भाग १ : युद्धाचे धागे
डॉ. आशुतोष जावडेकर
आपल्याला माहीत असलेल्या पार्श्वभूमीचं इंग्रजीमधील पुस्तक वाचलं की ते वाचन सोपं जातं. कारगिल युद्धावरदेखील अनेक पुस्तकं आता लिहिली गेलेली आहेत. तुम्ही सहज गुगल केलं, तरी भारताच्या सगळ्या युद्धांवर वेगवेगळ्या लेखकांनी इंग्रजीमध्ये लिहिलेली पुस्तकं तुम्हाला आढळतील.
इंग्रजी भाषेतील पुस्तकं वाचायला मनापासून सुरुवात केल्यावर जाणवतं, की इंग्रजी साहित्यात युद्ध या विषयावर अक्षरशः हजारो पुस्तकं आहेत. युद्धावर आधारित कादंबऱ्या, कविता तर आहेतच, पण सैनिकांनी लिहिलेली आत्मकथनं किंवा पत्रकारांचे रिपोर्ताजदेखील आपल्याला विपुल संख्येनं आढळतात. आणि ते स्वाभाविकच म्हणायला हवं.
पहिल्या महायुद्धात इंग्लंड देश थेट सहभागी होता आणि दुसऱ्या महायुद्धात तर आख्खं लंडन बॉम्बनं भाजून निघालं होतं! युद्ध हे जगभर असलं, तरी ज्या देशांमध्ये ताजं युद्ध घडून जातं, त्या देशात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या साहित्यामध्ये ते अधिक प्रकर्षानं उमटावं यात आश्चर्य ते काय.
अमेरिकी इंग्रजीमध्येदेखील युद्ध साहित्य आहे, पण त्याचा दाह ब्रिटिश इंग्रजी साहित्याइतका नाही! हे सगळं मला आता का आठवत आहे विचारा? इस्राईल, लेबनॉन, इराण आणि सीरिया हे सगळे देश सध्या कुठल्याही क्षणी प्रचंड मोठा वणवा पेटेल या तयारीत आहेत.