डॉ. अविनाश भोंडवे
कोणताही मानसिक आजार नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या मदतीशिवाय आणि पाठिंब्याशिवाय बरा होणे दुरापास्त असते. त्यामुळेच मेंदूच्या कार्यपद्धतीत व्यत्यय आणणाऱ्या कॅटॅटोनिया या आजाराबाबत सामाजिक जागृती आणि जाणीव निर्माण होणे नितांत गरजेचे आहे.
‘स्टॅच्यू’ नावाचा एक खेळ पूर्वी अनेकदा लहान मुले खेळताना दिसायची. यामध्ये ‘स्टॅच्यू’ असे ओरडल्यावर समोरच्या मुलाने, बिलकूल हालचाल न करता निस्तब्ध उभे राहायचे असे.
कॅटॅटोनिया (Catatonia) नामक एका मनोशारीरिक आणि मज्जासंस्थेच्या आजारामध्ये रुग्ण असाच एखाद्या पुतळ्यासारखा निश्चल राहतो.
कॅटॅटोनिया हा एक न्यूरोसायकिअॅट्रिक लक्षणांचा समूह असलेला विकार (सिंड्रोम) आहे. या विकारात मेंदूच्या कार्यपद्धतीत व्यत्यय येत असतो.
सभोवतालच्या जगात जे घडतेय ते समजून घेण्याची प्रक्रिया बिघडते आणि घडणाऱ्या घटनांबाबत प्रतिक्रिया देणेही दुरापास्त होते. कॅटाटोनियाचे रुग्ण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर एकतर अजिबात प्रतिक्रिया देत नाहीत किंवा काही तरी जगावेगळीच प्रतिक्रिया देतात.
परस्पर संवाद करण्याच्या क्षमतेचा अभाव, सर्वसामान्य हालचालींपेक्षा काही वेगळ्या विक्षिप्त हालचाली, नाही तर हालचालींचा पूर्ण अभाव आणि तऱ्हेवाईक वागणूक अशी या विकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये असतात.
जर्मन मानसोपचारतज्ज्ञ कार्ल काहलबॉमने १८७४मध्ये या आजारावर संशोधन करून, त्याची वैशिष्ट्ये वर्णन करून त्याला ‘कॅटॅटोनिया’ हे नाव दिले. त्यानंतर या आजारांवर थोडेफार संशोधन होत गेले, पण रुग्णांच्या बाबतीत याचे संख्यात्मक निदान फारसे झाले नाही.
याचे कारण म्हणजे, गेल्या दोन-तीन दशकांपर्यंत, कॅटॅटोनिया हा फक्त स्किझोफ्रेनिया असलेल्या लोकांमध्येच होतो, अशी चुकीची समजूत प्रचलित होती. कॅटॅटोनियाचे निदान करण्यासाठी, रुग्ण तपासणीमध्ये, किती आणि कोणते निकष आवश्यक आहेत यावर मानसोपचार तज्ज्ञांमध्ये मतभेद होते.
याव्यतिरिक्त, खूप चिडचिड करणे किंवा अचानक मूक आणि निश्चल होणे अशी इतर आजारांमध्ये दिसणारी काही लक्षणे यातही दिसतात.
लक्षणे
मानसिक आजारांच्या निदानांसाठी मार्गदर्शक म्हणून वापरल्या जाणाऱ्या, ‘डायग्नॉस्टिक अॅण्ड स्टॅटिस्टिक मॅन्युअल’च्या पाचव्या आवृत्तीनुसार (डीएसएम-५) कॅटॅटोनियाच्या निदानासाठी, रुग्णामध्ये खालील बारापैकी किमान तीन लक्षणे असणे आवश्यक असते.
स्तब्धता ः कोणत्याही प्रकारच्या उत्तेजनाला प्रतिसाद म्हणून शरीराची कोणतीही हालचाल न करणे. त्याचप्रमाणे कॅटॅलेप्सी किंवा चेहरा पूर्ण अविचल असणे.
मूकपणा किंवा म्युटिझम ः कोणताही शाब्दिक संवाद न करणे.
मेणाच्या पुतळ्यासारखी लवचिकता ः स्वतः शरीराची हालचाल न करणे, पण दुसऱ्याने त्या हालचाल न करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराची स्थिती बदलली, तरी त्याच बदललेल्या स्थितीत स्तब्ध राहणे.
नकारात्मकता ः कुणीही काही विचारल्यास उत्तर न देणे, ऐकून न ऐकल्यासारखे करणे.
पोस्चरिंग ः खाली डोके वर पाय, अशा प्रकारच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाणारी स्थिती धारण करणे.
वागण्याची पद्धत ः शरीराच्या विचित्र हालचाली आणि हातवारे
स्टिरिओटाइपी ः काही विचित्र हालचाली विनाकारण वारंवार करणे .
कोणत्याही कारणाशिवाय सतत चिडचिड करणे, चेहरा सतत वेडावाकडा करणे.
इकोलालिया ः दुसरे बोलतील त्या शब्दांची पुनरावृत्ती करणे.
इकोप्रॅक्सिया ः इतरांच्या शारीरिक हालचालींची पुनरावृत्ती करत राहणे.
संपूर्ण शरीर ताठ करून दीर्घकाळ तसेच राहणे.
स्वयंचलित आज्ञाधारकता ः दुसऱ्यांनी दिलेल्या आज्ञांचे विचार न करता तंतोतंत पालन करणे
कॅटॅटोनियाचा रुग्ण दीर्घकाळ कोणतीही हालचाल न करता निश्चल राहतो. स्किझोफ्रेनियाशी संबंधित कॅटॅटोनियामध्ये ही निश्चलता, इतर मानसिक आजारांशी संबंधित स्किझोफ्रेनियाच्या तुलनेत दीर्घकाळ चालू राहते.
या इतर आजारात ही निश्चलता मधेच दीर्घकाळ नाहीशी होते आणि रुग्ण बऱ्याच कालावधीसाठी लक्षणविरहित राहतो. मात्र कॅटॅटोनियामध्ये असे होत नाही.
कॅटाटोनियाचे विविध प्रकार
कॅटॅटोनियाचे तीन प्रकार असतात.
अकायनेटिक कॅटॅटोनिया किंवा रिटार्डेड कॅटॅटोनिया ः यात रुग्ण अजिबात हालचाल करत नाही आणि इतरांना कोणताही प्रतिसाद देत नाही. ती व्यक्ती सतत शून्य नजरेने पाहत राहते आणि इतरांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देत नाही.
एक्सायटेड कॅटॅटोनिया ः यात रुग्ण कमालीच्या ऊर्जेने अनियंत्रित हालचाल करत राहतो. तो अस्वस्थ आणि चिडलेला असतो आणि त्यात कधी कधी तो स्वतःला इजाही करून घेतो.
मॅलिग्नंट कॅटॅटोनिया ः यात रुग्णामध्ये उच्च रक्तदाब, जलद श्वासोच्छ्वास आणि जलद हृदयगती अशा वैद्यकीय समस्यांचा समावेश असतो.
कारणमीमांसा
कॅटॅटोनिया होताना अंतर्गत शारीरिक क्रियेत कोणते बदल होतात याबद्दल वैद्यकशास्त्राला अजून पूर्ण माहिती नाही. पण शरीरविकृतीशास्त्राच्या गृहितकानुसार, मेंदूच्या पृष्ठभागाच्या आत असलेल्या मज्जातंतूंच्या जाळ्यामध्ये ग्लोबस पॅलिडस नावाचा एक भाग असतो. त्यातील अंतर्गत घटक मेंदूच्या थॅलॅमस नावाच्या भागाच्या कार्याला कमालीचा प्रतिबंध करतात. त्यामुळे ही लक्षणे उद्भवतात.
एमआरआय इमेजिंग वापरून केलेल्या एका संशोधनात, कॅटॅटोनियाच्या रुग्णांमध्ये मेंदूच्या उजव्या मध्यवर्ती ऑर्बिटोफ्रंटल या भागातील आणि त्या भागातील मज्जापेशींचे कार्य आणि संदेशवहन बिघडलेले आढळून आले आहे.
कॅटॅटोनियाचे निदान
कॅटॅटोनियाचे निदान करताना, प्रथम मज्जासंस्थेची तपासणी केली जाते. यामध्ये शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रिया, प्रतिक्रिया आणि सभोवतालच्या जगाला रुग्ण कसा प्रतिसाद देतो किंवा देत नाही, या संबंधातल्या शारीरिक चाचण्या प्रत्यक्ष रुग्ण तपासून केल्या जातात.
त्यानंतर, रुग्णाला कॅटॅटोनिया आहे किंवा नाही आणि असल्यास त्याच्या तीव्रतेच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी, प्रमाणित मूल्यांकन साधने वापरली जातात. यामध्ये सर्वसाधारणपणे, बुश फ्रान्सिस कॅटाटोनिया रेटिंग स्केल ही पद्धत वापरली जाते.
रुग्णाला कॅटॅटोनिया आहे याची खात्री पटल्यानंतर कॅटॅटोनियाचे कारण शोधावे लागते. कॅटॅटोनिया नेहमी अन्य मानसिक किंवा शारीरिक आजारांशी संबंधित असतो. गंभीर किंवा अगदी प्राणघातक आजारांसोबतही कॅटॅटोनिया उद्भवू शकतो. त्यामुळे रुग्णाला एखादा गंभीर शारीरिक आजार आहे का, हे प्रथम तपासावे लागते.
कॅटॅटोनियाच्या निदान प्रक्रियेमध्ये, रुग्णाला असलेल्या शारीरिक आजारांचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचण्या, नैदानिक आणि इमेजिंग चाचण्या केल्या जातात. इमेजिंग चाचण्यांमध्ये सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन आणि इतर इमेजिंग चाचण्यांचा समावेश असतो.
प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये, रक्त, मूत्र आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (पाठीच्या कण्याच्या पोकळीतील द्रव पदार्थ) याबाबत चाचण्या केल्या जातात. त्यातून शारीरिक द्रवपदार्थांमधील बदल, रोगजंतूंचे संक्रमण आणि इतर रासायनिक बदल शोधले जातात.
मेंदूच्या कार्यासंबंधित चाचण्यांमध्ये इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्रामद्वारे (ईईजी) मेंदूतील विद्युत क्रियांचे विश्लेषण आणि नोंद केली जाते. त्यामुळे फेफरे किंवा अपस्मार असण्याच्या शक्यता पारखता येतात.
कॅटॅटोनियाचे व्यवस्थापन आणि उपचार
कॅटॅटोनियाचा उपचार करताना रुग्णाला इतर कोणते आजार आहेत, यावर उपचारासाठी कोणती पद्धत वापरायची हे अवलंबून असते. रुग्णाला जर काही शारीरिक किंवा मज्जासंस्थेचे आजार असतील, तर सर्वप्रथम त्या आजारांवर उपचार करणे आवश्यक असते. या आजारांच्या उपचारांनीच रुग्णाची कॅटॅटोनियाची लक्षणे आटोक्यात येऊ शकतात. परंतु अन्य मानसिक आजार असतील, तर इतर उपचार पद्धती वापरल्यास हा आजार नियंत्रित करण्याची शक्यता उत्तम असते.
विशेष औषधे आणि इलेक्ट्रोकन्व्हल्झिव्ह थेरपी (इसीटी) या दोन पद्धतींनी कॅटॅटोनियावर उपचार केले जातात. ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशनसारखी इतर उपचार तंत्रे आहेत, पण व्यापक प्रमाणात ही तंत्रे पुरेशी परिणामकारक आहेत का, हे समजण्यासाठी भावी काळात अधिक संशोधन आवश्यक आहे.
औषधे
कॅटॅटोनियाच्या उपचारांसाठी बेंझोडायझेपाइन्स गटातील औषधे प्राथमिक पातळीवर वापरली जातात. ती सुरक्षित आणि अतिशय प्रभावी असतात. या औषधाच्या उपचाराने कॅटॅटोनिया असलेल्या ६० ते ९० टक्के रुग्णांमध्ये सुधारणा होते.
लोराझेपाम हे सर्वात जास्त वापरले जाणारे औषध आहे, परंतु क्लोनाझेपाम, डायझेपाम आणि झोलपिडेम यांसारखी इतर औषधेदेखील परिणामकारक असतात. ही औषधे इंजेक्शन स्वरूपात शिरेवाटे किंवा कंबरेवर दिली जातात. पण गोळीच्या स्वरूपात दिल्यासही उपयुक्त ठरतात.
मूड स्टॅबिलायझर किंवा अँटिसायकोटिक गटातील औषधेदेखील कॅटॅटोनियात उपयुक्त असतात. परंतु प्रथम पातळीचे उपचार म्हणून ती वापरली जात नाहीत.
कॅटॅटोनियाची प्रारंभिक लक्षणे सुधारल्यानंतर इतर लक्षणांवर उपचार करण्यासाठी मात्र ती सर्वात जास्त उपयुक्त ठरतात. आजाराच्या सुरुवातीच्या स्थितीत अँटिसायकोटिक औषधे वापरल्यास मॅलिग्नंट कॅटाटोनिया किंवा न्यूरोलेप्टिक मॅलिग्नंट सिंड्रोम उद्भवू शकतात.
इलेक्ट्रोकन्व्हल्झिव्ह थेरपी
इलेक्ट्रोकन्व्हल्झिव्ह थेरपी (इसीटी) या उपचार पद्धतीत, मेंदूच्या विशिष्ट भागात अतिशय सौम्य विद्युतप्रवाह सोडला जातो, त्यामुळे रुग्णाला एक छोटासा झटका मिळतो. मात्र इसीटी देताना रुग्णांना भूल दिली जात असल्यामुळे त्यांना गाढ झोप येऊन उपचारांदरम्यान वेदना होत नाहीत.
इसीटी हा एक प्रभावी उपचार असून कॅटॅटोनिया असलेल्या जवळजवळ सर्व रुग्णांमध्ये तो उपयुक्त ठरतो. विशेषतः मॅलिग्नंट कॅटाटोनियासाठी हा प्रमुख आणि अनेकदा जीवन वाचवणारा उपचार ठरतो. औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या कॅटाटोनिया रुग्णांसाठी इसीटी उपयुक्त असतो.
उपचारांचे दुष्परिणाम
कॅटॅटोनियाच्या उपचारांमधील संभाव्य गुंतागुंत आणि दुष्परिणाम एखाद्या व्यक्तीला कोणते उपचार दिले जातात किंवा कोणत्या उपचारांचे संयोजन केले जाते, यावर अवलंबून असतात.
मॅलिग्नंट कॅटॅटोनियामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावू शकतो.
अन्य प्रकारच्या कॅटॅटोनियामध्ये उपचार उशिरा सुरू झाल्यास आणि आजार दीर्घकाळ राहिल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता दुरावते. कॅटॅटोनियामध्ये अंतर्भूत मानसिक आणि शारीरिक आजारांवरील उपचार करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते.
भारतातील मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णात कॅटॅटोनियाचे प्रमाण ९.४५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. कोणताही मानसिक आजार नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या मदतीशिवाय आणि पाठिंब्याशिवाय बरा होणे दुरापास्त असते.
त्यामुळे या आजाराबाबत सामाजिक जागृती आणि जाणीव निर्माण होणे नितांत गरजेचे आहे.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.