डॉ. प्रणिता अशोक
उकडीच्या मोदकांऐवजी गहू किंवा इतर धान्यांची पारी करून केलेले मोदकही शरीरास पोषणमूल्य देणारेच असतात. मग काळजी काय घ्यायची? तर खव्याचे वेगवेगळे फ्लेवर्स वापरून केलेल्या ‘मोदकां’चा अतिरेक टाळायला हवा. त्यात कॅलरीज जास्त असतात आणि पोषणमूल्ये कमी असतात.
मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गणरायाचे आगमनच मुळी नवचैतन्य घेऊन येते. गणपती येणार म्हटले, की सजावटीसोबतच प्रसादाचाही विचार केला जातो. उत्सवात वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांची मेजवानी ठरलेली असते.
गणपतीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यातील प्रत्येक घटकाला आहारशास्त्रात विशिष्ट महत्त्व आहे. गणरायासाठी प्रसाद म्हणून निवडले जाणारे पदार्थ आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे असतात. पंचखाद्यापासून म्हणजेच खारीक, खोबरे, बदाम, खसखस आणि खडीसाखर यांपासून बाप्पांना आवडणारे मोदक तयार होतात.
पंचखाद्यापासून केलेले मोदक पौष्टिक आणि आहारशास्त्रानुसार फायदेशीर असतात.
रव्याच्या किंवा कणकेच्या मोदकांत सारण म्हणून गूळ, खोबरं, खसखस अशा पदार्थांचा वापर केला जातो. उकडीचे मोदक करताना तांदळाचे पीठ, ओले खोबरे, गूळ किंवा साखर हे मुख्य घटक वापरले जातात. वेलची, जायफळही घातले जाते.
तांदळाचे उकडलेले पीठ म्हणजे सहज पचणारा आणि शरीराला ताकद देणारा पदार्थ. ग्रीष्म आणि वर्षा ऋतूचा जोर ओसरला, की अगदी सहज पचणारा आणि शरीर व मनाची ताकद वाढवणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. म्हणूनच श्रावणानंतरच्या उत्सवकाळात घरोघरी मोदक केले जातात.
मोदकांत वापरले जाणारे पदार्थ आणि त्यांचे आरोग्यासाठी असणारे फायदे
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गूळ खाणे उपयुक्त असते. यामुळे अपचनाचा त्रास कमी होतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास असतो किंवा ज्यांचे हिमोग्लोबिन खूप कमी असते, अशा व्यक्तींना नियमितपणे गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. फॉलिक ॲसिड आणि बी-कॉम्प्लेक्स यांचेही चांगले प्रमाण गुळामध्ये असते. त्यामुळे थकवा घालविण्यासाठी गूळ अतिशय उपयुक्त ठरतो. गुळामध्ये झिंकदेखील असते. गूळ हिमोग्लोबिन वाढवतो.
खोबरे
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खोबरे खाणे चांगले असते. खोबऱ्यामध्ये प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन सी असते. चांगले फॅट्स तसेच ॲन्टीऑक्सिडंट्सदेखील खोबऱ्यामध्ये असतात. खोबऱ्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणदेखील भरपूर असते. ओले खोबरे शरीरातील रक्त, मांस, हाडे आणि मज्जासंस्था यांचे पोषण करणारा उत्तम पदार्थ आहे. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी नारळ खूप महत्त्वाचा घटक आहे.
खसखस
खसखशीत कॅल्शियम, झिंक, कॉपर चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी खसखस खाणे फायदेशीर ठरते. मनावरचा ताण कमी करून शांत झोप येण्यासाठी खसखस उपयुक्त ठरते. खसखशीतमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनशक्ती सुधारते. खसखशीमध्ये असलेल्या मॅग्नेशिअमचा हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयोग होतो.
खडीसाखर
खडीसाखर शरीरासाठी पोषक पदार्थ आहे. कोणत्याही पदार्थात सहज मिसळणारी साखर आजकाल फार बदनाम झाली आहे, पण ती अनेक रोगांवरील उत्तम औषधही आहे. अनेक जण मोदकांत साखरेचा वापर करतात. मधुमेही रुग्णांनी मात्र योग्य मर्यादेत मोदक खाणे आवश्यक आहे.
वेलची
वेलची मनासाठी आल्हाददायक, हृदयासाठी उपयोगी, आणि रक्त, मांस, मज्जासंस्थेवर काम करणारी असते.
जायफळ
जायफळ मन शांत करण्यात मदत करते. मनात विचार येण्याची गती कमी करते. जायफळाच्या सेवनामुळे उत्तम झोप येते. जायफळ शरीरातील मांस, मज्जासंस्था आणि शुक्रधातू यांवर काम करते.
गाईचे तूप
पृथ्वीतलावरील अमृत म्हणून देवाने माणसाला तूप दिले आहे, असे म्हटले जाते. आयुर्वेदात शरीर, मन, बुद्धी यावर उपाय करताना तुपाचाच वापर होतो. बद्धकोष्ठतेची तक्रार असेल, तर बिनधास्त मोदक खावेत, कारण ते नैसर्गिक रेचक म्हणून काम करतात. मोदकातील सारणामध्ये तूप असते. यामुळे आतड्यांजवळील घातक, टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
बदाम
बदामामध्ये प्रथिने असतात. बदामात असणारे ओमेगा 3 आणि ओमेगा 6, फॅटी अॅसिड हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात. शरीरातील नसांच्या आरोग्यासाठी बदामाचे सेवन करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे काहीजण मोदकांमध्ये आवर्जून बदामाची पूड घालतात.