजवळ असलेली संवादऊर्जा, काहीसा चिवट-आगाऊ चौकसपणा आणि सजग जिज्ञासा यांच्या बळावर लेखक या सर्वांना भरपूर बोलते करतो, स्वतः बोलतो आणि खुबीने त्यांची छोटीमोठी कथा, कहाणी उलगडतो.‘आजोबा मंडळा’तल्या आजोबांना आजारपणे आणि औषधे यांचीच चर्चा घोळवत बसण्याऐवजी कुंपणावर उमललेली फुले पाहा, उगवत्या बालसूर्याचे सौंदर्य बघा, भोवती वावरणाऱ्या माणसांच्या तऱ्हा निरखा, झाडांवरचे रंगीत द्विजगण किती प्रकारचे स्वर लावताहेत ते ऐका, नुसते निःशब्द बसून राहा, असे सकारात्मकतेचे सिरप लेखक पाजतो. आम्ही आता निरुपयोगी आहोत, ही ज्येष्ठ नागरिकांची भावना कशी चुकीची आहे; प्रत्यक्षात ही मंडळी समाजाला कशी आणि कितीतऱ्हेने उपयोगाची आहेत ते अनेक उदाहरणांनी लेखक वकिली कौशल्याने पटवून देतो.लेखकाच्या रस्ता-मैत्रीत एकदाच काहीसा निसटता कटू स्वर लागला आहे तो भंगारवाल्या विठ्ठलाशी. ‘विठ्ठल तो आला आला’ अशी मजेदार ललकारी देणारा हा विठ्ठल भंगारवाला नेहमी किती नम्रपणे संवाद करतो, पण तोच गृहस्थ जेव्हा लेखकाकडे भंगार घ्यायला येतो तेव्हा किती तुटक आणि शुष्क बनतो, तरीही लेखक नाराज किंवा अपमानित होत नाही. किंबहुना यामागे लेखकाला एक सूत्र दडलेले गवसते. जाताजाता विठ्ठल ते सूत्र लेखकाला सुनावतो, “सर, मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा!” .चौदा नातवंडे असलेली आजी तान्ह्या नातीला भेटण्याच्या ओढीने रामप्रहरी रोज नातीकडे कशी खेचली जाते, याचे सुंदर दर्शन लेखकाला होते. लेखकाचे रस्त्यात पडलेले पैशाचे पाकीट त्याच्याकडे सुपूर्द करून एक पैसाही बक्षिशी न घेणारी, पण भावाचे नाते जोडणारी कामवाली जेव्हा डोळ्यात पाणी आणून एकेदिवशी दारुड्या मुलाला सोडविण्यासाठी पोलिसाचे दोनशे रुपये देण्याची याचना करते तेव्हा वेड्या मायेचे आणि माणुसकीचे एक अनोखे दर्शन लेखकाला घडते. द्रौपदी नाव असलेल्या या स्त्रीला लेखक ‘गांधारी’ असेच म्हणतो.कधीतरी काही गुंतागुंतीची व्यक्तिमत्त्वेदेखील भेटतातच. तीस हजाराचा जपानी ब्रीडचा कुत्रा बाळगणाऱ्या आणि मर्सिडीज चालवणाऱ्या कुलभूषणची दोस्ती म्हणजे रुटीनला कंटाळलेला आणि अचानक उगवणारा व लुप्त होणारा जणू गूढ धूमकेतूच. इथेही लेखक जाताजाता एक सूत्र सांगून जातो. रुटीन कुणालाच चुकले नाही, कुणाचाच पिच्छा ते सोडत नाही, मग राजा असो वा रंक. मर्ढेकारांनी म्हटल्याप्रमाणे ‘सर्वे जंतु रुटीनः’ हे भाष्य लेखक नोंदवितो. अशी अनेक सूत्रमय जीवनभाष्ये लेखनात गवसतात आणि ती लेखनाला वेगळी चिंतनशील डूब देतात.गल्लीपलीकडे ‘खिन्नतेचे विटके पांघरूण’ घेतलेल्या एका भूतबंगल्यात एकटाच राहणारा मनमौजी दिवाण एके सकाळी त्याच्या बंगल्यात निश्चेष्ट पडलेला आढळतो. काहीसे दीर्घ निवेदन असलेल्या या प्रकरणात, दारूने ऐन तारुण्यात गेलेला नातू आणि ते दुःख जगणारा आपला एकाकी प्रौढ मुलगा अशा यातना हृदयात घेऊन जगलेला हा दिवाण असा एकाएकी चटका लावून जातो. जीवनाचे एक भेसूर अंग लेखकाला दिसते. .रोज सात-आठ किलोमीटर चालत येऊन चार मजली इमारतीच्या बांधकामावर लक्ष ठेवणारा, साध्या पायजम्यातला इसम प्रत्यक्ष त्या इमारतीचा मालक असल्याचे थक्क करणारे सत्य लेखक नोंदवितो.रस्ता-मैत्रीत तारेचे कुंपण, गल्लीचे टोक, पदपथावरचा बाक एवढीच संभाषणाची भौगोलिक हद्द असते. एकमेकांच्या घरी दिवाणखान्यात बसून चहा घेत गप्पा छाटणे रस्ता-मैत्रीत बसत नाही. त्यामुळे मनोलेखनापेक्षा प्रसंगवर्णन आणि बाह्य व्यक्तिचित्रण यावर लेखनाचा अधिक भर पडेल की काय असे वाटून जाते. परंतु प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी उत्खननयोग्य खनिज असतेच. चालताचालता किंवा उभ्याउभ्या जेवढे खणता येईल तेवढे ते खणण्यात लेखक वाकबगार आहे. त्याला माणसांत, रोजच्या जीवनरहाटीत अखंड रुची आहे. हे वरकरणी साधेसोपे जीवनविषय वाटत असले, तरीही त्यात एखादे सखोल सूत्र लेखकाला गवसतेच. त्यामुळे मनप्रवेशही घडतो आणि अनेक रहस्ये उकलतात, उलगडतात. लेखक मुळात कसलेले कथाकार असल्याने अनेक प्रसंगांत त्याला कथाबीज गवसते. परिणामतः निवेदनात नाट्यमयता आणि कथात्मता खच्चून भरलेली आहे. किंबहुना लेखक या अनुभवांचे वर्णन एका ठिकाणी ‘पथनाट्य’ असे समर्पकपणे करतो.निरीक्षणातले बारकावे तर थक्क करणारे आहेत. एक साधी कामवाली ती काय, पण तिचे चक्क अर्धे पान चित्रदर्शी वर्णन केले गेले आहे. मात्र चार कुत्र्यांचे वर्णन करताना लेखक अल्पाक्षरी निरीक्षणे नोंदवतो. हॅपी नाव असलेल्या कुत्र्याला बघून लेखकाला म्हणावेसे वाटते, ‘मियॉँ, रोते क्यू हो?’ अंगभर नखशिखांत केसाळ असलेल्या या कुत्र्याचा चेहरा इतका सुतकी, की तो जणू कोणाचेतरी क्रियाकर्म करून आलेला आहे किंवा ते करायला निघाला आहे, असे गमतीचे वर्णन लेखक करतो. काल्पनिकाच्या अंगाने जाणाऱ्या खऱ्या किंवा खऱ्याच्या अंगाने जाणाऱ्या काल्पनिक व्यक्ती, असा गमतीदार संभ्रम लेखक निर्माण करतो. या अशा एकूण रसायनामुळे संपूर्ण लेखन अत्यंत रोचक आणि म्हणून वाचनीय झालेले आहे.वयाच्या चौऱ्याऐंशीचा फेरा संपवून पंचाऐंशीत प्रवेशणाऱ्या लेखकाच्या देहाची संध्याकाळ सुरू झालेली असली तरीही नवनवे अनुभव घेऊन येणारा रामप्रहर वेगळेच संध्यारंग उधळतो, नवी माणसे घेऊन नवे अनुभव आणि नवनवोन्मेषशाली सकाळ आणतो आणि लेखकाला ऊर्जेचा सकारात्मक स्रोत पुरवत राहतो. तेव्हा निष्कर्ष म्हणून म्हणता येईल की हा रामप्रहर वाचकांनादेखील अशीच सकारात्मकता उर्जा देईल यात शंका नाही.(डॉ. शिरीष चिंधडे इंग्रजी साहित्याचे अभ्यासक व प्राध्यापक अाहेत.)-----------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.