वैद्यकीयदृष्ट्या पोट म्हणजे जठर. हा अन्न पचवणारा एक मांसल अवयव पचनसंस्थेच्या मार्गाचा प्रमुख हिस्सा असतो. जठर हे अन्नपचन संस्थेचे महत्त्वाचे शक्तिस्थान असते. त्याच्या आरोग्यासाठी काळजी घ्यावीच, पण होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रासाची किरकोळ आजार म्हणून बोळवण करू नये.
“आधी पोटोबा मग विठोबा...”, “कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी...”, “पापी पेट का सवाल है...”, “हातावर पोट असणे...”; पोट या संकल्पनेवर अशा असंख्य म्हणी आणि वाक्प्रचार आपण वाचत आणि ऐकत असतो.
व्याकरणाच्या दृष्टीने केवळ दोन अक्षरे आणि एक ‘ओ’कार असलेल्या पोट या शब्दाचे महत्त्व पंचखंडात व्यापलेले आहे. परमेश्वर जसा अनादी आणि अनंत आहे, तसेच पोटही जीवसृष्टीच्या निर्मितीपासून माणसांची सोबत करत आहे आणि ती अनंतकाळ सुरूच राहील.
तुलनेत आकाराने लहान असणाऱ्या या अवयवाने पृथ्वीवरच्या तमाम प्राण्यांच्या आयुष्यात महाकाय प्रश्न निर्माण केले आहेत. पोट नसते तर जग कितीतरी साधे, सरळ आणि समस्यारहीत झाले असते.
वैद्यकीयदृष्ट्या पोट म्हणजे जठर. हा अन्न पचवणारा एक मांसल अवयव पचनसंस्थेच्या मार्गाचा प्रमुख हिस्सा असतो. आपण सेवन केलेल्या अन्नाला घुसळून एकजीव करणे, त्यातील प्रथिने पचवणे आणि एकसंध झालेले अन्न पुढे लहान आतड्यात ढकलणे हे याचे कार्य असते. त्यामुळे याला पचनसंस्थेचे शक्तिगृह किंवा पॉवरहाऊस म्हटले जाते.
पोट हा इंग्रजी ‘जे’ (J) आकाराचा अवयव असतो आणि तो अन्न पचवतो. हे एन्झाईम (रासायनिक प्रतिक्रिया निर्माण करणारे पदार्थ) आणि अॅसिड (पाचन रस) तयार करते. एन्झाईम आणि पाचक रसांचे हे मिश्रण अन्नाचे तुकडे करते, त्यामुळे अन्न तुमच्या लहान आतड्यात जाऊ शकते. पोट गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (GI) मार्गाचा भाग आहे. जीआय ट्रॅक्ट ही एक लांब नळी आहे जी तोंडापासून सुरू होऊन गुदद्वाराकडे धावते, जिथे शरीर मल सोडते. जीआय ट्रॅक्ट हा पचनसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहे.
जठराचे कार्य
जठराची तीन मुख्य कार्ये असतात - काही काळ अन्न साठवणे.
जठराचे आकुंचन प्रसरण होऊन अन्न घुसळले जाते, त्याचे विघटन होते. अन्नातील घन पदार्थ आणि पातळ पदार्थ एकत्रित होतात आणि जठरातील पाचक रस आणि आम्ल हे सर्व एकत्रितपणे मिसळले जातात.पाचक रस आणि आणि इतर विशेष पेशी तयार करणे व त्यांच्याद्वारे अन्नपचनाचा जठरातील टप्पा कार्यान्वित करणे.
पचनसंस्थेतील प्रत्येक अवयव अन्न आणि द्रव पदार्थांचे विघटन करतो, पाचक रसाने त्यातील ठरावीक अन्नघटकांचे पचन होते आणि पचनसंस्थेच्या पुढील अवयवात पाठवले जाते. पचन प्रक्रियेदरम्यान, पोषक तत्त्वे आणि पाणी शोषून घेतले जाते. शेवटी उरलेले टाकाऊ पदार्थ मोठ्या आतड्यातून उत्सर्जित केले जातात.
शरीरातील पचनसंस्थेचे अवयवांनुसार टप्पे-
तोंड : अन्न चघळणे आणि गिळणे. जिभेद्वारे अन्न तुमच्या घशात ढकलले जाते. यावेळेस घशातील एपिग्लॉटिस नावाचा अवयव श्वासनलिका झाकतो. त्यामुळे अन्न घशातून श्वासनलिकेत जाण्यापासून रोखले जाते आणि अन्ननलिकेत जाण्यास मदत होते.
अन्ननलिका : अन्ननलिका नावाच्या पोकळ नळीतून अन्न पुढे जाते. अन्ननलिकेच्या शेवटाशी स्फिंक्टर हा अंगठीच्या आकाराचा स्नायू असतो जो अन्न येण्यापूर्वी आकुंचन पावलेला असतो आणि त्यातून अन्न जाताना सैल होतो. परिणामतः अन्न पुढे जाऊन जठरात प्रवेश करते.
जठर : जठर पाचक रस तयार करते आणि अन्नाचे विघटन करते. लहान आतड्यात अन्न जाईपर्यंत जठरात तीन तास अन्न घुसळले जाते. अन्नातील घनपदार्थ आणि द्रवपदार्थ पाचकरसांबरोबर एकजीव होतात आणि पचनक्रिया होते.
लहान आतडे : जठरात एकजीव झालेले अन्न, लहान आतड्यामध्ये यकृत आणि स्वादुपिंडातील पाचक रसांमध्ये मिसळते. लहान आतड्याच्या बाह्य भिंतींमधून अन्नातील पोषक द्रव्ये आणि पाणी शोषून घेतले जाते आणि टाकाऊ पदार्थ मोठ्या आतड्यात सोडले जातात.
मोठे आतडे : टाकाऊ पदार्थांचे विष्ठेमध्ये रूपांतर केले जाऊन ते मळाच्या स्वरूपात गुदाशयात ढकलले जाते.
गुदाशय : गुदाशय हा तुमच्या मोठ्या आतड्याचा खालचा भाग असतो. आतड्याची हालचाल होऊन शौच विसर्जनाची भावना होईपर्यंत त्यात विष्ठा साचवली जाते, आणि भावना झाल्यावर विष्ठा शरीराबाहेर ढकलली जाते.
जठराची रचना
जठर शरीराच्या डाव्या बाजूला पोटाच्या वरच्या भागात असते. जठराच्या सुरुवातीचा भाग अन्ननलिकेच्या शेवटी असलेल्या झडपेला जोडलेला असतो. जठराच्या शेवटी ते ड्युओडेनम या लहान आतड्याचा सुरुवातीचा भागाला जोडलेले असते. व्यक्तिनुसार जठराचा आकार बदलतो. पोट भरले की ते विस्तारते आणि रिकामे असताना ते आकुंचित होते. घेतलेल्या आहाराच्या व्याप्तीप्रमाणे जठराचा आकार बदलू शकतो.
विभाग
रचनात्मकदृष्ट्या जठराचे पाच वेगळे विभाग असतात.
कार्डिआ : हा जठराचा सुरुवातीचा भाग असतो. आत आलेले अन्न उलट्या दिशेने अन्ननलिकेत जाऊ नये म्हणून तिथे कार्डिअॅक स्फिंक्टर नावाची झडप असते.
फंडस : कार्डिआच्या पुढे असलेला जठराचा हा गोलाकार भाग असतो. छातीची पोकळी आणि पोटाची पोकळी यांना विभागणाऱ्या विभाजक पडद्याच्या, म्हणजे श्वासपटलाच्या खाली असतो.
कॉर्पस ः हा जठराचा सर्वात मोठा भाग असतो. इथे अन्नपचनासाठी आवश्यक असणारी आकुंचन प्रसरण क्रिया होऊन अन्नपदार्थ घुसळले जातात आणि एकजीव होतात.
एन्ट्रम : फंडसच्या खालील भागाला एन्ट्रम म्हणतात. जठरातून पचन होत असलेले अन्न लहान आतड्यात सोडण्यापूर्वी ते एन्ट्रममध्ये धरून ठेवले जाते.
पायलोरस : हा जठराचा शेवटचा भाग असतो. यात पायलोरिक स्फिंक्टर ही झडप असते. विशेष पेशीसमूहाने तयार केलेल्या या छोट्या गोलाकार झडपेद्वारे जठरात पचन झालेले अन्न पुढील कार्यवाहीसाठी लहान आतड्यात जाते.
जठराची अंतर्रचना
स्नायू आणि इतर उतींनी जठराच्या अंतर्रचनेत विविध स्तर तयार झालेले आढळतात.
म्युकोझा (श्लेष्मल स्तर) : हे जठराच्या आतील अस्तर असते. जठर रिकामे असताना म्युकोझाला छोट्या घड्या किंवा वळकट्या (रुगी) पडलेल्या असतात. अन्ननलिकेतून अन्नपदार्थ किंवा द्रवपदार्थ आल्यावर म्युकोझाच्या या घड्या उलगडतात, त्यांच्या कडा सपाट होतात आणि जठराचे आकारमान विस्तृत होऊ लागते.
सबम्युकोझा : यात संयोजी ऊतक (कनेक्टिव्ह टिशू), रक्तवाहिन्या, रस वाहिन्या आणि मज्जातंतू असतात. सबम्युकोझावरती म्युकोझाचे आवरण असते आणि त्यामुळे ते संरक्षित होते.
मस्कुलॅरिस एक्स्टर्ना : हा जठराचा प्राथमिक स्नायू असतो. त्यात तीन स्तर असतात ते आकुंचन-प्रसरण पावून जठरात अन्न घुसळतात आणि अन्नाचे विघटन करतात.
सीरोझा : हे बाह्यआवरण जठराला बाहेरून संपूर्णपणे गुंडाळून घेते.
जठरातील पाचक रस आणि आम्ल
जठरातील ग्रंथीतून गॅस्ट्रिक अॅसिड, इंट्रिन्झिक फॅक्टर आणि गॅस्ट्रिन हे पाचक रस नसलेले घटक आणि पेप्सिनोजेन हा पाचकरसाचे पूर्वरूप स्रवतात.
तर पेप्सिन हा पाचक रस पेप्सिनोजेन या प्राथमिक स्वरूपात स्रवतो. गॅस्ट्रिक अॅसिड हे अतिशय तीव्र आम्ल असते, रासायनिक दृष्ट्या त्याची पीएच १ ते ३ असते. त्याचे कार्य म्हणजे
अन्नातील प्रथिनांपैकी पॉलीपेप्टाइड्स या लांब साखळ्या असलेल्या प्रथिनांचे मोनोपेप्टाइड्स किंवा डायपेप्टाइड्समध्ये विघटन करणे आणि अभिशोषणास योग्य बनवणे.
अन्नातून येणारे काही हानिकारक जीवाणू नष्ट करणे. पेप्सिनोजेनचे पेप्सिनमध्ये रूपांतर करून प्रथिनांच्या पचनात मदत करणे
इंट्रिन्झिक फॅक्टर हा अन्नातील ब-१२ या जीवनसत्त्वाचे अभिशोषण करण्यास मदत करतो. इंट्रिन्झिक फॅक्टर योग्य प्रमाणात नसला किंवा अजिबात नसला, तर ब-१२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे उद्भवणारे अनेक विकार, विशेषतः मेगालोब्लास्टिक अॅनिमिया उद्भवू शकतो.गॅस्ट्रिनमुळे जठराची आणि पचनसंस्थेतील इतर अवयवांची, आतड्यांची हालचाल नियंत्रित होते आणि अन्नपचन होत होत पुढे ढकलले जाते.
जठराचे विकार आणि आजार
पचनसंस्थेच्या अनेक आजारांत जठरावरदेखील परिणाम होतात. गर्भधारणेदरम्यान जठरावर वाढत्या गर्भाशयाचा दबाव येऊन छातीत जळजळ होऊ शकते. जठराचे काही आजार तात्पुरते असतात, काही दीर्घकालीन असतात तर काही गंभीर होऊ शकतात. जठराचे सर्वसामान्यपणे आढळणारे आजार खालीलप्रमाणे असतात.
गॅस्ट्रिक अल्सर : जठराच्या म्युकोझा या अंतस्थ अस्तराची झीज होऊन त्यात जखमा होतात. खूप वेदना होतात, खाल्ल्यावर उलट्या होतात आणि अनेकदा उलटीवाटे रक्त पडते.
गॅस्ट्रायटिस (जठराची सूज) : यामध्ये जठराच्या म्युकोझाला सूज येऊन पोटात जळजळ होते.
गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्स डिसीज (जीइआरडी) : यात पोटातील अन्न, पाचक रस आणि आम्ल अन्ननलिकेपर्यंत उलटे जाते, त्यामुळे छातीत जळजळ होणे, मळमळणे, खोकला होणे असे त्रास होतात.
गॅस्ट्रोपॅरेसीस : जठरातील मज्जातंतूंना इजा होऊन पोटाच्या स्नायूंच्या आकुंचनावर परिणाम होतो.
अपचन : जठराच्या वरच्या भागात अस्वस्थता, वेदना किंवा जळजळ होते.
पेप्टिक अल्सर : तुमच्या पोटात किंवा तुमच्या लहान आतड्याच्या पहिल्या भागात (ड्युओडेनम) जखम होते, वेदना, उलट्या, उलटीत रक्त पडणे असे तीव्र त्रास जाणवतात.
जठराचा कर्करोग : यामध्ये जठरात कर्करोगाच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात.
जठराच्या आरोग्याबाबत काळजी
जठर आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करावे लागतात...
मद्यपान टाळावे, नियंत्रित आणि मर्यादित ठेवावे.
दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्यावे.
अाहारात दररोज २५ ते ३५ ग्रॅम तंतूमय पदार्थ (फायबर) पालेभाज्या, संत्री, मोसंबी, सॅलड घ्यावेत.
नियमित व्यायाम करावा.
प्रक्रियायुक्त (प्रोसेस्ड फूड्स), डबाबंद किंवा पॅकेज्ड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे.
ध्यानधारणा, मेडीटेशनद्वारे तणाव व्यवस्थापन करावे.
धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थ वर्ज्य करावेत.
पोटाच्या त्रासासमवेत खालील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
छाती दुखणे.
ताप येणे.
मळमळ आणि उलट्या होणे.
शौचाला काळी होणे.
शौचामध्ये पू किंवा रक्त आढळणे.
खूप जुलाब होणे.
तीव्र निर्जलीकरण होऊन गरगरणे, चक्कर येणे.
पोटात अचानक आणि तीव्रतेने दुखणे.
जठर हे अन्नपचन संस्थेचे महत्त्वाचे शक्तिस्थान असते. त्याच्या आरोग्यासाठी काळजी घ्यावीच, पण होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रासाची किरकोळ आजार म्हणून बोळवण करू नये...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.