राकेश कुल्चावाला
उकडीचे मोदक म्हणजे मोमोज का?
राजधानी दिल्लीतही गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. अनेक मराठी मंडळांनी गणपती बसवले, कार्यक्रम केले. हौसमौज करून घेतली. महाराष्ट्रात तळलेले मोदक चांगले की उकडीचे मोदक चांगले, हा एक मुद्दा नेहमी चर्चेत येतो. दिल्लीतले अमराठी लोक एक पाऊल पुढे आहेत. सोशल मीडियामुळे उकडीच्या मोदकांचा प्रसार आणि प्रचार झाला आहे. त्यामुळे सगळीकडे हा पदार्थ कळला आहे. एका दिल्लीकरानं त्याला थेट मोमोजची उपमा दिली. त्यामुळे मराठी मन चांगलंच दुखावलं.
दिल्लीत मोमोज पावलापावलावर मिळतात. वरचं कव्हर उकडलेलं आणि आत भाज्यांचं, पनीरचं वगैरे सारण असा हा मामला असतो. मग मोदकही तसेच आहेत, असा शेरा हिंदी लोकांनी दिला. त्यात भरीस भर म्हणजे तळलेल्या मोदकांना फ्राईड मोमोज अशीही उपमा देऊन झाली. त्यामुळे मराठी माणसांना मोदक ही काय चीज आहे हे अमराठी दिल्लीकरांना कसं सांगावं, असा प्रश्न पडला. मागे एकदा पुरणाच्या पोळीला ‘मीठा पराठा’ असं म्हटलं गेल्याचंही समजलं. आता बोला!