प्रा. डॉ. कीर्ती मुळीक, पुणे / चित्रे- मिलिंद मुळीक
रोमनांनी ‘बुडा’ शहराच्या बाजूला संरक्षणासाठी उंच किल्ले उभारले. पुढे आशिया खंडातून आलेल्या मग्यार वंशीयांनी इथं ‘पेस्ट’ आणि ‘ओल्ड बुडा’ ही शहरं वसवली. या शहरांवर अनेक राजांनी स्वाऱ्या केल्या. शहरं उद्ध्वस्त होणं नि ती पुन्हा बांधली जाणं हे इथं अनेकवेळा घडलं. शेवटी १८७३मध्ये पेस्ट, ओल्ड बुडा आणि न्यू बुडा मिळून ‘बुडापेस्ट’ तयार झालं. हंगेरीची राजधानी म्हणून त्याला प्रतिष्ठा लाभली.
नोकरी-व्यवसायातली कामं मार्गी लावली आणि आम्ही बुडापेस्टच्या दौऱ्यासाठी तयार झालो. घरातले सर्वजण एकत्र सहलीला जात आहोत याचं समाधान झरू लागलं होतं. आपल्या कुटुंबासोबत प्रवास करणं किती आनंददायी असतं ना! खरंतर सहलीत आपण फार काही करत नाही, पण अशा एकत्र येण्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रत्यय येऊ लागतो.
मुंबई ते दुबई आणि दुबई ते बुडापेस्ट असा विमान प्रवास होता. मुंबईला कधी जाऊया यावरून घरात चर्चा सुरू झाली, तेव्हा महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण होतं. पंतप्रधानांची मुंबईमध्ये सभा होती. मुंबईमध्ये फोफावलेल्या वादळांच्या चित्रफिती प्रसारमाध्यमांवर फिरत होत्या. ‘आपल्याच सहलीच्यावेळी असं का होतं?’ असा एक अनाठायी प्रश्न पडला. मुंबईतल्या या वातावरणामुळे पुण्यात राहणाऱ्या आमची चिंता वाढली. आम्ही नुकताच रात्रभर ट्रॅफिकमध्ये अडकून बारा तासांचा मुंबई-पुणे प्रवास केला होता. या प्रवासाच्या आठवणीनं अंगावर शहारा आला.