योगिराज प्रभुणे
सामाजिक संस्था आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची इच्छा असणाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणणारा उपक्रम म्हणजे ‘देणे समाजाचे’. ह्या उपक्रमाने गरज आणि ती गरज भागवणारे स्रोत एकत्र आणण्याचे प्रयत्न सलग वीस वर्षे चालवले आहेत. ते महत्त्वाचे आहेच पण त्यापेक्षाही महत्त्वाची ठरते ती त्या प्रयत्नांतून निर्माण झालेली ‘देणाऱ्यांची’ पिढी.
शंभरांत एखादा वीर निपजतो, हजारांत एखादा विद्वान मिळतो, त्याच्या दसपट लोकांमधला एखादा उत्तम वक्ता असतो, पण आपल्यातला वाटा दुसऱ्याला देणाऱ्या दात्यांची मात्र वानवाच असते, अशा अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे. सुभाषितकार म्हणतात. ‘दाता भवती वा न वा’.
सुभाषितकारांच्या या त्रिकालाबाधित निरीक्षणाला एक अल्पसा छेद देणारा प्रयत्न पुण्यात गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे, ‘देणे समाजाचे’.