दसरा विशेष संपादकीय : सौहार्दाचे झाड...!

aptyach paan
aptyach paan esakal
Updated on

अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।

इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।

हे अश्मंतक महावृक्षा, तुझ्यासारखा दोषनिवारक दुजा कोणी नाही. माझ्यातले दोष नष्ट करण्याची शक्ती तुझ्यातच आहे. माझ्या आप्तेष्टांचं,

मित्रांचंही प्रिय कर, आणि माझ्या शत्रूंचाही विनाश कर....

अश्मंतक वृक्ष म्हणजे आपण दसऱ्याच्या आदल्या दिवशी ओरबाडतो, ते आपट्याचं झाड. पानोळ्यानं बहरलेलं. जाडसर देठ. गोलसर पानांचा जोड. उघडलं की अगदी हृदयासारखं वाटतं. कधी वाटतं, पिंपळाचं पान वहीत ठेवलं की कालांतरानं जाळीदार होतं, तसंच आपट्याचंपानही ठेवलं तर? पण तसं होत नाही. हे पान पिंपळासारखं कधी जराजर्जर होत नाही. हमेशा शिलंगणासाठी तयार असलेल्या मर्द योद्ध्यासारखं दोन दिवसांत मातीमोल होतं.

कफाच्या विकारांवर आपट्याची पानं गुणकारी आहेत, असं शास्त्र सांगतं. तशा बऱ्याच औषधी वनस्पती आहेत या जगात. पण अश्मंतकाचं कौतुक वेगळ्या कारणासाठी. हे झाड सौहार्द पेरतं...

aptyach paan
Dasra special Recipes : दस-या निमित्त 'या' खास पदार्थांनी वाढवा सणाचा गोडवा

दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात. पुराणात वरतंतू ऋषी आणि त्यांचा शिष्य कौत्स याची कथा सांगितली जाते.

इंद्रदेवानं घाबरून आपट्याच्या झाडावर सुवर्णाचा वर्षाव केला, त्यातल्या चौदा कोटी मुद्रा नेमक्या उचलून कौत्सानं गुरुवर्य वरतंतूंना नेऊन दिल्या. बाकीचं सोनं रघुराजाच्या प्रजाजनांनी लुटलं. त्याच कथेचा अवशेष आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपल्या खिशात आणि हातात असतो.

दसरा किंवा विजयादशमीच्या कितीतरी कथा आहेत. या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध केला. विजयादशमी हाच दशानन रावणाचा जन्मदिवस. याच दिवशी पांडवांनी शमीवृक्षाच्या ढोलीतून आपली शस्त्रे काढली होती. आणखीही खूप आख्यायिका आहेत. भारतीय परंपरेत दसरा हा मात्र कृषिसंस्कृतीतला मोठा सण मानला जातो. हा एक लोकोत्सव आहे.

हवामान बदलाचं संकट गहिरं होण्याच्या आधीची गोष्ट. पर्जेनकाळ संपत आलेला असायचा. काही नाठाळ ढग उगाच कुठंतरी बरसून जीव टांगणीला लावायचे हे खरं. पण या चुकार ढगांची तशी भीती नसायची. शिवारातलं पीक हाताबुडी आलेलं असायचं. काळजीकाट्यानं वाढवलेलंलेकरू हाताशी यावं, तसं. या दिवशी शेतकऱ्यानं उठावं. शिवारात जाऊन तिथल्या हिरव्या सोन्यावरून मायेनं हात फिरवावा. एखादा तुरा काढून मुंडाशात खोचावा. सहकुटुंब सहपरिवार गावाबाहेर जाऊन आपट्याच्या वृक्षाखाली तांब्याचं नाणं ठेवावं, आणि मगच आपट्याची काही पानं तोडून घ्यावीत. त्याला फुकट ओरबाडू नये! मग भक्तिभावानं त्याचं पूजन-अर्चन करून घरी परतावं. आल्यागेल्याला त्याच आपट्याची पानं वाटावीत, अशी एक परंपरा होती.!!

aptyach paan
Dasra melava 2023 : विजयादशमी अन् राजकीय पक्षांचे मेळावे; जाणून घ्या त्या मागचा इतिहास

या दिवशी आपट्याची पानं, निव्वळ पानं म्हणून वाटायची नसतात, आणि स्वीकारायचीही नसतात. दसऱ्याच्या दिवशी या पानांना सोन्याच मोल असतं. आपल्या घरात येऊ घातलेली सुबत्ता पुरती हाती येण्याच्या आधीच निर्ममपणानं दुसऱ्याला वाटायची ही भावनाच अतिशय गोड आहे...

ही आहेत सौहार्दाची पानं!

आपल्या मनातली भलाई दुसऱ्याच्या हाती सोपवणारी. अभावातही भाव उराशी जपणारी. आपट्याच्या पानांना सोनं म्हणतात; पण या सोन्याच्या देवाणघेवाणीत व्यवहार नसतो. गुंजतोळ्यांचं मोजमाप नसतं. भेसळ नसते. काळंपांढरं धन नसतं. अलंकारांचं मिरवणं नसतं; पण तरीही ते असतं सोनंच. निदान दसऱ्याच्या दिवशी तरी!

शाळेत निबंध असायचा. अजूनही असेल! – ‘मी पंतप्रधान झाले तर? किंवा ‘मी मुख्यमंत्री झालो तर?’ या निबंधात मुलं काय काय लिहायची. अशाच कथानकाचा एक चित्रपटही मध्यंतरी येऊन गेला होता. पण सगळेच काही पीएम, सीएम होत नाहीत. आपट्याचा वृक्ष मात्र वर्षातून एकदा खराखुरा सोन्याचा होतो. सोनं म्हणून जगतो. सोनं म्हणून वाटला जातो. दुसऱ्या दिवशी आपला पाचोळा होणार आहे, हे त्याला माहीत असतं. तरीही तो सुवर्णाचा वेष चढवतो. आपुलकीनं ही सोन्याची पानं वाटणारा सौहार्द वाटत असतो. तेव्हा वाटणाऱ्याचं सोनं होतं.

आपणा सर्वांना दसऱ्याच्या सौहार्दपूर्ण शुभेच्छा!

aptyach paan
Dasra 2022 : जालन्यात ७५ फूट रावणाचे दहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.