राकेश कुल्चावाला
अजबगजब घरं!
‘सूर्यनारायण आग ओकतो आहे’ हे वाक्य अगदी गुळमुळीत झालं आहे. पण सध्या दिल्लीत तशीच स्थिती आहे. याही वातावरणात दिल्लीत फिरायला आलात तर स्वागतच आहे.
दिल्लीत उन्हाळ्यासाठी बाल्कनीत आणि काही घरात तर चक्क बाथरूममध्येही पंखे असतात. कारण उष्णता आणि आर्द्रता असं दोन्ही मिळून उकाडा असतो. त्यामुळे बाथरूममध्ये अंघोळ करून बाहेर येईपर्यंत पुन्हा अंघोळ करायची वेळ येते.
या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय केला आहे. मात्र दुर्दैवाने सर्वसामान्य घरात स्वयंपाकघरात पंख्याचा स्वीच आढळेलच याची शाश्वती नाही. दिल्लीच्या घरांमध्ये हॉल, बेडरूम, बाल्कन्या मोठ्या असतात, पण स्वयंपाकघर एकदमच छोटं असतं.
या महत्त्वाच्या जागेच्या रचनेकडे का लक्ष दिलं जात नाही, हे न उलगडलेलं कोडं आहे. दिल्लीत नवीन आलेले लोक एकदातरी स्वयंपाकघराच्या नावाने बोटं मोडतातच. स्वयंपाकघरात राबणाऱ्या अन्नपूर्णेला का हव्यात सुखसोई? असा खास पुरुषी विचारही केला जातो.