सुहास किर्लोस्कर
चित्रपटाची कथा एडिटिंग टेबलवर मांडली जाते. उदाहरणार्थ, पहिल्या शॉटमध्ये पडद्यावरची व्यक्ती घरामधल्या बेडरूममध्ये हलकेच डोकावून बघत आहे. कट.
दुसऱ्या शॉटमध्ये फिरता कॅमेरा बेडरूममध्ये डोकावताना दिसतो, ज्यामुळे प्रेक्षकांना त्या व्यक्तीच्या नजरेतून बेडरूम दिसते (पॉइंट ऑफ व्ह्यू शॉट).
कट. तिसऱ्या शॉटमध्ये बेडरूममध्ये बघणाऱ्या त्या व्यक्तीचे विस्फारलेले डोळे दिसतात. प्रेक्षक विचार करतात, याने असे काय बघितले असेल ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर असे भाव दिसतात?
कोणत्याही भयपटामध्ये अशा रिअॅक्शन शॉटमुळे प्रेक्षकांना भीती वाटते, त्यांची उत्सुकता वाढते, आनंद होतो, त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात.
चक दे इंडियासारख्या चित्रपटात एखादी मॅच सुरू असल्यास रिअॅक्शन शॉटमुळे आपण खेळामध्ये गुंतून जातो आणि सामना जिंकल्यावर टाळ्याही वाजवतो.
तारे जमीन परमध्ये निकुंभ सर (आमीर खान) ईशानच्या (दर्शील सफारी) घरी जातात आणि ईशानने काढलेली चित्रे बघतात, त्यावेळी एकेक चित्रे बघितल्यानंतर आमीर खानचा रिअॅक्शन शॉट बघून प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी येते.