Chakrata: चकराताचे रौद्र सौंदर्य; न पाहिलेला स्वर्ग!

Chakrata
Chakrata
Updated on

डॉ. श्रीकांत कार्लेकर

बहरलेली देवदाराची झाडे, शांत विखुरलेली गावे आणि खोल नदी पात्रे देवबनच्या परिसरात जागोजागी दिसतात. देवबनला व्यास शिखरावर जाण्यापूर्वी वर जाणारी पायवाट उंच फर आणि पाइन वृक्षांनी वेढलेली आहे. इथले मुख्य आकर्षण म्हणजे घनदाट अल्पाइन जंगले, प्रदेशातील जीवजंतू, ऱ्होडोडेंड्रॉन, ओक व पाइनची जंगले आणि व्यास शिखरावरून होणारे पर्वत रांगांचे दर्शन.

पर्यावरण आणि जैवविविधतेसंबंधी काम करणाऱ्या पुण्यातील एका संस्थेने हिमालयातील ‘चकराता’ या ठिकाणी जाण्याचे ठरविले आहे असे कळले आणि मीही त्यात सहभागी व्हायचे नक्की केले. हिमालयातील इतर अनेक ठिकाणी यापूर्वी गेलो असल्यामुळे हिमालयाचे आकर्षण तर होतेच; शिवाय चकराताच्या विलक्षण भूप्रदेशाबद्दल ऐकूनही होतो, त्यामुळे मी तिथे जायला कमालीचा अधीर झालो होतो.

‘पक्षी निरीक्षण’ हा या भेटीचा मुख्य उद्देश होता, तरी प्रामुख्याने मध्य हिमालयातील या ठिकाणचा व आजूबाजूच्या प्रदेशातील निसर्ग आणि भूप्रदेश पाहण्यासाठी मी जास्त उत्सुक होतो. हिमालयाचा हा भाग भूशास्त्रीयदृष्ट्या खूप वेगळा आहे आणि बारकाईने पाहिल्यास इथे हिमालयाच्या निर्मितीपासून आत्तापर्यंतची सर्व स्थित्यंतरे दिसून येतात, असे मी वाचले होते. मलाही या सगळ्याची अनुभूती इथल्या भेटीत निश्चितच झाली.

आम्ही आमचा प्रवास डेहराडूनपासून सुरू केला. डेहराडून ते चकराता हा निसर्गरम्य प्रवास हिमालयीन झाडी, जंगले, कलसी येथील यमुना नदी आणि धबधबे यामधून आहे. डेहराडूनच्या उत्तरेला ९० किमी अंतरावर असलेला चकराता हा अतिशय सुंदर आणि रौद्र सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. हे गाव टोंस आणि यमुना नदीच्या दरम्यान वसले आहे. २,१३४ मीटर उंचीवरचे हे ठिकाण. गावाच्या आजूबाजूचा खोल दऱ्या व तीव्र डोंगर उतारांनी नटलेला प्रदेश अतिशय शांत आणि शहरी कोलाहलापासून मुक्त आहे, आणि केवळ त्यामुळेच विविध प्रकारच्या पक्ष्यांनी अगदी समृद्ध आहे. पक्षी निरीक्षण करणाऱ्यांसाठी तर हे मोठे नंदनवनच!

Chakrata
निसर्ग सौंदर्याने नटलेले कनकेश्वर मंदिर

चकराताच्या पुढे उत्तरेला पाच किमी अंतरावर नदीखोऱ्याच्या एका डोंगरउतारावर असलेल्या ‘ग्वासा पूल’ या अतिशय रमणीय ठिकाणी आम्ही राहत होतो. तिथल्या १,९१६ मीटर उंचीवरील ‘हिमालयन पॅरडाइज’ इमारतीच्या समोरच्या डोंगर उतारावरच्या एका प्रचंड मोठ्या खडकाच्या वळीने गेल्या गेल्याच आमचे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हिमालय हा वली पर्वत असल्यामुळे अशा भू-वळ्या इथे सहजपणे आणि सगळीकडे दिसतात. मात्र त्यातील विविधता, कणखरपणा आणि भव्यता केवळ अनाकलनीय आणि आश्चर्यकारक असल्याचे आमच्या पुढच्या सगळ्या निरीक्षणांत प्रकर्षाने दिसून आले. वळी असलेल्या या उताराच्या जवळपास, सकाळीच, अनेक पक्षी दिसत असल्यामुळे पक्षी निरीक्षकांना तीही एक पर्वणीच होती!

पहिल्याच दिवशी ग्वासा पुलाच्या उत्तरेला पाच किमी अंतरावरील ‘देवबन’ या २,२७३ मीटर उंचीवरील देवराईकडे आम्ही निघालो. देवबनला जाण्याचा सगळा मार्ग कच्चा, वळणावळणाचा, पण जीप जाण्यासाठी ठीक होता. आजूबाजूला सर्वत्र खोल दऱ्या आणि जागोजागी झालेले प्रचंड भूस्खलन दाखविणाऱ्या कोसळलेल्या दरडी, अतिशय तीव्र उतारांचे डोंगर हे सगळे बघून इथल्या दुर्गम आणि कठीण भूप्रदेशाची लगेचच ओळख होते.

Chakrata
निसर्ग सफाई कामगार गिधाडांचे देव्हारेत दर्शन

या सगळ्या प्रदेशात मुख्यतः ४० ते २२ कोटी वर्षे जुन्या चुनखडक आणि राखाडी रंगाचा डोलेराईट या खडकांचे प्राबल्य आहे. या खडकांचे चकचकीत कंकर आढळतात. या खडकांमुळे ठिकठिकाणी डोंगरात मोठमोठ्या चुनखडक गुहा आढळून येतात. शिवालिक हिमालयात किंवा बाह्य हिमालयात सापडणारे जीवावशेष मध्य हिमालयाच्या या भागांत कुठेही दिसत नाहीत हे विशेष. देवबनच्या प्रवासात बहरलेली देवदाराची झाडे, शांत विखुरलेली गावे आणि खोल नदी पात्रे जागोजागी दिसतात. देवबनला व्यास शिखरावर जाण्यापूर्वी वर जाणारी पायवाट उंच फर आणि पाइन वृक्षांनी वेढलेली आहे. इथले मुख्य आकर्षण म्हणजे घनदाट अल्पाइन जंगले, प्रदेशातील जीवजंतू, ऱ्होडोडेंड्रॉन, ओक व पाइनची जंगले आणि व्यास शिखरावरून होणारे पर्वत रांगांचे दर्शन.

देवबनातील सर्वोच्च ठिकाण व्यास शिखर या नावाने ओळखले जाते. त्याची उंची आहे २,८८० मीटर. हवा स्वच्छ असेल तर इथून हिमालयातील कंड महादेव, गोषु पिषू, त्रिशूल, नंदादेवी, बद्रीनाथ, केदारनाथ, श्रीकांतिया, दूनागिरी, गंगोत्री अशी १५ हिमशिखरे आणि संथाल खिंड स्पष्टपणे दिसू शकतात. ज्या ठिकाणाहून ही शिखरे दिसतात तिथे एक छोटा स्तंभ असून त्यावर त्यांचे दिशादर्शन केलेले आहे.

Chakrata
पावस-सह्याद्रीच्या विद्यार्थ्यांनी रेखाटला जयगडचा निसर्ग

देवबनच्या दाट जंगलातून बाहेर पडून आम्ही ‘खडंबा रोड’ या २,६९८ मीटर उंच ठिकाणाकडे निघालो. ज्यांना खडकांबद्दल खूप प्रेम आहे, ज्यांना ते समजून घ्यावेत असे वाटते त्यांच्यासाठी ‘रिखनाद’ या २,८०० मीटर उंचीच्या पर्वत रांगेच्या रस्त्याचा हा भाग आणि उघडे पडलेले खडक हा एक खजिनाच आहे! चुनखडक, डोलेराईट, क्वार्टझाईट खडकांचा विलक्षण मनोहारी आणि भयावह आविष्कार इथे बघायला मिळतो. हिमालय निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जी भारतीय व युरेशिया भूतबकांची टक्कर झाली, त्या संदर्भात याला मोठे महत्त्व असल्याचे एका भूशास्त्रज्ञाचे मत असल्याचे कळले.

कनासर (२,१३८ मीटर) या ठिकाणी पाच ते सहा मीटर घेरा असलेले बुंधे असलेल्या देवदार वृक्षांचे मनमोहक वन आहे. ते पाहायला जातानाच काही ठिकाणी डोंगराच्या उतारावरून बाहेर डोकावणारे पाटीच्या दगडाचे (Slate) थरही दिसले.

देवदार वृक्षांचे वन पाहून झाल्यावर आम्ही ‘बुधेर केव्ह’ला जायचे नक्की केले. ही २,७०६ मीटर उंचीवर असलेली चुनखडक गुहा, त्यातील लवण स्तंभांसाठी या भागातील मोठे आकर्षण आहे. आम्हाला मात्र ते पाहण्यापासून इथल्या निसर्गानेच वंचित ठेवले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आम्ही बुधेर गुहा असलेल्या मोठ्या टेकडीवजा उंचवट्याच्या पायथ्याशी पोहोचलो आणि एकाएकी जोरदार गारांची वृष्टी सुरू झाली. गारांचा आकारही वाढला आणि बघता बघता सगळा आसमंत गारांच्या पावसात चिंब होऊन गेला. कडाडून कोसळणाऱ्या विजेने सगळ्यांच्या जिवाची धाकधूक वाढली. जीप लगेच मागे वळवून आम्ही लवकरात लवकर तिथून काढता पाय घेतला. थांबलो असतो तर कदाचित भूस्खलन होऊन आणि खचून रस्ता बंद झाला असता. रस्त्यावर साठलेल्या गारांच्या थरावरून गाडी घसरत होती, बाजूच्या खोल दऱ्या नीटशा दिसतही नव्हत्या. त्यामुळे गाडीचा वेग वाढवता येत नव्हता. आमचा ड्रायव्हर मात्र अतिशय तरबेज होता आणि याआधी अनेक वेळा अशा परिस्थितीला सामोरा गेला होता. तोच आम्हाला धीर देत होता. बुधेर गुहा न बघताच निसर्गाच्या एका भयंकर रूपाचा अनुभव घेत आम्ही परतलो!

दुसऱ्या दिवशी ताजेतवाने होऊन आम्ही ‘टायगर फॉल’ नावाचा धबधबा पाहण्यासाठी निघालो. १,४३३ मीटर उंचीवरून एकाच उडीत १०० मीटर रोरावत आणि प्रचंड वेगात खाली पडणारा हा धबधबा आहे. त्याच्याही आजूबाजूला चुनखडकात तयार झालेल्या आणि आतून एकमेकांना जोडल्या गेलेल्या गुहा आहेत.

Chakrata
आंबोलीत निसर्ग पर्यटनाला मान्यता

त्याच दिवशी आम्ही २,२६५ मीटर उंचीवरील इंद्रोली व कंदार या सर्वस्वी वेगळा अनुभव देणाऱ्या गावांत गेलो. इथल्या लोकांचे जीवन आजूबाजूच्या कठीण आणि भयावह निसर्गाने अधिकच खडतर केले आहे. तरीही या गावातली प्रेमळ माणसे समाधानाने जगत आहेत. जौसारी पद्धतीची पारंपरिक लाकडाची घरे याच भागात पाहायला मिळतात.

शेवटच्या दिवशी यमुनेच्या किनाऱ्यावर वसलेल्या आणि प्राचीन मंदिरे व त्यांचे अवशेष असलेल्या सुंदर ‘लाखामंडळ’ या १,१६० मीटर उंचीवरील ठिकाणाला भेट दिली. यमुनेच्या पश्चिम किनाऱ्यावर केवळ एक किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. भगवान शिवाचे हे नागर शैलीतील मंदिर साधारण बाराव्या ते तेराव्या शतकात बांधले गेले. आजूबाजूला मोठ्या संख्येने शिल्पे आणि वास्तुशिल्पे पसरलेली दिसतात. येथे भूतकाळातील आणखी मंदिरांचे अवशेषही दिसतात. परंतु सध्या फक्त हे एकच मंदिर शिल्लक आहे. दगडांच्या खाली आढळलेल्या विटांच्या रचनेच्या आधारावर लाखामंडल येथील बांधकामाचे सर्वात जुने पुरावे सुमारे पाचव्या-आठव्या शतकातील आहेत, असे दिसून येते. हे मंदिर आणि आजूबाजूच्या परिसराविषयी बोलताना येथील स्थानिक महाभारतातील कथा सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, याच परिसरात दुर्योधनाने पांडवांना लाक्षागृहात जिवंत जाळण्याचा कट रचला होता. जवळच वाहणाऱ्या यमुना नदीचे तीन-चारशे मीटर रुंदीचे पात्रही अतिशय रमणीय आहे. हे पात्र आणि त्यातील प्रचंड शिळा बघितल्यावर हिमालयातील नद्यांच्या भव्यतेचा आणि ताकदीचा अंदाज येतो.

पक्ष्यांची सदैव सुरू असलेली किलबिल... डोंगरदऱ्यांचे रौद्र रूप... एकंदरीत सौंदर्याने नटलेल्या चकराताच्या शांत आणि प्रसन्न निसर्गाच्या दर्शनाने मन आनंदित आणि तृप्त होऊन जाते हे मात्र नक्कीच! (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.