सागर गिरमे
गाडी घ्यायची तर हाय एंडच, सगळे फीचर असलेली एकदम प्रीमिअम... पण तिची किंमत बघितली, की आपोआपच हे स्वप्न विरून जातं. पण आता चिंता करायची गरज नाही. जी गाडी परवडेल ती घेऊन आपल्याला हवी तशी अपग्रेड करणं, आता सहज शक्य आहे. अगदी हाय एंड!
गाडी घ्यायची असं ठरवलं, त्यासाठी पैशांची जुळवाजुळवही केली; पण तरीही समोर प्रश्न आलाच, व्हेरिएंट कोणतं घ्यायचं...? बेसिक व्हेरिएंट घेतलं तर आपल्याला पाहिजे ती फीचर्स त्यात नसतातच. आपल्याला पाहिजे ती फीचर्स फक्त हाय एंड किंवा सेकंड टॉप व्हेरिएंटमध्येच असतात. पण मग ते घ्यायचा विचार केला, की खिसा आणखी ताणला जातो.
मग तडजोड करण्याची भूमिका स्वीकारून आपल्या आवडीला मुरड घालत आपण खिशाला परवडेल तेच व्हेरिएंट घेण्यासाठी तयार होतो. आता मात्र ही तडजोड करण्याची आवश्यकताच उरलेली नाही. त्याचं कारण म्हणजे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये आलेला अपग्रेड्सचा ट्रेंड!