खोल काळोख्या गुहांत आजही जिथे मानवी उत्क्रांती संबंधीचे अनेक पुरावे सापडतात

पृथ्वीचा परिचय करून घेताना पृथ्वीवर अनेक ठिकाणी आढळणाऱ्या विविध प्रकारच्या गुहांची ओळख करून घेतल्याशिवाय हा परिचय पूर्ण होत नाही.
गुहा
गुहाesakal
Updated on

डॉ. श्रीकांत कार्लेकर

‘होप अॅण्ड व्हिजन’ मार्ग हा सोन डूंगचा सर्वात मोठा विभाग आहे. चाळीस मजली इमारत सहज बसू शकेल किंवा बोईंग ७४७ विमान उड्डाण करू शकेल इतका हा मार्ग मोठा आहे, असा गुहा तज्ज्ञांचा अंदाज आहे. शिवाय, जगातील सर्वात उंच ८० मीटर उंचीचा ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ याच मार्गात आहे.

पृथ्वीचा परिचय करून घेताना पृथ्वीवर अनेक ठिकाणी आढळणाऱ्या विविध प्रकारच्या गुहांची ओळख करून घेतल्याशिवाय हा परिचय पूर्ण होत नाही.

खोल काळोख्या गुहांत आजही जिथे मानवी उत्क्रांती संबंधीचे अनेक पुरावे सापडतात अशा आफ्रिकेतील गुहा, थायलंडमधील चुनखडकाच्या खोल आणि अरुंद गुहा, अमेरिकेच्या कोलोरॅडो प्रांतातील स्टीमबोट स्प्रिंग्स शहराखाली घातक विषारी वायू पसरवणारी एक लाख वर्षे जुनी सल्फरची गुहा, समुद्रलाटांनी खडक पोखरून निर्माण केलेल्या सागरी गुहा आणि मेघालयातील गारो, खासी आणि जैंतिया येथील टेकड्यांमध्ये असलेल्या चुनखडकातील अनेक गुहा (Limestone Caves) असे विविध प्रकारच्या गुहांचे एक विलक्षण सुंदर पण तितकेच गूढ विश्व पृथ्वीवर प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

चुनखडकातील गुहा संख्येने जास्त आणि विविध आकाराच्या, खोलीच्या आणि सर्वाधिक विस्मयकारी असल्याचे आढळून आले आहे!

गुहा
नोकरीसाठीच्या मुलाखतीत छंदाविषयीच्या प्रश्नावर उत्तर काय द्यावे?

हँग सोन डूंग (Hang Son Doong) ही व्हिएतनाममधील गुहा जगातील सर्वात मोठी गुहा मानली जाते. फोंग न्हा नावाच्या माणसाने ही गुहा १९९०मध्ये शोधली.

२००९मध्ये हँग सोन डूंगचे अधिकृतपणे सर्वेक्षण करण्यात आले आणि हॉवर्ड लिम्बर्ट यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश-व्हिएतनाम गुहा मोहीम पथकातर्फे हँग सोन डूंगचे मोजमाप करण्यात आले आणि ३८.५ दशलक्ष घन मीटर आकारमानाची ही गुहा जगातील सर्वात मोठी नैसर्गिक गुहा असल्याचे घोषित केले.

त्यानंतर डॉ. टोनी वॉल्थम यांच्यासह जगातील अनेक वरिष्ठ चुनखडक (कार्स्ट) भूवैज्ञानिकांनी हे मोजमाप स्वीकारले. या टीमने नॅशनल जिओग्राफिक मासिकासोबत त्याच वर्षी सोन डूंग गुहा ही पृथ्वीवरील सर्वात मोठी चुनखडी गुहा म्हणून घोषित केली होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ऑर्गनायझेशनने २०१३मध्ये जगातील सर्वात मोठी नैसर्गिक गुहा म्हणून या गुहेची नोंद केली.

‘सोन डूंग’ हा दोन शब्दांचा संयोग आहे. ‘सोन’ म्हणजे पर्वत आणि ‘डूंग’ हे स्थानिक खोऱ्याचे नाव आहे. या खोऱ्यातून थुओंग नदी वाहते. ‘चुनखडीच्या पर्वतातील गुहा ज्यातून भूमिगत नदी वाहते’ असाही या शब्दाचा अर्थ असल्याचे सांगितले जाते.

व्हिएतनामच्या क्वांग बिन्ह प्रांतातील हँग सोन डूंग किंवा माउंटन रिव्हर गुहा ही जगातील सर्वात मोठी गुहा मानली जाते. गुहेची रुंदी सगळीकडे १०० मीटरच्या जवळपास असल्याचे दिसून येते. साडेसहा किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या गुहेच्या मार्गात गुहेची उंची काही ठिकाणी २०० मीटरपेक्षाही जास्त आहे.

ही गुहा ‘के बँग’ नावाच्या गिरिपिंडांत (Massif) तयार झालेली उष्णकटिबंधीय चुनखडकातील (Karsts) अनेक अत्यंत मोठ्या गुहांपैकी एक आहे. हा गिरिपिंड म्हणजे अनेक विस्तृत थरांनी बनलेला चुनखडक आहे आणि तो रूपांतरित आणि भरड गाळाने युक्त (Clastic) अशा गाळाच्या खडकांनी वेढलेला आहे.

गुहा
"महत्वाच्या विधेयकांना चर्चेविनाच मंजूर करण्याचा भाजपाचा डाव आहे" सुप्रिया सुळे यांनी 'या' चार विधेयकाचा केला उल्लेख

सोन डूंग गुहेची एकूण लांबी सुमारे नऊ किलोमीटर आहे आणि ३८.५ दशलक्ष घन मीटर इतक्या घनफळाची ही गुहा मलेशियातील डिअर केव्ह नावाच्या गुहेपेक्षा पाच पट मोठी आहे. सोन डूंगला विशेष ओळख देणारे तिचे वैशिष्ट्य म्हणजे गुहेतच लपलेले अनोखे भूमिगत जग.

यात अनेक जटिल आणि ८० मीटरपेक्षा जास्त उंची असलेले विशाल अधोमुखी लवणस्तंभ (Stalactites), गुहेच्या आत वाढणारी प्राचीन वर्षावने, तिची स्वतःची परिसंस्था, हवामान आणि जिचा शोध अद्यापपर्यंत कोणत्याही संशोधकाला लागलेला नाही अशी एक रहस्यमय भूमिगत नदी या गोष्टी आहेत.

या गुहेला भेट देणाऱ्या बऱ्याचजणांनी म्हटले आहे, की हँग सोन डूंग गुहा हे पृथ्वीवरचे एक वेगळेच असे दुसरे जग आहे!

या आश्चर्यकारक गुहेत एक प्रभावी परिसंस्था आहे. ही विशाल आणि गुंतागुंतीची गुहा प्रणाली भूमिगत नदीद्वारे तयार केली गेली होती आणि पृष्ठभागावरील जंगलातून खाली झिरपणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेल्या विविध भूआकारांनी ती भरलेली आहे.

‘होप अॅण्ड व्हिजन’ मार्ग हा सोन डूंगचा सर्वात मोठा विभाग आहे. या मार्गाच्या सुरुवातीपासून दीड किलोमीटर अंतरावर नरसाळ्याच्या आकाराचे खोल खळगे (Dolines) आणि त्यातून आत येणारा उजेड दिसू शकतो.

चाळीस मजली इमारत सहज बसू शकेल आणि बोईंग ७४७ विमान उड्डाण करू शकेल इतका हा मार्ग मोठा आहे, असा गुहा तज्ज्ञांचा अंदाज आहे. शिवाय, जगातील सर्वात उंच ८० मीटर उंचीचा ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ (Stalagmite) याच मार्गात आहे.

गुहा
Randeep Hooda Wedding: "महाभारतात जसं अर्जुनाने मणिपूरची.." लग्नाची घोषणा करत रणदीप-लिननं शेयर केली पोस्ट

हँग सोन डूंग गुहेच्या आत जी एक भूमिगत नदी आहे ती एन गुहा आणि खे राय गुहा या व्हिएतनाम आणि लाओसच्या सीमा क्षेत्रातून वाहत येणाऱ्या दोन नद्या एकत्र येऊन तयार झाली आहे. सोन डूंग प्रवेशद्वारापासून, होप आणि व्हिजन मार्गामध्ये जाण्यासाठी या नद्या गुडघाभर पाण्यातून दोनदा पार कराव्या लागतात.

पाण्याची पातळी जास्त झाल्यास वापरण्यासाठी अर्थातच आपत्कालीन पूल आहेत. वाटेत असलेले छोटे धबधबे जोरात कोसळत असतात. कधीकधी ही गुहा धुक्याने भरलेली असते. ही भूमिगत नदी गुहेच्या प्रवेशद्वारापासून सुमारे ४.५ किलोमीटर अंतरावर नरसाळ्याच्या आकाराच्या खोल खळग्याजवळ अदृश्य होते.

या भूमिगत नदीच्या शेजारी ४० मीटर खोलीवर एक जीवाश्म मार्ग आहे. हा रस्ता शेकडो दशलक्ष वर्षांपूर्वी जीवाश्मीभूत झालेल्या प्रवाळानी बनलेला आहे. या मार्गात १७ ते २० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्याचा भूगर्भातील तलावदेखील आहे.

गुहेचे छत कोसळून ४५० मीटर उंचीचा नरसाळ्याच्या आकाराचा खोल खळगा जिथे तयार झाला आहे त्याच ठिकाणी गुहेतील भूमिगत नदीही नाहीशी होते.

नरसाळ्याच्या आकाराचा खोल खळगा जिथे तयार झाला आहे तिथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या अशाच खोल खळग्यात चुनखडीच्या पर्वतांच्या खाली, गुहेच्या आत २०० मीटर खोलीवर जंगल वाढलेले दिसून येते.

गुहेच्या छतावरून झिरपणाऱ्या पाण्याच्या थेंबातून खाली गुहेत येणाऱ्या कॅल्साइट कार्बोनेटमुळे गुहेत तलाव तयार झालेले आढळून येतात. या पाण्याच्या थेंबाना ‘गुहेतील मोती’ म्हटले जाते. वेगवेगळ्या आकारात सोन डूंग गुहा मोती नैसर्गिकरित्या तलावाच्या आत तयार होतात. हे गुहा मोती (Cave Pearls) सामान्य कॅल्शियम कार्बोनेटचे साठे आहेत.

गुहा
लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

१९९४पासून शोधमोहीम पथकाने हँग एन आणि हँग थुंग गुहांचा शोध लावला आणि या दोन गुहांच्या दरम्यान आणखी एक गुहा असावी असे त्यांच्या लक्षात आले. ही गुहा कशी असेल याची तेव्हा त्यांना कल्पना नव्हती. जर या गुहा जोडल्या गेल्या तर हँग सोन डूंग गुहेचे घनफळ अनेक लक्ष घनमीटरने वाढेल, असा अंदाजही त्यांनी वर्तविला.

ही गुहा इतकी मोठी का आहे? अलीकडच्या काळात झपाट्याने तयार झाल्यामुळे की अतिशय कठीण आणि मजबूत मूळ प्रस्तरांत संथ गतीने तयार झाल्यामुळे? अशा प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी गुहा निर्मितीची (Speleogenesis) शैली आणि वेळ समजून घेणे आवश्यक आहे.

हँग सोन डूंगची निर्मिती अन्यत्र जात नदी (Allogenic River) शंभर मीटर रुंद असलेल्या उभ्या प्रस्तरभंग भेगेत खचल्यामुळे झाली.

पृष्ठभागावरील नदीच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या प्रग्रहणामुळे किंवा अपहरणामुळे (Capture) गुहा निर्मिती झाली असावी, असे गुहेतील नदीची अवशिष्ट चुनखडक दरी पाहून असे लक्षात येते.

ही गुहा तीव्र प्रस्तरभंग क्रियेने नियंत्रित आणि प्रभावित आहे, असे संपूर्ण गुहेचा आकृतिबंधच सुचवितो. गुहेत तयार झालेल्या दोन नरसाळ्याच्या आकाराच्या खळग्यांमुळे (Dolines) गुहा विदीर्ण झाली असून, त्यापैकी एकाने आज नदीतील पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणला आहे.

नदीच्या वरच्या टप्प्यात त्यामुळेच १०० मीटर जाडीचे गाळ संचयन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या गाळाचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण केल्यावर गुहेचे भूशास्त्रीय वय ठरविणे सोपे झाले.

डेव्होनियन या ३६ ते ४२ कोटी वर्षे जुन्या भूशास्त्रीय काळापासून २५ ते ३६ कोटी वर्षांपूर्वीच्या पर्मोकार्बोनिफेरस कालखंडातील चुनखडीच्या एका उघड्या पडलेल्या, टीथिस समुद्राच्या काळातील, गाळ छेदावरून ही गुहा किती प्राचीन असावी त्याचा अंदाज करता येतो.

कॉस्मोजेनिक न्यूक्लाइड पद्धती ही किरणोत्सर्गाच्या तत्त्वावर आधारित वापरली जाणारी कालमापन पद्धत आहे. ही पद्धत वापरून या गुहेच्या केलेल्या कालमापनात जास्त अनिश्चितता दिसून आली. असे असले तरी हा गाळ अलीकडच्या काळातील म्हणजे मागील तीन लाख वर्षांपूर्वीचाच आहे, असे सुरुवातीच्या निरीक्षणावरून दिसून आले आहे.

गुहेचा मार्ग मात्र खूपच म्हणजे २५ ते ५३ लाख वर्षे इतका जुना आहे. आजही सुरू असलेले गुहा निर्मिती काळाचे पुनर्विश्लेषण कदाचित अजून अचूक असेल. ही कालनिश्चिती जगभरातील इतर मोठ्या गुहांच्या वयाशी सुसंगत आहे.

हँग सन डूंग आणि के बँग गिरीपिंडाची निर्मिती लाखो वर्षांमध्ये संथ गतीने अतिशय कठीण अशा खडकांच्या ताकदीमुळे हळूहळू झिरपणाऱ्या पाण्यामुळे झाली असावी असे आता नक्की म्हणता येते!

--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()