डॉ. श्रीकांत कार्लेकरचराईदेव हा शब्द तीन ताई-अहोम शब्दांपासून तयार झाला आहे, चे-राई-दोई. ‘चे’ म्हणजे शहर किंवा गाव, ‘राई’ म्हणजे चमकणे आणि ‘दोई’ म्हणजे टेकडी. थोडक्यात, चराईदेव म्हणजे, ‘डोंगरावर वसलेले चमकणारे शहर’..पूर्व आसाममधील अहोम घराण्याची सातशे वर्षे जुनी ‘चराईदेव मैदाम’ (Charaideo Maidam) नावाची शाही दफनभूमी संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (युनेस्को) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सांस्कृतिक वारसा म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या ४६व्या सत्रात जुलैच्या २६ तारखेला हा निर्णय घेण्यात आला. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत युनेस्कने सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे म्हणून मान्यता दिलेल्या स्थळांचा समावेश होतो.भारताने २०२३-२४मध्ये जाहीर होणाऱ्या वारसा स्थानांच्या यादीत ‘चराईदेव मैदाम’चा सांस्कृतिक वारसा म्हणून समावेश व्हावा अशी शिफारस केली होती. वर्ष २०२३-२४मधील जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी जगभरातील एकूण बावन्न स्थळांच्या शिफारशी करण्यात आल्या होत्या.मैदाम किंवा तुमुलस म्हणजे कबरीवर उभारलेला मातीचा उंचवटा अथवा ढिगारा. आसामचे पिरॅमिड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चराईदेवमध्ये, जवळजवळ सहा शतके म्हणजे तेराव्या शतकाच्या सुरुवातीपासून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत (१२२८-१८२६), आसामवर राज्य करणाऱ्या अहोम घराण्यातील स्त्री-पुरुषांचे मैदाम आहेत. चराईदेव मैदाम हे जागतिक वारसा स्थळांमधील सांस्कृतिक वारसा श्रेणीत स्थान मिळालेले ईशान्य भारतातील पहिले स्थान आहे. याआधी आसाममधील काझिरंगा आणि मानस राष्ट्रीय उद्यानांना नैसर्गिक वारसा म्हणून जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.आत्तापर्यंत शोधण्यात आलेल्या ३८६ मैदाम-सदृश रचनांपैकी चराईदेव येथील नव्वद शाही दफनस्थळे या परंपरेचे सर्वोत्तम जतन केलेली, प्रातिनिधिक आणि सर्वात परिपूर्ण उदाहरणे गणली जातात.अहोम हा भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेशात आढळणारा वांशिक गट आहे. ताई-अहोम म्हणूनही हा वांशिक गट ओळखला जातो. यात प्रामुख्याने सन १२२८च्या आसपास आसामच्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यात आलेल्या ताई लोकांचे मिश्र वंशज आणि कालांतराने त्यांच्यात सामील झालेले स्थानिक आहेत. ताई समूहाचा नेता चाओ लुंग सुकाफा, आणि त्याच्या नऊ हजार अनुयायांनी अहोम राज्याची स्थापना केली, असे यासंबंधीच्या दस्तावेजावरून लक्षात येते. अहोम राजवंशाचा पाया घालणारा अहोम राज्याचा हा पहिला राजा पटकाई पर्वतीय प्रदेश ओलांडून ब्रह्मपुत्रा खोऱ्यात पोहोचला होता. अहोम वंशाने सन १२२८पासून १८२६पर्यंत सध्याच्या आसाममधील ब्रह्मपुत्रा खोऱ्याच्या बहुतांश भागावर राज्य केले. अहोम हे भारतातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राजवंशांपैकी एक होते..चराईदेव गुवाहाटीच्या पूर्वेला ४०० किलोमीटरपेक्षा थोड्या जास्त अंतरावर आणि पूर्व आसाममधील शिवसागर शहराच्या पूर्वेला सुमारे ३० किमी अंतरावर आहे. राजा चाओ लुंग सुकाफाने १२५३मध्ये वसवलेली चराईदेव ही अहोम राजवंशाची पहिली राजधानी होती, असे मानले जाते. अहोम राजांच्या पुढच्या सहा शतकांच्या इतिहासात राजधानीचे ठिकाण अनेकवेळा बदलले गेले, तरी संपूर्ण अहोम राजवटीत राजवंशाच्या स्थापनेतील महत्त्वामुळे चराईदेव सत्तेचे प्रतिकात्मक केंद्र राहिले, असे अभ्यासक सांगतात. राजा सुकाफाचा अंत्यसंस्कार ह्या चरईदेव मैदाममध्येच केला गेला. अहोम राजांचे राज्य आधुनिक काळातील बांगलादेशापासून बर्माच्या (पूर्वी ब्रह्मदेश, आता म्यानमार) आतपर्यंत पसरले होते. सक्षम प्रशासक आणि शूर योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहोम राजघराण्याला आसामच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.१८२६मध्ये यांदाबूच्या तहानंतर म्यानमारने आसामवर आक्रमण केल्याने आणि त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आसाम विलीन करून घेतल्याने या राजवंशाचे शासन संपले. ब्रिटिश सम्राटाने राज्याचा कारभार स्वीकारला आणि आसामच्या वसाहती युगाला सुरुवात झाली.चराईदेव मैदाममध्ये अहोम राजघराण्याचे अवशेष आहेत. प्राचीन इजिप्शियन परंपरेप्रमाणेच अहोम राजघराण्यातील मृत व्यक्तींना त्यांच्या ‘परतीच्या जीवनासाठी’ आवश्यक असलेल्या साहित्यासह, इतकेच नव्हे तर त्यांचे नोकर, घोडे, पशुधन आणि अगदी त्यांच्या बायकांसह दफन केले जात असे. राजाच्या मृत्यूनंतर त्याची ‘काळजी घेण्यासाठी’ किमान दहा व्यक्तींना जिवंत दफन केले जात असे. ही प्रथा राजा रुद्र सिंहाने नंतरच्या काळात रद्द केली. १८व्या शतकानंतर मात्र अहोम राज्यकर्त्यांनी अंत्यसंस्काराची हिंदू पद्धत अवलंबली आणि त्यानंतर चरईदेव येथील मैदाममध्ये अंत्यसंस्कार केलेल्या अस्थी आणि अस्थींचे दफन करण्यास सुरुवात केली.सतराव्या शतकाच्या मध्यावर मुघलांशी लढा देणारे अहोम सेनापती आणि लोकनायक लच्छित बारफुकन यांची ४००वी जयंती गेल्या वर्षी साजरी करण्यात आली. या निमित्ताने दिल्लीच्या विज्ञान भवनात मांडलेल्या एका प्रदर्शनात ताई-अहोमांच्या अद्वितीय दफन वास्तुकला आणि परंपरा दर्शविणारे मैदामचे मॉडेलही होते..आसाममधील या दफन ढिगाऱ्यांची तुलना इजिप्शियन पिरॅमिड्स आणि प्राचीन चीनमधील शाही कबरींशी केली जाते. साडेचार हजार वर्षांची परंपरा असणाऱ्या इजिप्तमधील पिरॅमिडप्रमाणेच मैदाम आसाममधील ताई-अहोम समुदायाची राजघराण्यातील सदस्यांचे दफन करण्याची मध्ययुगीन परंपरा दर्शवितात. मैदाम ताई-अहोम समुदायाच्या अनोख्या अंत्यसंस्काराच्या पद्धती प्रतिबिंबित करतात, असे चराईदेव मैदामची इजिप्तच्या पिरॅमिडशी तुलना करताना लक्षात येते.चराईदेव हे लंकुरी या भगवान शिवाचा अवतार समजल्या जाणाऱ्या अहोमांच्या पूर्वज देवांचे निवासस्थानदेखील मानले जाते. मैदाममध्ये एक किंवा अधिक खोल्या आणि घुमटाकृती डोलारा असलेले एक भव्य भूमिगत तळघर असते. हे मातीच्या ढिगाऱ्याने झाकलेले असते. बाहेरून पाहताना तो एक अर्धगोलाकार ढिगारा दिसतो. ढिगाऱ्याच्या वरच्या बाजूला एक छोटासा खुला मंडप असतो. एक अष्टकोनी बटू भिंत मैदामला वेढून बांधलेली असते. मैदामाच्या उंचीवरून सामान्यतः आत पुरलेल्या व्यक्तीच्या राजघराण्यातील महत्त्वाविषयी अंदाज बांधता येतो.उपलब्ध माहितीनुसार पूर्वी बहुतेक मैदाम खोल्या लाकडाचे खांब आणि तुळया वापरून बांधल्या गेल्या होत्या. नंतर गदाधर सिंह राजाने आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्यासाठी विटा आणि दगडांचा वापर केला. आज चराईदेव मैदामस्थळी दिसणारे बरेचसे मैदाम वेगवेगळ्या राजांच्या नावाने तयार केलेले असले तरी त्यापैकी अनेक मैदाम नेमके कोणत्या राजाच्या नावे उभारले गेले ते आजही गूढच आहे.चराईदेव हा शब्द तीन ताई-अहोम शब्दांपासून तयार झाला आहे, चे-राई-दोई. ‘चे’ म्हणजे शहर किंवा गाव, ‘राई’ म्हणजे चमकणे आणि ‘दोई’ म्हणजे टेकडी. थोडक्यात, चराईदेव म्हणजे, ‘डोंगरावर वसलेले चमकणारे शहर’.आजही आसामला भेट देणाऱ्या पर्यटकांचे एक आकर्षण असणाऱ्या मैदामांचे व्यवस्थापन सध्या प्राचीन स्मारके आणि स्थळे अवशेष कायदा (१९५८) आणि आसाम प्राचीन स्मारके आणि अभिलेख अधिनियम (१९५९) या कायद्यांच्या आधारे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि आसाम राज्य पुरातत्व विभागाकडे आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे मैदामची उंची मात्र आता कमी झाली आहे.पाव शतकापूर्वी, २०००-०२मध्ये, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या गुवाहाटी विभागाने मैदाम क्रमांक दोनचे उत्खनन केले होते. मैदामची सगळी रचना कायम राहिली असल्याचे त्यात दिसून आले. या मैदामचे घुमटाकृती छप्पर भाजलेल्या विटांचे होते आणि त्याला अष्टकोनी सीमा भिंतीने वेढले होते, असे दिसून आले. या मैदामच्या छताला एक छिद्र होते. हे पूर्वी मैदामची लूट झाल्याचे निर्देशक होते. मुघल सेनापती मीर जुमलाकडून आणि नंतर १८२६मध्ये ब्रिटिश सेनेकडून बऱ्याच मैदाम रचना लुटल्या गेल्या होत्या. या मैदामचा कमानीच्या आकाराचा दरवाजा उत्खननानंतर पश्चिमेकडे सापडला, जो मुळात विटा आणि दगडी बांधकामाने मढवलेला होता.हे मैदाम आधीच लुटले गेले असले तरी पाच व्यक्तींच्या सांगाड्यांचे अवशेष, हस्तिदंताचे सजावटीचे तुकडे, लाकडी वस्तूंचे अनेक तुकडे, राजेशाही अहोम चिन्हाचे चित्रण करणारे हस्तिदंती फलक, हत्ती, मोर आणि विविध फुलांचे कोरीवकाम अशा अनेक कलाकृती उत्खननात मिळाल्या. या मैदामचा नेमका काळ निश्चित करता आलेला नाही, परंतु ते १८व्या शतकाच्या पूर्वार्धातील असावे असा संशोधकांचा अंदाज आहे.(डॉ. श्रीकांत कार्लेकर भूविज्ञान अभ्यासक आणि लेखक आहेत. )------------------------