Delhi : ये दिल्ली हे मेरे यार..! काय आहे तरी काय या दिल्ल्लीमध्ये?

दिल्लीत घरं शोधणं हा एक तापदायक विषय..
Delhi
Delhi Esakal
Updated on

राकेश कुल्चावाला

पंतप्रधानांचे आठवावे रूप

तीन मूर्ती भवन हे नेहरूंचं निवासस्थान. याच जागेचं नाव आता ‘प्रधानमंत्री संग्रहालय’ असं ठेवण्यात आलं आहे. भारतातल्या सर्व पंतप्रधानांच्या कार्याचा लेखाजोखा येथे मांडण्यात आला आहे. सुरुवातीला तीन मूर्ती भवन हे नेहरूंचं भव्य निवासस्थान लागतं. तिथे गेल्यावर समग्र नेहरू आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती मिळते. त्याच परिसरात मागच्या बाजूला हे अत्याधुनिक संग्रहालय आहे.

तिथे लालबहादूर शास्त्रींपासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचं यथोचित वर्णन केलं आहे. उदा. ‘जय जवान जय किसान’ या घोषणेमागची लालबहादूर शास्त्रींची भूमिका, भारताच्या उदारीकरणाचा इतिहास, अणुचाचण्या अशा आधुनिक भारतातल्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती येथे मिळते.

या माहितीचे सादरीकरण उत्तम पद्धतीने केले आहे. ऑडिओ गाइडचीसुद्धा सोय आहे. आपण सध्या ज्या भारतात राहतो त्याच्या निर्माणासाठी आपल्या पूर्वजांनी काय कष्ट घेतलेत याची जाणीव हे भव्य संग्रहालय पाहिल्यावर नक्कीच होते.

हिस्ट्री वॉक्स

दिल्ली आणि इतिहास हे जणू समानार्थी शब्द आहेत. ठिकठिकाणी मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाच्या पाऊलखुणा तुम्हाला दिसतात. या ठिकाणांची माहिती देणारा हिस्ट्री वॉक इथे दर वींकेडला आयोजित केला जातो. दिल्लीच्या इतिहासाची चांगली माहिती असणारी व्यक्ती हा वॉक आयोजित करते. एखादं ठिकाण निवडलं जातं. मग एक गट तयार करतात आणि त्या ठिकाणी फिरवून आणतात.

तुम्ही जर वीकेंडला एकटे किंवा कुटुंबासह सकाळी तिथे फिरायला गेलात, तर गाइडसदृश व्यक्ती माहिती देताना दिसतो. आपण ज्या शहरात राहतो त्या शहराच्या इतिहासाची अशा पद्धतीनं माहिती घेणं कायमच समृद्ध करणारा अनुभव असतो. नंतर त्या ठिकाणावरून कितीदाही गेलं तरी तो इतिहास झटकन डोळ्यासमोरून तरळतो.

या सर्व ऐतिहासिक ठिकाणांचं जतन आणि व्यवस्थापनसुद्धा उत्तम केलं आहे. त्यामुळे या चांगल्या अनुभवात आणखी भर पडते. थकूनभागून आलं की बाहेर एखादा कुल्चेवाला असतोच क्षुधाशांती करायला.

या भवनातील गीत...

राजधानीचं शहर असल्यामुळे दिल्लीत शासकीय आणि इतर कामांसाठी लोक येत असतात. त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून प्रत्येक राज्याने आपलंआपलं एक भवन दिल्लीत उभारलं आहे. दिल्लीच्या मध्यवर्ती भागात ही भवनं आहेत. पण राहण्यापेक्षा खाण्यासाठीच ती जास्त प्रसिद्ध आहेत. या भवनांत त्या त्या राज्यातले पदार्थ मिळतात. घरची आठवण काढत लोक वीकेंडला तिथे जेवायला जातात.

यात सर्वात आघाडीवर आहे ते आंध्र भवन. तिथे सदैव गर्दी असते. तिथलं जेवणही उत्तम असतं. एकावेळेला तीन-चारशे लोक आरामात जेवतात. गुजरात, बंगाल, छत्तीसगढ, बिहार, तामिळनाडू ही भवनंसुद्धा चांगली आहेत. महाराष्ट्राचं काय? तर इथे जुनं आणि नवं महाराष्ट्र सदन आहे. नवं सदन तर अतिशय देखणं आहे.

मात्र तिथे राहायचं असेल तर एका रात्रीचे पाच ते सहा हजार मोजावे लागतात. खासदार, आमदारांचं पत्र आणलं तर कमी होतात. इथलं जेवण मात्र मराठी लोकांनाही आवडत नाही. भाकरीच्या नावाखाली तंदुरी रोटी देणाऱ्या सदनात कोण जेवायला जाणार? असो.

घर आणि घरमालक

दिल्लीत घरं शोधणं हा एक तापदायक विषय आहे. इथे घराचे दोन प्रकार असतात. एका प्रकारात घरमालक खालच्या मजल्यावर राहतो. भाडेकरू वरच्या मजल्यावर राहतो. घरमालक खालीच राहत असल्यामुळे भाडेकरू दहशतीत असतात. एका घराच्या वर गच्चीत एक खोली उभारणे याला ‘बरसाती’ असं म्हणतात.

स्वस्तात घर हवं असेल हा तर हा पर्याय आहे. दुसरं म्हणजे फ्लॅट सिस्टीम. इथे बिल्डरांनी तर सोसायट्या उभारल्या आहेतच, पण सरकारी आस्थापनेतल्या लोकांनी किंवा खासगी नोकरी करणाऱ्यांनी मिळून इथे सोसायट्या उभ्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांची नावं आकर्षक आहेत.

पत्रकारांचं ‘समाचार अपार्टमेंट’, जाहिरात क्षेत्रातल्या लोकांचं ‘विज्ञापन लोक’, उत्तराखंडातील लोकांचं ‘पर्वतीय विहार’ अशा अनेक सोसायट्या आहेत. मराठी लोकांचीसुद्धा ‘सह्याद्री अपार्टमेंट’ नावाची सोसायटी आहे. इथे पागडी सिस्टिम नाही. त्यामुळे घर भाड्यानं घेताना भरमसाठ डिपॉझिट भरावं लागत नाही.

मालकांशी चांगले संबंध ठेवले, की त्या घरात नीट राहता येतं. त्यामुळे मालकांशी संबंध हा इथेही कळीचा मुद्दा आहेच. काही अनधिकृत भागात खूप लागून घरं असतात. तिथे शहाण्या माणसानं न डोकावलेलंच बरं.

--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.