प्रतिनिधी
युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांचे प्राण वाचविण्याच्या उद्देशाने कॉम्बॅट रोबोटिक्स स्थापन करण्यात आले. मानवरहित रोबोटिक सिस्टिम्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करून या स्टार्टअपने सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांच्या जिवाचा धोका कमी करण्यावर भर दिला आहे. या सिस्टिम्स वापरून युद्धभूमीवर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची अद्ययावत माहिती संकलित करता येते.
देशातील कोणत्या न कोणत्या प्रतिष्ठित आयआयटीचे आजीमाजी विद्यार्थी आणि स्टार्टअप असे एक नाते साधारणपणे जाणवते. मात्र या नियमाला काही सन्माननीय अपवादही आहेत, त्यापैकी एक म्हणजे कॉम्बॅक्ट रोबोटिक्स इंडिया. युद्धभूमीवर सैनिकांचे प्राण वाचविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यात या स्टार्टअपचे मोठे योगदान आहे.
या यशस्वी स्टार्टअपमागे चक्क एक कॉलेज ड्रॉपआऊट आहे. गणेश पंडित सूर्यवंशी. त्यांनी देशभक्तीने प्रेरित झालेल्या अभियंत्यांची एक टीम तयार केली आणि कॉम्बॅक्ट रोबोटिक्स इंडियाला आकार दिला.