योगिराज प्रभुणे
लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी म्हटलं की आनंद, उत्सव आणि फराळ हे आलंच. संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या सणाची खरी लज्जत असते, ती या फराळाच्या ताटात.
दिवाळीच्या फराळाला महाराष्ट्रात एक वेगळीच प्रतिष्ठा आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून फराळातील उलाढाल सातत्यानं वाढत आहे. त्यातून स्थानिक उद्योग, महिलांचे लघुउद्योग, गृहउद्योग, स्थानिक बाजारपेठेला गती मिळत असल्याने दिवाळी फराळ एकंदर आर्थिक प्रवाहात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतो.
दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव. या उत्सवात संपूर्ण विश्वच जणू प्रकाशात न्हालं आहे, असं भारलेलं वातावरण असतं. घराघरांत लावलेल्या लखलखत्या पणत्यांमधून आणि विविधरंगी, वेगवेगळ्या आकारातल्या आकाशकंदिलांतून मुक्तपणे उधळलेल्या तेजस्वी रंगांमधून रात्रीच्या गर्भातलं आभाळदेखील उजळून निघतं.
दिव्यातून बाहेर पडणारा प्रकाशाचा प्रत्येक किरण अंधारावर मिळवलेल्या विजयाची गाथा सांगत असतो. दिवाळीची रात्र जितकी उत्साहित, सुंदर आणि प्रकाशमान असते, तितकीच मनमोहक, प्रफुल्लित आणि आनंददायी दिवाळीची सकाळ असते. घरादारात रंगीबेरंगी रांगोळीनं सजावट झालेली असते.
फुलांचा सुगंध, अत्तरांचे सुवास, देवापुढे लावलेल्या उदबत्त्यांचा मंद परिमळ घरातलं वातावरण मंगल करतात. कुटुंबातली सर्व मंडळी एकत्र बसल्यानंतर समोर फराळाची ताटं सजतात. चकली, लाडू, शंकरपाळी, करंज्या अशा वैविध्यपूर्ण स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असते.